राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला, पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जनही झाले. पण या उत्साहावर पाणी फिरवणारी एक गंभीर चर्चा आता सुरू झाली आहे. ज्या खड्ड्यांतून गणराय घरी आले, त्याच खड्ड्यांतून त्यांना निरोप दिला गेला. सरकार दरवर्षी ''खड्डे बुजवू'' असे आश्वासन दिले देते, पण सण-उत्सव आले तरी परिस्थिती तशीच राहते. त्यामुळे आता ‘सरकारला खड्डे बुजवण्यात नाही, तर फक्त सणांच्या राजकारणात रस आहे’ अशी चर्चा सुरु झाली आहे. ही नाराजी लोकांच्या मनात खोलवर रुजत चालली आहे. काही लोक गंभीरपणे बोलत आहेत, की या खड्ड्यांचा फटका येत्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला बसू शकतो. आता हे तात्पुरते आहे कि नाही हे काळच ठरवेल! ∙∙∙
मागील काही वर्षांपूर्वी नारळ महागले होते, त्यावेळी विविध कारणे पुढे आली होती. आताही ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर नारळ महागल्याचा प्रकार पुढे आला आणि सरकारला आपल्या फलोत्पादन विक्री केंद्रातर्फे नारळाची विक्री करावी लागली. आता ते नारळ महाग की स्वस्त? हे खरेदीदारांनी ठरवायचे होते. सण उत्सव आल्यानंतर लागणाऱ्या वस्तू घाऊक विक्रेते अगोदरच साठा करून ठेवतात. नारळाचाही साठा करून ठेवला गेला असावा असा अंदाज काही विक्रेत्यांनीच व्यक्त केला आहे. घाऊक खरेदीदार काही दररोज खरेदी करीत नाहीत, तर ते अगोदरच गोडाऊनमध्ये साठा ठेवतात, त्यामुळे चतुर्थीच्या काळात नारळाची आवक कमी झाल्याचे चित्र तर रंगवले नाही ना? असाही प्रश्न आहे. वीस ते तीस रुपयांना मिळणारा नारळ ग्राहकांना दररोजची गरज म्हणून अधिक पंधरा वीस रुपये देऊन खरेदी करावे लागत आहेत, त्यामुळे खरोखरच नारळ महागला कि मुद्दाम दर वाढविला, याचे उत्तर व्यापाऱ्यांनाच माहीत असणार आहे. ∙∙∙
कर्नाटक ते गोवा या दुहेरी रेल्वेमार्गासाठी गोव्यात आवश्यक असणाऱ्या जमिनीविषयी रेल्वेकडून अधिसूचना काढली आहे. त्यामुळे हा मार्ग कोळसा वाहतुकीसाठीच असल्याने विरोधी पक्षांसह पर्यावरण प्रेमी संस्था, बिगर सरकारी संघटनांकडून त्याविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. विशेष बाब म्हणजे कोळशाच्या जेव्हा-जेव्हा विषय निघतो, तेव्हा तेव्हा मनोहर पर्रीकरांचा व्हिडिओ व्हायरल होतो. त्या व्हिडिओत मनोहर पर्रीकर हे कसल्या परिस्थितीत दुहेरी रेल्वे मार्ग होणार नाही, आपण त्यास परवानगी देणार नाही, असे निक्षून सांगतात. त्यामुळे त्यावेळची भाजप सरकारची त्यांची भूमिका ही दुहेरी रेल्वेमार्गाविरोधात होती असे स्पष्ट दिसते. आत्ताच्या भाजपची भूमिका परस्पर विरोधी असल्याचे दाखविण्यासाठी विरोधी पक्ष, विविध संघटनांकडून त्या व्हिडिओचा वापर होत आहे. यावरून सामान्यांनी कसा अर्थ घ्यायचा तो घ्यावा, असेच यातून त्यांना सूचवायचे असावे. ∙∙∙
राज्यात पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले आणि या निमित्ताने राजकीय वर्तुळात एक वेगळीच लगबग पाहायला मिळाली. अनेक नेते कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या घरी जाऊन भेट घेतली. वरवर पाहता, हे सगळे सलोख्याचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण करत होते. पण आतून मात्र एक वेगळीच चर्चा सुरू आहे. ‘नेता कार्यकर्त्याच्या दारावर, याचा अर्थ नक्की काय?’ या प्रश्नाची चर्चा राजकीय गप्पांच्या अड्ड्यांवर सुरू झाली आहे. एकीकडे ‘बघा, आपला नेता किती साधा आहे, आपल्या घरी आला,’ अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करतात. पण दुसरीकडे, काही अनुभवी कार्यकर्ते मिश्किलपणे म्हणतात, "हे सगळे निवडणुकीच्या तोंडावरचे सोपस्कार आहेत. गणपतीच्या दर्शनाला आले म्हणजे काम झाले असे नाही. त्यामुळे ‘सण-उत्सव आले की नेत्यांना कार्यकर्त्यांची आठवण येते,’ असे बोलणे अनेक ठिकाणी ऐकू येत आहे. ∙∙∙
चोडण बेटावर जाण्यासाठी रो रो फेरीबोटीमध्ये स्थानिकांच्या ‘कार’ना ३० रुपयांऐवजी १० रुपये तिकीट आकारण्याचा निर्णय झाला आहे. रो रो फेरीबोटी आहेतच इतर फेरीबोटींची संख्या वाढवण्याचेही सरकारने मान्य केले आहे. आणखीन वर्षभराने विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजू लागणार आहेत. तेव्हा उमेदवारांना आश्वासन देण्यासाठी पुलाचे काम मागे ठेवण्यात आल्याची उपहासात्मक टीका ऐकू येऊ लागली आहे. दररोज ३००-४०० कार फेरीबोटीतून जात असल्या तरी ७०-८० का स्थानिकांच्या असतात. म्हणजे चोडण बेटावर जातो, तरी कोण? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. ∙∙∙
गत विधानसभा निवडणुकीत कुडचडे मतदारसंघातून बलाढ्य नीलेश काब्रालांविरोधात अवघ्याच मतांनी पराभूत झाल्यानंतर काँग्रेसचे युवा नेते अमित पाटकर एका रात्रीत चर्चेत आले. त्यानंतर काँग्रेसने मागचा पुढचा कोणताही विचार न करता पाटकरांना थेट प्रदेशाध्यक्षाच्या खुर्चीत बसवले. प्रदेशाध्यक्ष या नात्याने सुरुवातीच्या काही महिन्यांत पाटकरांनी ‘वादळी’ काम केले. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून ते अधूनमधून राजकीय आखाड्यातूनच ‘गायब’ होत असतात. त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कोण? असा प्रश्न एकमेकाला विचारावा लागतो. गेल्या काही दिवसांपासून अशाच पद्धतीने दिसेनासे झालेले पाटकर रेल्वे मार्ग दुपदरीकरणाच्या विषयामुळे पुन्हा झळकले. आता पाच दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनामुळे चतुर्थीचा बहुतांशी सण समाप्त झाला आहे. जिल्हा पंचायत निवडणूक जवळ येत आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या दीड वर्षांवर आलेली आहे. अशा स्थितीत मानसिक, आर्थिकदृष्ट्या डळमळलेली पक्ष संघटना पाटकर बांधणार की अधूनमधून असेच ‘अदृश्य’ होणार? अशी चर्चा पदाधिकाऱ्यांतच झडू लागली आहे.∙∙∙
फोंड्यातील राजीव गांधी कला मंदिराची कार्यकारी समिती अजून काही दृष्टिपथात येत नाही. विधानसभा निवडणूक होऊन आता साडेतीन वर्षांचा काळ लोटला आणि केवळ दीड वर्ष शिल्लक राहिले तरी राजीव गांधी कला मंदिरची ही समिती नेमली जात नाही, याला हसावे की रडावे, तेच कळत नसल्याच्या प्रतिक्रिया कलाकारांकडून व्यक्त होत आहेत. आता सरकारला या समितीवर नियुक्त करण्यासाठी पाहिजे, ती माणसे मिळत नाहीत, की आहेत, त्या माणसांना प्राधान्य द्यायचे नाही, काहीच कळायला मार्ग नाही. सध्या कारभार रामभरोसे...कलाकारच बोलतात हे! ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.