Bicholim Municipality: शहराला चिखलाचे स्‍वरूप; जुन्‍या इमारती कोसळण्याच्या मार्गावर
Goa Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bicholim News: भरपावसात डिचोली शहरात अनेक समस्या

गोमन्तक डिजिटल टीम

‘सुंदर शहर’ अशी ओळख असलेल्या डिचोली शहरात भरपावसात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. मान्‍सूनपूर्व कामांना झालेला विलंब आणि विविध कामांनिमित्त फोडण्यात आलेले रस्ते यामुळे शहरात सध्या मोठी समस्या निर्माण झाली आहे.

पावसामुळे आता अपूर्ण कामेही करताना अडचण निर्माण होत असल्याने बहुतांश रस्त्यांच्या बाजूने चिखलमय दलदल निर्माण झालेली आहे. काही ठिकाणी गटारही उघडेच आहेत. एकंदरीत शहराला चिखलाचे स्‍वरूप प्राप्‍त झालेले आहे.

शहरात वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही विविध समस्यांना तोंड द्यावे लागतेय. जोरदार पाऊस पडला की रस्त्यांवरील चिखलात वाहने रुतण्याचे प्रकार घडत आहेत. पादचाऱ्यांना रस्त्यांवरुन ये-जा करताना चिखलाचा सामना करावा लागतोय.

भूमिगत वीजवाहिन्‍याटाकण्याचे काम सुरू असतानाच, आता नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी बोर्डे, व्हाळशी, हाऊसिंग बोर्ड आदी काही भागांत रस्ते फोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.

जोरदार पाऊस पडला की मुस्लिमवाडा, बसस्थानक परिसरात गटारे तुंबून पाणी रस्त्यांवरून वाहते. अलीकडच्या काही वर्षांत पावसाळ्यात अशी समस्या निर्माण झाली नव्हती, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून ऐकू येऊ लागल्या आहेत. तर, दुसऱ्या बाजूने लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे कामे लांबणीवर पडली, असा लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे.

जुन्‍या इमारती कोसळण्याच्या मार्गावर

शहरातील काही सरकारी इमारती अत्यंत जुन्‍या आणि जीर्ण बनल्‍या आहेत. गेल्‍या कित्‍येक वर्षांपासून बंद असलेली पोलिस खात्याची जुनी इमारत आणि लामगाव येथील वीज खात्याच्या जुन्या इमारतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.

या इमारती कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती व्‍यक्त केली जात आहे. वीज खात्‍याची जुनी इमारत मोडून तेथे नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव आहे. पोलिस स्थानकाच्या जुन्या इमारतीच्या जागेत सर्व सोयीनीयुक्त प्रशासकीय संकुल प्रकल्प बांधण्यात येणार आहे. तूर्तास या इमारती शेवटच्या घटका मोजत आहेत.

पालिकेचा पहिलावहिली बाजार संकुलाची इमारतही अत्यंत कमकुवत झालेली आहे. या इमारतीला तडे गेले असून, स्लॅबही कोसळत आहे. शहरातील पोर्तुगीजकालीन न्यायालयाच्या इमारतीची स्थिती काही वेगळी नाही. पावसाची गळती रोखण्यासाठी या इमारतीच्या छपराला ताडपत्रीचे आच्छादन घालण्यात आले आहे. अन्य काही इमारतीही कोसळण्‍याच्‍या मार्गावर आहेत.

कुंदन फळारी, नगराध्यक्ष (डिचोली)

यंदा निवडणूक आचारसंहितेमुळे मान्‍सूनपूर्व कामांना उशीर झाला, ही वस्तुस्थिती नाकारता येऊ शकत नाही. तरी देखील पालिकेच्या चौदाही प्रभागांत गटार उपसणे आदी स्वच्छतेची कामे करण्यात आलेली आहेत. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर घाईगडबडीने ही कामे करावी लागल्याने काहीसी समस्या निर्माण झाली. त्याबद्दल जनतेने समजून घेऊन सहकार्य करावे. जोरदार पाऊस पडला की काही ठिकाणी गटार तुंबत आहेत. जनतेला चांगली सेवा देण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरूच असतात.

डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार (डिचोली)

जनतेला मूलभूत सेवा उपलब्ध करुन देणे, हे लोकप्रतिनिधी या नात्याने माझे कर्तव्य आहे. भूमिगत वीज केबल टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वीजसमस्या सुटणार आहे. जुन्या जलवाहिनीमुळे शहरातील काही भागात पाणीपुरवठा व्यवस्थित होत नव्हता. त्यासाठी नवीन जलवाहिनीशिवाय पर्याय नव्हता. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. विकासकामांच्या बाबतीत जनतेने सकारात्मक भूमिका घ्यावी. पोलिस स्थानकाच्या जुन्या इमारतीच्या जागेत नवीन प्रशासकीय संकुल प्रकल्प उभा राहणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED ची गोव्यात मोठी कारवाई! चौगुले उद्योग समूहाच्या सात ठिकाणांवर छापे, कागदपत्रे जप्त

Goa: आई स्वयंपाकात व्यस्त असताना चिमुकलीचा वीज तारेशी संपर्क आला, झारखंडच्या मजुर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला

Panjim News: अग्निशमनच्या नागपुरातील अधिकाऱ्यांना गोव्यात प्रशिक्षण

Harvalem Caves And Waterfall: इतिहास आणि निसर्गाची आवड आहे? मग हरवळेतील धबधबा आणि पांडवकालीन गुहा नक्की पाहा

Goa Top News: म्हादई पात्राची पाहणी, अपघात आणि मॉन्सून अपडेट; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT