वास्को: बायणा येथील चामुंडी आर्केड इमारतीमध्ये सहाव्या मजल्यावर राहणारे सागर नायक यांच्या फ्लॅटवर सहा-सात दरोडेखोरांच्या टोळीने सोमवारी (ता. १७) मध्यरात्री अडीचच्या सुमारास दरोडा घालून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड मिळून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. यावेळी दरोडेखोरांना सागर नायक यांच्यासह त्यांची पत्नी हर्षा आणि मुलगी नक्षत्रा यांनाही बेदम मारहाण केली.
यापूर्वी दोनापावल आणि नंतर म्हापसा येथे झालेल्या सशस्त्र दरोड्यानंतरची ही तिसरी भयावह घटना आहे. दरोडेखोरांच्या हल्ल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या सागर नायक यांच्यासह हर्षा आणि नक्षत्रा यांनाही उपचारासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळात नेले होते.
तेथील उपचारानंतर हर्षा आणि नक्षत्रा यांना घरी पाठविण्यात आले, तर सागर यांच्यावर उपचार सुरू आहेत. सागर हे मुरगाव बंदर प्राधिकरणाचे निवृत्त अधिकारी आहेत. ते आईस्क्रिम वितरक असून त्यांची मार्केटींग एजन्सी आहेत.
दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी वास्को, मुरगाव, वेर्णा, मडगाव येथील पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहे. हे दरोडेखोर वीस ते पंचवीस वर्षे वयोगटातील आहेत. दरोडा अतिशय नियोजनबद्धरित्या टाकल्याने त्यांनी या इमारतीची तसेच सागर नायक यांच्या फ्लॅटची नीट रेकी केली असावी.
तसेच या दरोडेखोरांमध्ये स्थानिकाचाही समावेश असला पाहिजे, असा कयास व्यक्त करण्यात येत आहेत. दरोडा घातल्यावर मुख्य रस्त्याने न जाता ते मागील बाजूने गेले असावेत. मागील बाजूस निर्जन भाग आणि विनावापर इमारत आहे.
दरोडेखोरांनी नायक यांच्या फ्लॅटमध्ये मध्यरात्री २.१० वाजता प्रवेश केला. त्यानंतर २.५९ वाजता ते ऐवज घेऊन पळाले. या पाऊस तासात त्यांनी अतिशय नियोजनबद्धरित्या ऐवज लंपास केला. जाताना त्यांनी हर्षा यांचा मोबाईलही हिसकावून घेतला. त्यानंतर त्या दरोडेखोरांनी कारची चावी घेतली. मात्र, ते लिफ्टने खाली आल्यावर धावपळीत चावी जमिनीवर पडल्याने ते कार नेऊ शकले नाहीत. जाण्यापूर्वी दरोडेखोरांनी सर्वांच्या तोंडात कापडी बोळे घालून हात मागे बांधले. तसेच फ्रिजमधील आईस्क्रिमचा एक बॉक्सही नेला.
दरोडेखोर पळून गेल्यावर नक्षत्राने स्वत:ची कशीबशी सुटका करून घेतली. त्यानंतर तिने त्या खिडकीतून बाहेर येऊन खालच्या मजल्यावर राहणाऱ्या आपल्या काकांकडे आणि शेजाऱ्यांकडे मदत मागितली. दरोडेखोरांनी दरोडा टाकण्यापूर्वी शेजाऱ्यांच्या फ्लॅटच्या दारांना बाहेरून कड्या लावल्या होत्या. त्या कड्या नक्षत्राने काढल्यावर शेजारी जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
या इमारतीला लागूनच साईराज इमारत आहे. जेव्हा सागर यांना बांधून एका दरोडेखोराने गॅलरीत नेऊन बसविले. यावेळी सागर यांनी ओरडायला सुरुवात केली. तेव्हा शेजारच्या इमारतीमधील एका युवकाने ते पाहिले आणि त्यानेही पोलिसांना माहिती दिली. अशा रितीने पोलिसांना अगदी कमी वेळेत माहिती मिळाली. त्यामुळे पोलिस त्वरित आले आणि त्यांनी तपासकामाला सुरुवात केली.
दरोडेखोरांनी ओळख पटू नये, यासाठी हेल्मेट व मास्क घातले होते. तरीही लिफ्टनजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्यांच्या हालचाली कैद झाल्या. दरोडा घातल्यावर दरोडेखोर मागील बाजूने जाताना त्यांच्या हालचाली या कॅमेऱ्यात दिसत आहेत. या हालचाली पुसट असल्याने सध्या तरी त्यांची ओळख पटलेली नाही.
इमारतीच्या मागील बाजूने प्रवेश
१ चामुंडी आर्केड इमारतीच्या ए ब्लॉकमध्ये पाच, तर बी ब्लॉकमध्ये सात मजले आहेत.
२ सागर नायक बी ब्लॉकच्या सहाव्या मजल्यावर राहतात.
३ दरोडेखोरांनी या इमारतीची व आसपासच्या भागाची रेकी केली असावी.
४ त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरा असलेल्या पुढील प्रवेशद्वारातून न येता ते मागील बाजूने इमारतीच्या परिसरात आले.
५ कुंपणावरून वर येण्यासाठी त्यांनी लाकडी शिडीचा वापर केला. ती शिडी तेथे होती, की त्यांनी आणली होती, हे स्पष्ट झालेले नाही.
६ त्यानंतर लिफ्टचा वापर करून ते सहाव्या मजल्यावर सागर नायक यांच्या फ्लॅटसमोर आले.
७ त्यांनी फ्लॅटचा दरवाजा न फोडता किचनरुमकडे मोर्चा वळविला. या ठिकाणी एक स्टोअर रुम आहे.
८ त्यांनी फोल्डिंग होणारे शटर तोडल्यावर तेथील ग्रील्स नसलेल्या खिडकीची काच फोडून आत प्रवेश केला. तेथून ते सागरच्या बेडरूमकडे आले.
हेल्मेट व मास्क घातलेले दरोडेखोर सागर यांच्या बेडरूममध्ये घुसताच सागर यांना जाग आली.
त्यांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला; परंतु हातात लोखंडी सळी आणि पाईप असलेल्या त्या दरोडेखोरांसमोर त्यांचा निभाव लागला नाही.
दरोडेखोरांपैकी एकाने सागर यांच्या डोक्यावर लोखंडी सळीचे प्रहार केले. त्यामुळे सागर रक्तबंबाळ झाले.
यावेळी दरोडेखोरांनी वर्षा आणि नक्षत्रा यांनाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
वर्षा यांची वृद्ध आई शेजारच्या खोलीत झोपली होती. त्या खोलीत जाऊन तिलाही पलंगावरून खाली पाडल्याने त्या घाबरून बेशुद्ध झाल्या.
सागर यांच्याकडे त्या दरोडेखोरांनी तिजोरीच्या चाव्या मागितल्या. मात्र, सागर यांनी चाव्या देण्यास नकार दिला.
‘तुला ठार मारतो’ असे सांगून सागर यांच्या डोक्यावर पुन्हा लोखंडी सळीचे प्रहार करण्यात आले. लाथांनी तुडविण्यात आले. धमकावण्यात आले.
तेव्हा ‘त्याला मारू नका, पैशासाठी एखाद्याचा जीव घेऊ नका’ असे सांगून हर्षाने चाव्या दिल्या.
दरोडेखोरांनी कपाटे फोडून आतील वस्तू अस्ताव्यस्त टाकल्या. चाव्या मिळाल्यावर त्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोकड घेऊन पळ काढला.
नायक कुटुंबीयांनी दिवाळीनिमित्त बँक लॉकरमधून दागिने आणले होते. आता पर्तगाळ मठाचा उत्सव असल्याने त्या दिवशी घालण्यासाठी दागिने घरातच ठेवले होते. त्यावरच दरोडेखोरांनी डल्ला मारला. जाताना हर्षा यांच्या अंगावरील दागिने, हातातील सोन्याच्या बांगड्या, बोटांमधील अंगठ्या वगैरेही हिसकावल्या.
सध्या आम्ही तपास करीत आहोत. निरनिराळ्या गोष्टींचा विचार करून त्याची पडताळणी करण्यात येत असल्याचे दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांनी सांगितले. तपास सुरू असल्याने त्यांनी अधिक बोलणे टाळले. पोलिसांच्या फॉरेन्सिक पथकाने फ्लॅटची तपासणी केली. श्वान पथकाचा वापर करण्यात आला. दरोडेखोरांनी मुख्य रस्त्याचा वापर न करता आडवाटेने पळ काढल्याने श्वानपथक दरोडेखोरांचा माग काढू शकले नाही.
गोव्यात घातलेला आणखी एक सशस्त्र दरोडा हा राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर प्रकाश टाकतो. प्रभावी नाकाबंदी आणि पोलिस गस्त नसल्यामुळे सार्वजनिक सुरक्षेविषयी चिंता निर्माण झाली आहे. यापुढे, गुन्ह्यांचा शोध घेण्याचा अभिमान बाळगू नका, तर प्रतिबंधावर लक्ष केंद्रित करा. सुरक्षितता हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे; परंतु भाजप सरकार लोकांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहे.युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.