पणजीतील इन्स्टिट्यूट मिनेझिस सभागृहात घरगुती वापरासाठी ‘केजरीवाल वीज मॉडेल’वरून ग्राहकांना वीज मोफत देण्याच्या प्रश्नावरून दोन्ही वीजमंत्र्यांमध्ये ‘वाद-विवाद’ रंगला. यावेळी दोघांनीही आपापल्या बाजू मांडून ग्राहकांना वीज मोफत देणे शक्य नाही किंवा कसे शक्य आहे यावर मते मांडली. दोघाही मंत्र्यांना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नावरून त्यांच्यामध्ये उत्तरे देताना खडाजंगी तसेच दावे - प्रतिदावे होत होते. अनेकदा मूळ विषय बाजूला ठेवून अधिक तर दोघांनीही वीज मोफत देण्यासंदर्भातच्या आपापल्या सरकारच्या धोरणावरच अधिक भर देताना बाजू मांडल्या. (Big Debate between Power Ministers Nilesh Cabral and Satyendra Jain over free electricity to Goa consumers)
राज्यात ग्राहकांसाठी वीज मोफत देऊन सरकारवरील आर्थिक बोजा वाढवायचा नाही, त्यामुळे गोव्यात मोफत वीज देणे शक्य होणार नाही, असे वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी स्पष्ट केले. तर आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष सत्तेवर आल्यास गोमंतकीयांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज देईल, असे सत्येंद्र जैन म्हणाले.
250 कोटींची थकबाकी...
ग्राहकांना दिलेली चुकीची बिले माफ केली जातील असे आश्वासन केजरीवाल यांनी दिले होते. त्यावर उत्तर देताना वीजमंत्री काब्राल यांनी भरमसाट व चुकीची बिले दिल्याच्या आरोपाचा इन्कार केला. सरकारने एकरकमी वीज बिल भरण्याची योजना लागू केली होती त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 75 टक्के ग्राहक नियमित बिले भरतात तर 25 टक्के ग्राहक बिले भरत नाहीत. सध्या सुमारे 200 ते 250 कोटी रुपये बिलांची थकबाकी आहे.
उपर छत्री नीचे छाया; भाजपच्या घोषणा
चर्चा संपवून मंत्री नीलेश काब्राल सभागृहासमोर आल्यावर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मंत्री काब्राल यांनी चांगला युक्तिवाद केला म्हणून हार घालून अभिनंदन केले आणि ‘दिल्लीमें शोर है, सत्येंद्र चोर है’, ‘उपर छत्री नीचे छाया, भाग सत्येंद्र काब्राल आया’ अशी घोषणाबाजी केली.
हुश घालत कार्यकर्ते भिडले
वीजमंत्री नीलेश काब्राल आणि दिल्लीचे वीजमंत्री सत्येंद्र जैन यांच्यामधील चर्चा गरम होतानाच सभागृहाबाहेरील वातावरण तापू लागले. आप कार्यकर्ते वाल्मिकी नाईक आपल्या कार्यकर्त्यांशी बोलत असताना भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हुश घातल्याने बाचाबाची वाढली. आणि दोन्ही गटाचे कार्यकर्ते पोलिसांसमोरच भिडले. मात्र, पोलिसांनी दक्ष राहत वेळीच हस्तक्षेप केल्याने आणि आप कार्यकर्ते बाजूला नेल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
"गोव्यात ग्राहकांना 300 युनिटपर्यंत मोफत घरगुती वीज, शेतकऱ्यांना मोफत वीज, 24 तास अखंडित वीजपुरवठा, यापूर्वीची सर्व वीज बिले माफ तसेच पुढील पाच वर्षांपर्यंत वीजदरात वाढ नाही याबाबत ठाम आहोत," असे मत जैन यांनी व्यक्त केले.
"दिल्लीत वीज निर्मिती प्रकल्प आहेत, गोव्यात नाहीत. आप सरकारने वीज वितरणाचे काम खासगी कंपन्यांकडे सोपविले आहे व दिल्ली सरकारने केलेल्या करारामुळे या कंपन्यांना नुकसानी होऊनही दरवाढ करता येत नाही," असे मत गोव्याचे विजमंत्री काब्राल यांनी व्यक्त केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.