'Paper Spray' Case Dainik Gomantak
गोवा

'Paper Spray' Case : पालकांच्‍या चेहऱ्यांवर काळजी, शिक्षक गंभीर, विद्यार्थी संभ्रमात

शांतादुर्गा विद्यालयातील स्‍थिती

दैनिक गोमन्तक

योगेश मिराशी

भर वर्गात पाच खोडसाळ विद्यार्थ्यांनी ‘पेपर स्‍प्रे’ फवारल्‍याने 12 विद्यार्थिनी श्‍‍वसनाच्‍या त्रासाने अत्‍यवस्‍थ होतात, या घटनेनंतर डिचोली येथील शांतादुर्गा उच्‍च माध्‍यमिक विद्यालय एकाएकी चर्चेत आले. गुरुवारी उपरोक्‍त प्रकार घडल्‍यानंतर शुक्रवारचा दिवस विद्यालय आणि संबंधित घटकांसाठी तणावाचाच होता.

डिचोली शहरातही हॉटेल, टपरीवर कधी दबक्‍या तर कधी खुलेपणाने उपरोक्‍त विषयावर लोक बोलत होते. विद्यालयात सकाळी 8 पासून वर्दळ वाढली, शाळेत मुलांना सोडायला येणाऱ्या पालकांच्‍या चेहऱ्यावर काहीशी काळजी आणि प्रश्‍‍नचिन्‍हे होती. पीडित विद्यार्थिनींचेही काही पालक आले व त्‍यांनी शाळा व्‍यवस्‍थापनाची भेट घेतली. शाळा परिसरात भेट देताना काही धक्‍कादायक बाबीही समोर आल्‍या.

...अन् दोषी कळले

घडल्‍या प्रकारानंतर पाच विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई झाली. पण, हे पाच जण शोधणे जरा अवघड होते. हा प्रकार कुणी केला हे मुलांना गुप्‍त पद्धतीने चिठ्ठीवर लिहिण्‍यास सांगण्‍यात आले. त्‍यानुसार मुलांनी नावे लिहिली व नेमके कृत्‍य कोणी केले यावर शिक्‍कामोर्तब झाले. संशयित विद्यार्थ्यांची वागणूक, त्यांच्या बोलण्यातील संदिग्धता व इतर मुलांनी संशय व्यक्त केल्यानंतर निलंबनाची कारवाई करण्‍यात आले.

कुणीतरी सीसीटीव्‍ही कनेक्‍शन तोडले !

घटना कशी झाली, याचे सीसीटीव्‍ही फुटेज महत्त्‍वाचे ठरणार होते. जेथे प्रकार घडला त्‍या वर्गाच्‍या बाजूला कॉरिडॉरमध्‍ये सीसीटीव्‍ही आहेत. परंतु धक्‍कादायक बाब म्‍हणजे घटनेनंतर सीसीटीव्हीच्‍या तारा मुद्दामहून कुणीतरी कापल्याचे समोर आले. त्यानंतर सीसीटीव्ही कनेक्‍शन पूर्ववत करण्‍याचे काम सुरू होते.

पालकांसह-मुलांमध्ये भीती...

परवाचा प्रकार जिवावर बेतू शकला असता, परंतु, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. त्यामुळे पालकांनी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे म्हटले. इतकी मोठी घटना घडल्यानंतर व्यवस्थापन किंवा पीटीएकडून घटनेच्या दिवशी योग्य माहिती पालकांना पुरविली नाही, असे म्हणत काही पालकांनी नाराजी व्यक्त केली. किमान समाज माध्यमे, विद्यालयाचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप किंवा व्यवस्थापनाने स्टेटमेंट जारी करायला हवे होते, असेही पालकांचे मत आहे. झाल्या प्रकारामुळे पालकांत तसेच मुलांमध्ये काहीशी भीती व संशयाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसते.

कारवाई करणारच होतो,पण पुन्हा तेच घडले !

गुरुवारी काही पालकांनी विद्यालयस्थळी गर्दी करुन, व्यवस्थापनास जाब विचारला. यापूर्वी अशा काही आक्षेपार्ह घटना घडल्या. ११ ऑगस्टला घटना घडली होती,तेव्हा कारवाई का नाही केली? असे पालकांनी विचारले. तेव्हा व्यवस्थापन उत्तरले की, घटनेची सखोल चौकशी आम्ही करीत होतो. अकारण, कुणावरही अन्याय होऊ नये याची काळजी घेतली जात होती. त्यानुसार, १७ रोजी संबंधितावर कारवाई होणार होती, तेवढ्यातच तसाच दुसरा प्रकार घडला.

व्हेप पेन अर्धी भरलेली, तर दुसरी रिकामी

विद्यार्थिनीकडे सापडलेली व्हेप पेन अर्धी भरलेली, तर दुसरी रिकामी होती. विद्यालयातील 10 विद्यार्थिनींना गुरुवारी सकाळी अस्वस्थ तसेच श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने इस्पितळात दाखल करण्याची वेळ ओढवली.

ज्या विद्यार्थिनींच्या बॅगेत हे दोन व्हेप पेन सापडले, ती मुलगी वर्ग प्रतिनिधी (सीआर) आहे. याप्रकरणी विद्यालय व्यवस्थापनाने महिनाभर पाच मुलांचे निलंबन केले. आणि चालू तपासात दोषी आढळल्यानंतर संबंधितांना शाळेतून काढून टाकले जाईल, असा इशारा व्यवस्थापनाने दिला आहे.

निलंबन केलेल्यात चार मुले व एका मुलीचा समावेश. या निलंबन केलेल्यांपैकी दोन मुले अस्वस्थ वाटू लागलेल्या मुलांसोबत घटनेच्या दिवशी आरोग्य केंद्रात पोहचली. मुळात, दोघांना शिक्षकांनी विद्यालयाबाहेर पडू नका, अशी सूचना केलेली होती. तरीही, हे दोघेही परवानगीशिवाय विद्यालयाबाहेर गेले.

विद्यार्थिनींना अस्वस्थ वाटू लागल्याने विद्यालयाच्या व्यवस्थापनाने घटनेच्या दिवशी संपूर्ण विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या बॅगांची झडती घेतली. त्यामुळे शाळा दुपारी नेहमीपेक्षा तासभर उशिराने सुटली. झडतीवेळी या सीआरच्या बॅगेत हे दोन व्हेप पेन आढळले. ज्या पाच मुलांचे निलंबन केले, त्यांची शैक्षणिक कारकीर्द तितकी चांगली नाही, असे समजते.

यापूर्वी शिक्षकांचे फोटो ‘मॉर्फ’ करून समाज माध्‍यमांवर

यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर काही दिवसांत, विद्यालयाच्या मैदानाबाहेर रस्त्यावर काही विद्यार्थ्यांची आपापसात कथित मारामारी झाली. तेव्हा, चौकशी करून व्यवस्थापनाने काही मुलांवर कारवाई केली होती.

तसेच, विद्यालयातील काही शिक्षकांचे चित्रविचित्र फोटो मॉर्फ करुन ते समाज माध्यमांत प्रसृत केले होते, असा दावा काही पालकांनी खासगीत बोलताना केला.

वरील घटना वगळता या विद्यालयात कायम शिस्‍त दिसून आली आहे. विद्यालयाचा निकाल हा नेहमीच शंभर टक्केच्या घरात असतो. या उच्च माध्यमिकमध्ये जवळपास १३०० विद्यार्थी शिकत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Edberg Pereira Assault Case: एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणी निलंबित PSI निलेश वळवईकरांवर गुन्हा दाखल; पुढील तपास सुरु

Sleep Problem: झोपण्यापूर्वीच्या 'या' चुका तुम्हाला बनवत आहेत आजारी! वेळीच व्हा सावध

Poseidon Nuclear Drone: हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट शक्तिशाली, पुतिन यांनी जगाला दाखवलं अणुशक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचं विनाशकारी रुप; अमेरिका-नाटो चिंतेत VIDEO

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

Rohit Sharma Record: मास्टर-ब्लास्टरचा मोडला मोठा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला सर्वात वयस्कर भारतीय फलंदाज; वनडे क्रमवारीत 'हिटमॅन'चे राज्य

SCROLL FOR NEXT