पणजी: चोडण येथील धक्क्यावर नांगरून ठेवलेली बेती फेरीबोट का बुडाली, याचा तपास आता पुन्हा बंदर कप्तान खाते करणार आहे. अंतर्गत जल वाहतूक मंत्री सुभाष फळदेसाई यांनी ही माहिती दिली. बेती फेरीबोट पाण्याबाहेर काढली तरी ती घटना का घडली, याविषयी सरकार कोणत्याही निष्कर्षाप्रत आलेले नाही. फळदेसाई यांना चौकशीचे काय झाले, अशी विचारणा केल्यावर ते म्हणाले, नदी परिवहन खात्याच्या संचालकांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत मानवी चुकीमुळे ही दुर्घटना घडल्याचा निष्कर्ष आहे.
नदीला भरती आली तेव्हा धक्क्यावरील खांबाला बांधलेले दोरखंड घट्ट करावे लागतात. तसे ते केले होते. मात्र नंतर ओहोटी आली तेव्हा ते दोरखंड सैल केले गेले नाहीत. यामुळे फेरीबोट एका बाजूने कलली व बुडाली असे प्राथमिक चौकशीत आढळले आहे.
फेरीबोटीला कुठेही छिद्र पडलेले नव्हते, त्यामुळे कलल्याशिवाय अन्य कोणतेही कारण फेरीबोटीत पाणी घुसण्यासाठी नव्हते हेही सिद्ध होते.
नियमानुसार या घटनेची बंदर कप्तान खात्याने चौकशी केली पाहिजे. त्याबाबतचा तसा आदेश त्यांना देण्यात येणार आहे.
लाखोंचा खर्च; अहवाल जाहीर व्हावा!
बुडालेल्या फेरीबोटला पाण्याबाहेर काढण्यासाठी सरकारला लाखो रुपयांचा खर्च करावा लागला. यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय झाल्याची टीका होत आहे. चौकशी अहवालात दोषी व्यक्ती अथवा अधिकारी कोण हे स्पष्ट करण्यात आले आहे का, याबाबत सरकारने अजून काहीच खुलासा केलेला नाही.
त्यामुळे यामागे कोण दोषी, यावर अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे. सार्वजनिक हित लक्षात घेता, सदर अहवाल पारदर्शकपणे जाहीर करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.