वास्को: बायणा येथील सिव्हरेज पंपिंग स्टेशनमधील पंप नादुरुस्त झाल्याने सांडपाणी गटार व नाल्यांतून वाहू लागले असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे नागरिक हैराण झाले असून असह्य वासामुळे अनेकांना घरांची दारे-खिडक्या बंद ठेवावी लागत आहेत.
पै नर्सिंग होमजवळ, गोवा शिपयार्डसमोर, खारीवाडा व मायमोळे येथील सांडपाणी बायणा पंपिंग स्टेशनमध्ये जमा होते. तेथून पुढे काटे-बायणा किनाऱ्यावरील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाकडे ते वळवले जाते. मात्र या पंपिंग स्टेशनमधील चारही पंप जुने व कमी क्षमतेचे असल्याने सांडपाणी पूर्ण क्षमतेने पुढे पाठविले जात नाही. याशिवाय पंप वारंवार नादुरुस्त होण्याच्या समस्या निर्माण होत आहेत.
एक पंप काही दिवसांपूर्वी बंद पडला. त्यामुळे सांडपाणी उपसा पूर्णपणे ठप्प झाला आहे. परिणामी सांडपाणी उलट प्रवाहाने गटार व नाल्यांतून बाहेर पडत असून काही ठिकाणी ते नागरिकांच्या घरांच्या दारापर्यंत पोहोचले आहे. या प्रकारामुळे स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सासमोळे येथील मोठ्या नाल्यातही मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचल्याने तेथील नागरिकांना दुर्गंधीचा तीव्र त्रास सहन करावा लागत आहे. या नाल्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असले तरी सांडपाणी साचल्यामुळे काम ठप्प ठेवावे लागले आहे. त्यामुळे स्थानिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नादुरुस्त पंप दुरुस्तीसाठी पाठवण्यात आला असून तो अद्याप कार्यान्वित झालेला नाही. संबंधित पंप दुरुस्त होऊन परत आल्यास तातडीने पंपिंग स्टेशनमध्ये बसवून सांडपाणी उपसा पुन्हा सुरू करण्यात येईल, अशी माहिती संबंधित अभियंत्याने दिली आहे. ही समस्या लवकर न सुटल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.