Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Government: राज्याला महसूल देणाऱ्या समुद्रकिनाऱ्याकडेच दुर्लक्ष

बाणावलीत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे दक्षिण गोव्यातील समुद्र किनारे युगुलांसाठी धोकादायक ठरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यातील समुद्रकिनारे (Goa beaches) राज्य सरकारला सर्वात जास्त महसूल प्राप्त करून देतात. गोव्याला 105 किमी. ची समुद्र किनापट्टी लाभली आहे. पर्यटनातून गोवा (Tourism in Goa) सरकारला महसुलही मिळतो आहे. मात्र याच किनाऱ्यांकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची लुट होणे, मुलींवर होणारे अत्याचार या घटना सर्रास घडत असतात त्यापैकी काही उघडीस येतात तर काही तशाच बदनामीच्या भीतीने दडपून राहतात. (Beaches in South Goa are becoming dangerous for young people)

दरम्यान बाणावलीत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे दक्षिण गोव्यातील समुद्र किनारे युगुलांसाठी धोकादायक ठरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अशा निर्जन किनाऱ्यावर लोकांना जाण्यास प्रतिबंध करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. रविवारी पहाटे ही दुर्घटना घडली ती जागा निर्जन असून, आपल्या मित्रांसमवेत त्या दोन मुली उशिरापर्यंत तिथे होत्या, अशी माहिती मिळाली आहे. वास्तविक हा गट सुमारे 12 जणांचा होता. मात्र इतर सगळे उठून गेल्यावर तिथे फक्त त्या दोन मुली आणि तीन मुलगे असे पाचजणच बाकी होते, अशी माहिती मिळाली आहे.

तीन वर्षांपूर्वी या किनाऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या बेतालभाटी येथील सनसेट बीचवर अशाचप्रकारे एका 20 वर्षीय युवतीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला होता. त्यावेळीही ती युवती आपल्या प्रियकाराबरोबर तिथे आली होती आणि तिथेही त्या आरोपींनी त्या दोघांना धमकावत त्या युवतीवर अतिप्रसंग केला. त्यानंतर त्यांनी त्या कृत्याचे केलेले चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत त्या युवतीच्या प्रियकाराकडे पैशांची मागणी केली होती. पोलिसांनी या प्रकरणी नंतर ईश्वर मकवाना व अन्य दोघांना अटक केली होती. मात्र मुख्य आरोपी मकवाना नंतर त्याला उपचारासाठी इस्पितळात दाखल केले असता पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला होता.

बेतालभाटी येथील तो किनाराही असाच निर्जन असून त्याच्या एका वर्षांपूर्वी तिथे एका प्रियकराने आपल्याच प्रेयसीचा गळा दाबून खून केला. मात्र, नंतर तो पुराव्याअभावी सुटला होता.सामूहिक बलात्कार घटनेची तारीख 25 मे 2018 अशी होती आणि या घटनेनंतर या किनाऱ्यावर विजेची रोषणाई वाढवावी, अशी मागणी झाली होती. पण नंतर त्या संदर्भात फारसे काही झाले नव्हते. आता जो अतिप्रसंग घडला आहे तिथेही रात्रीचा काळोखच असतो.

एका मुलीने गाडीतून पळ काढला होता, पण...

आपल्यावर अतिप्रसंग होतो याची जाणीव झाल्यामुळे एका मुलीने त्या नराधमांच्या गाडीतून दार उघडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. जिवाच्या आकांताने ती समुद्राच्या दिशेने पळून जात असताना एका संशयिताने तिचा पाठलाग केला. तिला समुद्र किनाऱ्यावर पडकून जवळच्या झाडीत त्याने तिच्यावर बळजबरी केली, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

या प्रकरणी अटक केलेल्या चार आरोपींपैकी आसिफ हथेली आणि राजेश माने या दोघांनी प्रत्यक्ष बलात्कार केला तर आणखी एका संशयिताचा सहभाग विनयभंग करण्यात होता अशी माहिती पुढे आली आहे. चौथा संशयित फक्त गाडीकडेच उभा होता, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

पोलिसांनी पीडितांचे हा अत्याचार होत असताना परिधान केलेले कपडे पुरावे म्हणून जप्त केले आहेत. मात्र ज्या ठिकाणी हा अत्याचार झाला त्या ठिकाणी पोलिसांना काहीच सापडले नाही, अशी माहिती मिळाली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांपैकी एक जण एका सरकारी खात्यात वाहनचालक म्हणून काम करत होता, अशी माहिती मिळाली आहे.

या दोन मुलींबरोबर आणखी तीन मुलगे तिथे उपस्थित होते. त्यापैकी एकाच्या तोंडावर एका संशयिताने बाटलीत असलेली दारू फेकून त्याला मारहाण केली. त्याच्या डोळ्यासमोर एकाने एका मुलीचा विनयभंग केला. त्यानंतर त्या मुलीला ओढत घेऊन ते गाडीत गेले; मात्र त्या मुलीने गाडीचा दरवाजा उघडून जिवाच्या आकांताने पळ काढला. पण, तीही ही धडपड अखेर अयशस्वीच ठरली.

जीवरक्षक होते कुठे?

जो प्रकार झाला आहे, तो भयानक स्वरूपाचा आहे. अटक केलेल्या संशयितांना कुठलीही दया माया न दाखविता त्यांच्यावर कडक कारवाई होण्याची गरज समाज कार्यकर्त्या आवदा व्हिएगस यांनी व्यक्त केली. हे संशयित पहाटेच्यावेळी समुद्र किनाऱ्यावर दारू कसे पीत बसले होते. ज्या ठिकाणी हा अतिप्रसंग घडला तिथेच जीव रक्षकांचा मनोरा असून, हे जीवरक्षक रात्रीच्या पाहऱ्यावर नव्हते का आणि जर असले तर त्यांच्या लक्षात हा प्रकार कसा आला नाही? असा सवाल व्हिएगस यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT