
Bharat Arun On Mohammed Shami Retirement: भारतीय संघाचे माजी बॉलिंग कोच भरत अरुण यांनी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी बद्दल एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. भरत अरुण यांनी सांगितले की, 2014 मध्ये इंग्लंड दौऱ्यावेळी शमी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत होता. वैयक्तिक आयुष्यातील समस्यांमुळे तो खूप त्रस्त होता आणि याच काळात त्याने क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तत्कालीन मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि भरत अरुण यांच्या योग्य आणि समजूतदार निर्णयामुळे शमीचा क्रिकेटचा प्रवास लवकर संपण्यापासून वाचला.
भरत अरुण यांनी टाइम्स इंटरनेट सोबत बोलताना हा खुलासा केला. अरुण म्हणाले, “जेव्हा शमी वैयक्तिक आयुष्यातील समस्यांमुळे मोठ्या मानसिक तणावातून जात होता, तेव्हा रवी शास्त्री यांनी त्याला वेळोवेळी फोन करुन सांगितले होते की, तुला कोणत्याही मदतीची गरज असेल तर तात्काळ मला कळव. 2014 मध्ये इंग्लंड (England) दौऱ्याच्या ठीक आधी आम्हाला अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळायचा होता. त्याआधी शमी फिटनेस टेस्टमध्ये फेल झाला आणि त्याला संघातून वगळावे लागले. त्यामुळे तो खूप निराश झाला. त्याचवेळी, तो माझ्या रुममध्ये आला आणि म्हणाला, ‘पाजी, मी क्रिकेट सोडण्याचा विचार करतोय. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील समस्या त्या वेळी खूप गंभीर होत्या.”
पुढे बोलताना भरत अरुण यांनी सांगितले, “मी त्याला विचारले क्रिकेट सोडून तू काय करणार आहेस? आज तू जे काही आहेस आणि जे काही यश मिळवले आहेस ते फक्त क्रिकेटमुळेच.’ त्यावेळी शमी खूप रागात होता. त्यानंतर मी त्याला रवी शास्त्री यांच्याकडे घेऊन गेलो. रवी शास्त्रींनी शमीला सांगितले, ‘जर तू रागात आहेस आणि तुझ्या हातात चेंडू आहे, तर तू तुझा राग चेंडूवर काढ. तू यासाठी क्रिकेट सोडून देणार आहेस का की, तुझे शरीर फिट नाही?’”
भरत अरुण यांनी पुढे सांगितले की, “ त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून शमीला बंगळूरु येथील नॅशनल क्रिकेट ॲकॅडमी (NCA) मध्ये पाठवले. आम्ही एनसीएमधील अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितले की, शमीच्या गोलंदाजीवर नव्हे, तर त्याच्या फिटनेसवर काम करा. तीन आठवड्यांनंतर शमीचा मला फोन आला. शमीची जिद्द आणि रवी शास्त्रींचा आत्मविश्वास यामुळेच त्याचे करिअर वाचले.”
आज मोहम्मद शमी (Mohammed Shami) हा जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील समस्या आणि फिटनेसची आव्हाने त्याला थांबवू शकली नाहीत, कारण त्याला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाले. भरत अरुण आणि रवी शास्त्री यांच्या त्या एका निर्णयाने केवळ एका खेळाडूचा करिअरच नव्हे, तर भारतीय क्रिकेटला एक मौल्यवान खेळाडू दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.