डिचोली: डिचोली शहरात मोकाट गुरांची समस्या कायम असून, वाठादेव ते व्हाळशी या चौपदरी बगलमार्गावर तर मोकाट गुरांची समस्या गंभीर आहे. लोकार्पण झाल्यापासून गेल्या वर्षभरात दहा गुरांचे बळी घेतलेल्या या बगलमार्गावर दिवसेंदिवस मोकाट गुरांचा उपद्रव वाढत असल्याचे आढळून येत आहे. काही वेळा वाहतूक कोडंी होत आहे.
वाठादेव ते व्हाळशी या चौपदरी बगलमार्गावर सर्वत्र सदैव मोकाट गुरे कळपाने संचार करताना दिसून येतात. रात्रीच्यावेळी या बगलमार्गावर काही ठिकाणी तर गुरे ठाण मांडून बसलेली आढळून येतात. वाठादेव येथील धोकादायक जंक्शनवर तर मोकाट गुरे बगलमार्गावरच ठाण मांडून असल्याचे दिसून येते.
बगलमार्गावर ठाण मांडणाऱ्या मोकाट गुरांमुळे दिवसेंदिवस मोठी समस्या निर्माण होत असून,अपघातांचा धोकाही वाढला आहे. या गुरांना वाचवताना वाहनचालकांना तर अक्षरशः कसरत करावी लागत आहे. निष्पाप गुरांचे बळी जातानाच वाहनचालकही गंभीर जखमी होत आहे.
गेल्यावर्षी जून महिन्यात लोकार्पण झाल्यानंतर वाठादेव-व्हाळशी बगलमार्ग वेगवेगळ्या कारणांवरून वादाचा विषय बनला आहे. गेल्या वर्षभरात या बगलमार्गावर झालेल्या वाहन अपघातात दहाहून अधिक गुरांचे बळी गेले आहेत.
बगलमार्गावरील वाठादेव जंक्शनवर तर बऱ्याचदा एकाचवेळी २५ हून अधिक गुरे कळपाने ठाण मांडून बसलेली असतात. मोकाट गुरांमुळे मोठा अनर्थ घडण्यापुर्वीच मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत असली, तरी ही जबाबदारी कोण स्वीकारणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.