Goa Agriculture: गोव्याच्या खाजन जमिनीसह देशातील किनारपट्टीच्या भागात भरघोस उत्पादन देणारी भाताची नवीन जात शोधण्यात गोव्याच्या केंद्रीय किनारी शेती संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांना यश आले आहे. लवकरच या जातीचे नामकरण होऊन ती शेतकऱ्यांना उत्पादनाकरिता उपलब्ध असेल, अशी माहिती संस्थेचे मुख्य संचालक परविन कुमार यांनी दिली आहे.
देशातील भाताच्या संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि गोवा धान 1, 2, 3 आणि 4या भाताच्या जातीचे जनक डॉ. के. मनोहर यांनी ही जात शोधून काढली आहे. सलग तीन वर्षे या भाताच्या जातीसाठी त्यांचे संशोधनाचे काम सुरू होते.
सध्या ही जात शेतकऱ्यांसाठी उत्पादनाकरिता योग्य बनली असली तरी अजून या जातीचे नामकरण आणि शोधोत्तर तांत्रिक बाबींचे काम सुरू आहे. ही जात प्रामुख्याने गोव्यातील खाजन (क्षारपाड) जमिनीसाठी अतिउत्तम आहे. ती देशातील सर्व किनारी राज्यांतील जमिनीसाठी योग्य असेल, असा डॉ. मनोहर यांचा दावा आहे.
अगोदर विकसित असलेली गोवा धान 1 ही जात आणि हरियाणाच्या कर्नाल येथील राष्ट्रीय भातशेती संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेली उंची जास्त असलेली सीएसआर-26 ही जात या नव्या जातीसाठी वापरली गेली आहे. गोव्याच्या शास्त्रज्ञांना आवश्यक असणारी वैशिष्ट्यपूर्ण नवीन भाताची जात शोधली गेली आहे.
नव्या जातीचे वैशिष्ट्य
किनारी भागांमध्ये बहुतांश जमीन ही क्षारयुक्त असते. याचा उत्पादनावर परिणाम होतो. म्हणून शास्त्रज्ञांना अशा क्षारपड जमिनीत येणारी, भरघोस उत्पादन देणारी, मध्यम उंची व जास्त काळ पाण्यात तग धरणारी जात हवी होती. ही सर्व वैशिष्ट्ये नव्याने शोधण्यात आलेल्या भाताच्या जातीमध्ये आहेत.
डॉ. के मनोहर, भात शेती शास्त्रज्ञ-
गेल्या तीन वर्षांपासून या भाताच्या नव्या जातीसाठी प्रयत्न सुरू होते. या हंगामातील पीक पाहता ही जात विकसित करण्यात आम्हाला यश आले आहे. आता पुढील तांत्रिक बाबीचे काम सुरू आहे. लवकरच ही भाताची जात गोव्याच्या शेतकऱ्यांसाठी आम्ही उपलब्ध करून देऊ.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.