magisterial inquiry Goa fire: उत्तर गोव्यातील हडफडे येथील 'बर्च' नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत २५ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या हृदयद्रावक घटनेची दंडाधिकारी चौकशी आता पूर्ण झाली असून, त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेल्या या अहवालात, स्थानिक पंचायत आणि संबंधित सरकारी विभागांच्या गंभीर त्रुटींवर बोट ठेवण्यात आलेय.
अहवालातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, 'बर्च' नाईट क्लबने अनिवार्य सुरक्षा मानकांचे उल्लंघन केले असतानाही त्याला परवाने कसे मिळाले? चौकशी समितीला असे आढळले आहे की, अग्निशमन दल आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन या क्लबमध्ये झाले नव्हते.
तरीही, हडफडे गाव पंचायतीने आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांनी नियमांकडे डोळेझाक करत या क्लबला व्यवसाय करण्याची परवानगी दिली. "जर नियमांची कडक अंमलबजावणी झाली असती, तर आज २५ निरपराध व्यक्तींचे प्राण वाचले असते," असे संकेत या अहवालातून मिळत आहेत.
जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी सादर केलेल्या या अहवालात केवळ चुकाच काढल्या नाहीत, तर भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तब्बल ६० शिफारसी केल्या आहेत. यामध्ये नाईट क्लब आणि गर्दीच्या ठिकाणांसाठी 'फायर ऑडिट' अनिवार्य करणे, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग अधिक सक्षम करणे आणि परवाना देण्यापूर्वी प्रत्यक्ष जागेची कडक तपासणी करणे अशा उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.
या अहवालामुळे आता दोषी अधिकाऱ्यांचे आणि पंचायत सदस्यांचे धाबे दणाणले आहेत. २५ जणांचा बळी जाण्यास कारणीभूत ठरलेल्या या दुर्लक्षासाठी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी मृतांच्या नातेवाईकांकडून होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.