पणजी : भाटलेतील रस्ता बंद झाल्याने या भागातून कुजिरा येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बससेवेचा मार्ग वळविला गेला आहे. त्याचा फटका पालकांना बसला असून, पाल्यांना बससाठी सोडण्याकरिता पालकांना कसरत करावी लागत आहे. या कसरतीमुळे पालकांमध्ये सध्या नाराजीचा सूर आहे.
भाटलेतील मुख्य रस्त्याची स्मार्ट सिटीच्या कामांमुळे चाळण झाली आहे. भूमिगत मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम व मॅनहोलचे काम करण्यास खड्ड्यांत पाणी साचत असल्याने विलंब लागत आहे. हा परिसर पूर्वीचा दलदलीचा असून, नव्याने रस्ता व वसाहती निर्माण झालेल्या आहेत.
त्यामुळे काही फूट खोदकाम करताच ओलावा सुरू होतो आणि अधिक खोदकाम करताच दलदलीची माती काढावी लागते. काहीवेळा पाणी साचण्याचे प्रकार घडत असल्याने पाणी उपसा केल्यानंतरच पुढील काम करावे लागत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून हे काम सुरू आहे.
त्यामुळे या मार्गावरून कुजिरा येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना फोन्तेईन्हास येथील चर्चजवळ यावे लागते. तेथून शाळा बसेस मुलांना घेऊन जातात. तांबडी मातीपासून अगदी सटी मंदिरापर्यंतच्या विद्यार्थ्यांना फोन्तेईन्हासपर्यंत यावे लागते.
कुजिरा येथे प्राथमिक व माध्यमिकमधील पाचवी व सहावीपर्यंतच्या मुलांना सोडण्यासाठी पालकांना फोन्तेईन्हास येथे किंवा बस चुकली किंवा आलीच नाहीतर थेट कुजिरा येथे जावे लागत आहे.
चारचाकी वाहने आल्तिनोवरून...
भाटलेतील मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे आणि मॅनहोलच्या महत्त्वाच्या कामाचा टप्पा सुरू झाल्यानंतर चारचाकी वाहनधारकांना मारुतीगडावरून मळ्यातून ये-जा करावी लागत आहे. काम सुरू झाल्यानंतर येथील वाहतुकीविषयी सर्व काही सावळागोंधळ होता.
परंतु त्यानंंतर ओरड सुरू झाली आणि येथे होमगार्ड नेमण्यात आले, परंतु त्यांचे कोणी ऐकत नसल्याने आता वाहतूक पोलिसांची नेमणूक झाली. त्यामुळे चारचाकी वाहनधारकांची मनमानी कमी झाली आहे. त्यांना आता आल्तिनोवरून वळसा घालून जावे लागत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.