वास्को: बायणा-वास्को येथे टाकण्यात आलेल्या दरोड्याची पद्धत पाहता स्थानिकांच्या सहभागाशिवाय इतका नियोजनबद्ध दरोडा शक्य नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे. ‘तो स्थानिक कोण?’ हा प्रश्न आता अधिक तीव्रतेने समोर येत असून त्याचे उत्तर दरोडेखोरांच्या अटकेनंतरच मिळेल, असेही बोलले जात आहे.
बायणा येथे ‘चामुंडी आर्केड’च्या सहाव्या मजल्यावर सागर नायक राहतात, तर त्यांचे बंधू पाचव्या मजल्यावर राहतात. इमारतीतील इतर मजल्यांवर विविध फ्लॅटधारक राहत असल्याने कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीसाठी ही इमारत अगदी सहज न्याहाळणे व त्यानंतर दरोडा टाकणे खूप कठीण आहे.
दरोडेखोरांनी इमारतीच्या मागील बाजूने प्रवेश केला. मुख्य दरवाजा फोडण्याचा प्रयत्न न करता त्यांनी थेट किचनरूमची खिडकी फोडली. कारण त्या खिडक्यांना ग्रील्स नव्हते. सिलिंडरवर उभे राहून ते आत शिरले आणि थेट बेडरूमच्या दिशेने गेले. सागर नायक यांच्या फ्लॅटमध्ये तीन बेडरूम आहेत. मात्र ते कोणत्या बेडरूममध्ये असतात हे दरोडेखोरांना कसे कळले? हा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
फ्लॅटमध्ये कपाटातील वस्तू लंपास करण्यात आल्या. मात्र त्यांना दागिने व रोकड मिळाली नाही. तेव्हा दरोडेखोरांनी थेट तिजोरीची चावी मागितली. म्हणजेच त्यांना फ्लॅटमध्ये तिजोरी असल्याची पूर्ण माहिती होती.
इमारतीच्या मागील बाजूचा मार्ग अनेकांना माहीत नसतो. मागे मोडकळीस आलेली इमारत असून तेथे क्वचितच कोणी राहते. त्या इमारतीत काही महिन्यांपूर्वी एका वृद्ध महिलेचा खून करण्यात आला होता. अशा निर्जन जागेतून सरळ चामुंडी आर्केडच्या अंगणात उड्या मारून जाण्याचे धाडस फक्त परिसराची चांगली माहिती असलेल्यांनाच शक्य आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
दरोडा घातल्यानंतर दरोडेखोर सागर नायक यांची कार घेऊन जाणार होते. मात्र कारची चावी खाली पडल्याने त्यांनी मागच्या वाटेने पळ काढला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक दरोडेखोर अगदी सहजपणे परिसराचा मार्ग कापताना दिसतो, यावरून त्याला परिसराचे जवळून ज्ञान असल्याचे स्पष्ट होते.
नियोजनबद्ध आखला प्लॅन
फ्लॅटमधील तिजोरी, बेडरूमची रचना, मागचा मार्ग, अगदी कोणत्या ठिकाणी प्रवेश सुलभ आहे हे दरोडेखोरांना कसे माहीत?, या फ्लॅटमध्ये कधी तरी काम केलेल्या व्यक्तीलाच संपूर्ण आराखडा माहीत असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या सर्व माहितीचा तपशील मिळाल्याशिवाय दरोडेखोर इतक्या आत्मविश्वासाने वावरूच शकत नाहीत, असे नागरिकांचे म्हणणे.
रस्ते, परिसराची माहिती
दरोडेखोरांनी मागच्या बाजूने उतरून कमी वर्दळीच्या रस्त्याने बायणा किनाऱ्याकडे मोर्चा वळविला. ही दिशा, ही गल्ल्या-मोहल्ल्यांची माहिती बाहेरच्या कुणाकडे असणे शक्य नसल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.