मडगाव: पांडवसडा-रिवण येथे चतुर्थीच्या उत्साहात शोककळा पसरवणारी दुर्घटना घडली. शेतात रानडुकरे घुसू नयेत म्हणून लावलेल्या विजेच्या तारेशी संपर्क आल्याने राजेंद्र गावकर (४६) व मोहनदास गावकर (४०) या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. गावकर बंधू हे दुग्ध व्यवसाय करत असत.
बुधवारी संध्याकाळी गुरांसाठी चारा कापण्यासाठी ते झामळेमळ-शिवसुरे या जंगल परिसरात गेले होते. रात्री उशीर होऊनही ते परत न आल्याने शोध घेतला असता, गावकऱ्यांना ते दोघेही जमिनीवर निपचित अवस्थेत सापडले. त्यांना तातडीने आरोग्य केंद्रात हलविण्यात आले; मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
घरी परतताना एका भावाचा पाय शेताच्या कडेला टाकलेल्या विजेच्या तारेला लागला. हे पाहून दुसरा भाऊ त्याच्या मदतीस धावला, पण तोही विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
मृत गावकर बंधू हे रिवण जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर यांचे नातेवाईक असून त्यांनीच रात्री उशिरा पोलिसांना घटनेची माहिती दिली. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव जिल्हा इस्पितळात ठेवण्यात आले आहेत. महिला उपनिरीक्षक जॉयसी कार्व्हलो पुढील तपास करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.