डिचोली: एकेकाळी पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आणि सुरक्षित असलेला सर्वण येथील नैसर्गिक धबधबा आता अांघोळीसाठी असुरक्षित बनला आहे. जीवितहानीसारखी एखादी घटना टाळण्यासाठी या धबधब्यावर पावसाळी पर्यटन आणि अंघोळीसाठी कायमची बंदी घालावी, अशी मागणी जागृत नागरिकांकडून होत आहे.
हा धबधबा यंदा अजून प्रवाहित झालेला नाही. मात्र, दमदार पर्जन्यवृष्टी झाली की, हा धबधबा खळखळून वाहणार आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून पाऊस सक्रिय झाल्याने आता गावोगावी असलेले धबधबे प्रवाहित होण्याची शक्यता वाढली आहे.
पावसाळी पर्यटनस्थळे प्रत्येकाला खुणावत असतात. पावसाचा जोर वाढतच गेल्यास या जून महिन्यात ग्रामीण भागातील नैसर्गिक जलस्रोतांवर गजबजाट जाणवणार आहे. काही धबधब्यांवर बुडण्याच्या घटना घडत असल्याने हे धबधबे पावसाळी पर्यटनासाठी धोकादायक बनले आहेत.
२५-३० वर्षांपूर्वी सर्वण येथील हा धबधबा पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध होता. सुट्टीच्या दिवसांनी तर या धबधब्यावर स्थानिकांसह पर्यटकप्रेमींची गर्दी दिसून येत होती. आतापर्यंत या धबधब्यावर कोणताही अनर्थ घडल्याचे ऐकिवात नाही. मात्र, कालांतराने या धबधब्याच्या पायथ्यापासून तिळारीचा कालवा गेल्याने हा धबधबा पावसाळी पर्यटनासाठी असुरक्षित आणि धोकादायक बनत गेला. पावसाळी पर्यटनाची मजा लुटताना नजरचुकीने धबधब्याच्या खालच्या बाजूने कोणी अडकल्यास मोठी आपत्ती कोसळण्याचा धोका आहे.
या धबधब्यावरील संभाव्य धोका ओळखून बहुतेक स्थानिकांनी या धबधब्याकडे पाठ केली आहे. मात्र, धोक्याची कल्पना नसलेले या धबधब्यावर मजा लुटताना एखादी वाईट घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक पंचायत किंवा जलस्रोत खात्याकडून या धबधब्यावर बंदी घालणारे किंवा धोक्याची सूचना देणारे फलक लावावेत, अशी मागणी होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.