डिचोली: फेरीबोटीतून कार मागे घेताना फेरीधक्क्यावरून थेट नदीपात्रात बुडाली. सुदैवाने कारचालक वाचला. यामुळे मोठी दुर्घटना टळली.
सदर घटना सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास डिचोलीतील सारमानस फेरीधक्क्यावर घडली. मृत्यूच्या जबड्यातून वाचलेल्या कारचालक युवकाचे नाव टिपू बारपेत असे असून, तो पिळगाव येथील रहिवासी आहे. टिपू हा व्यवसायाने अभियंता असून, तो एका बांधकाम कंपनीत नोकरीला आहे. बुडालेल्या कारमध्ये कारचालक सोडल्यास अन्य कोणीही नव्हते.
दरम्यान, आजच्या घटनेमुळे पावणेदोन वर्षापूर्वी घडलेल्या दुर्घटनेची आठवण ताजी झाली. २८ नोव्हेंबर २०२३ या दिवशी याच फेरीधक्क्यावर कार बुडून धबधबा येथील कारचालक युवकाला प्राण गमवावे लागले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, टिपू हा आपल्या ‘फिगो’ कारमधून (जीए-०३-एच-४१८३) कामावरुन टोंक-सारमानस जलमार्गे फेरीबोटीतून पिळगाव येथे घरी आपल्या येत होता. टोंक फेरीधक्क्यावरून सुटलेली फेरीबोट सारमानस फेरीधक्क्याला लागल्यानंतर टिपू फेरीबोटीतून रिव्हर्समध्ये आपली कार फेरीधक्क्यावर घेत असता, अचानक ती पुढे जाऊन थेट नदीत घुसली.
घटनेची माहिती मिळताच डिचोली अग्निशमन दलाचे लीडिंग फायर फायटर उदय मांद्रेकर यांच्या नेतृत्वाखाली चालक ऑपरेटर अमोल नाईक यांच्यासह युवराज गावकर, हर्षद सावंत, गौरेश गावस आणि योगेश माईणकर या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने दीड तासाच्या प्रयत्नानंतर कार नदीतून बाहेर काढली.
कार नदीत पात्रात बुडतेय याची कल्पना येताच प्रसंगावधान ओळखून अभियंता असलेला चालक टिपू याने दार उघडून जीवाच्या आकांताने बाहेर पाण्यात उडी मारली. त्यावेळी त्या ठिकाणी असलेला फेरीबोटीचा खलाशी आणि अन्य एका स्थानिकाने नदीत उडी मारून त्याला बुडण्यापासून वाचविले. केवळ दैव बलवत्तर म्हणून मृत्यूच्या दाढेतून माझी सुटका झाली, असे घटनेनंतर कासावीस आणि भयभीत बनलेल्या टिपू याने सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.