Bicholim Municipal Council: डिचोली पालिकेच्या बायो-मिथानेशन प्रकल्पात गॅस निर्मितीचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. बायो-मिथेनेशन प्रकल्पातून ओल्या कचऱ्याद्वारे गॅस निर्मिती सुरू झाली असून बुधवारपासून (ता. ६) या प्रकल्पात स्वयंनिर्मित गॅसचा वापरही सुरू झाला आहे.
वीज आणि गॅस निर्मितीचा प्रयोग यशस्वी ठरल्याने लाखेरे येथील या प्रकल्पासह आता लवकरच तेथील कचरा प्रक्रिया प्रकल्पही स्वयंपूर्ण बनणार आहे.
वीज आणि गॅस निर्मितीमुळे कचरा प्रक्रिया प्रकल्प स्वयंपूर्ण होतानाच प्रकल्पावरील खर्चाचा भार कमी होणार आहे, असा विश्वासही पालिकेला आहे.
बुधवारी एका विशेष कार्यक्रमात मुख्याधिकारी सचिन देसाई यांनी गॅस जोडणीवर शेगडी पेटवली. नंतर शेगडीवर चहा करुन उपस्थितांनी चहाचा आस्वाद घेतला. नगराध्यक्ष कुंदन फळारी अन्य नगरसेवक आणि ''कामत गॅस''चे अतुल कामत उपस्थित होते.
पाच टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया
पुणे येथील ‘मेल्हम इकोज एन्व्हायरमेंट’ या कंपनीतर्फे लाखेरे येथे हा बायो-मिथेनेशन प्रकल्प उभारण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगातर्फे हा प्रकल्प उभारण्यात आला असून, त्याचा आर्थिक भार राज्य सरकारतर्फे उचलण्यात आला आहे.
दरदिवशी ५ टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची या बायोमॅथानेशन प्रकल्पाची क्षमता आहे. प्रकल्पातील डीजी उपकरणात ओला कचरा टाकल्यानंतर त्यावर प्रक्रिया होऊन कॉन्हव्हर्टमधून गॅस निर्मिती होत असून, या गॅसपासून दरदिवशी साधारण ३०० युनिट वीज निर्मिती होत आहे. या प्रक्रियेनंतर शिल्लक राहणाऱ्या टाकाऊ कचऱ्यापासून खत तयार होत आहे.
300 युनिट वीज निर्मिती
तयार होणारा गॅस कचरा प्रक्रिया प्रकल्पात काम करणाऱ्या कामगारांना चहा, स्वयंपाक आदी पदार्थ शिजवण्यासाठी वापरता येणार आहे. या प्रकल्पातून दरदिवशी ३०० युनिट वीज निर्मिती होणार आहे.
तयार होणारी वीज प्रकल्पासाठी तसेच पदपथ प्रकाशमय करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेच्या खर्चात बचत होणार आहे. खत विक्रीतून आर्थिक कमाईही होणार आहे.
वीज खर्चाची बचत होणार
बायो-मिथानेशन प्रकल्पातून निर्माण होणारी वीज सध्या याच प्रकल्पासाठी वापरण्यात येत आहे. आता ही वीज जवळच असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला पुरविण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव आहे.
कचरा प्रकल्पात वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर विकत वीज घ्यावी लागणार नाही. त्यावर सध्या होणाऱ्या खर्चाची बचत होणार आहे, असा विश्वास नगराध्यक्ष कुंदन फळारी आणि पालिकेचे मुख्याधिकारी सचिन देसाई यांनी व्यक्त केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.