Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; बाबूश, पणजीकर आणि प्रेम!

Khari Kujbuj Political Satire: आमदार संकल्प आमोणकर यांनी भाजपमध्ये आल्यापासून मनापासून त्‍या पक्षाचे विचार, धोरणे स्वीकारली आहेत.

Sameer Panditrao

बाबूश, पणजीकर आणि प्रेम!

विधानसभा निवडणुकीला अजून दोन वर्षे असली तरी आतापासूनच खलबते सुरू झाली आहेत. अगोदर काँग्रेसने व नंतर ‘आप’ने स्वतंत्रपणे लढवण्याचे संकेत दिले आहेत. आता पणजीतही हालचालींना वेग आला आहे. उत्पल पर्रीकर यांनी नाव न घेता आमदार बाबूशवर टीका करताना ‘पणजीवासीयांवर प्रेम करणारे नेतृत्वच राजधानीला हवे’ असे म्हटले आहे. पण अनेकांना ते पचनी पडलेले नाही. कारण भाजपने दिलेली उमेदवारी हीच शेवटी बाबूशसाठी जमेची बाजू ठरली. त्यांना पडलेली मते ही जशी ते भाजपचे उमेदवार म्हणून पडली तशीच बाबूश म्हणूनही पडली. म्हणजे एक प्रकारे प्रेमापोटीही पडली. बाबूशची एक खासियत म्हणजे त्यांचे महापालिकेवर असलेले एक हाती वर्चस्व. विशेष म्‍हणजे मनोहर पर्रीकर यांच्‍या काळातही हे वर्चस्‍व होते. ते विनाकारण पणजीत फिरत नाहीत. तसेच सरकारी व भाजपच्या कार्यक्रमांनाही सहसा हजर राहत नाहीत. पण तरीही पणजीवर त्यांचा प्रभाव आहे. उत्‍पलनी त्यामागील इंगित शोधले तर बरं होईल. ∙∙∙

आमोणकरांचा ‘संकल्‍प’

आमदार संकल्प आमोणकर यांनी भाजपमध्ये आल्यापासून मनापासून त्‍या पक्षाचे विचार, धोरणे स्वीकारली आहेत. मुरगाव मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकवत ठेवण्याची ते एकही संधी सोडत नाहीत. आताही राज्यभरात मंडळ समित्या स्थापन करण्यात त्यांनी आघाडी घेतली आहे. तीन वर्षांसाठी मंडळाची पूर्ण समिती स्थापन करण्यात मुरगावने राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. आता हाच दमदारपणा त्यांना मंत्रिपदापर्यंत कधी घेऊन जातो, याकडे त्यांच्या समर्थकांच्या नजरा लागल्या आहेत. ∙∙∙

चर्चिलही शिक्षण तज्ज्ञ!

राज्‍य सरकारने शालेय वर्ष एप्रिलपासून सुरू करण्याच्या दिशेने जी पावले उचलली आहेत, त्याबाबत अनेकजण मतप्रदर्शन करताना दिसत आहेत. ज्यांचा शिक्षणाशी कसलाही संबंध नाही अशी मंडळीही वक्तव्ये करतात वा सरकारला पत्रे पाठवतात. बाणावलीचे चर्चिल इर्मांवही त्यात मागे नाहीत. त्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून एप्रिलमध्ये शालेय वर्ष सुरू करणे कसे त्रासदायक आहे ते पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अनेकांना चर्चिल हे आता शिक्षणतज्ज्ञांच्या पंक्तीत तर जाऊन बसणार नाहीत ना, असे वाटू लागले आहे. गोव्याची एक खासियत म्हणजे कोणताही वादाचा मुद्दा तयार झाला की काहींना मतप्रदर्शनाची खुमखुमी येते. मागे कोकणी आंदोलनात कोकणी समर्थकांसमवेत राहिलेल्या चर्चिल यांनी नंतर लुईझिन फालेरोंच्या इंग्रजी प्राथमिक शिक्षण धोरणाचे समर्थन केले होते. आता त्यांनी एप्रिलपासून शालेय वर्षाला विरोध केल्यानंतर मिकी मैदानात उतरले नाहीत म्हणजे मिळवले, असे काहींना वाटू लागले आहे. ∙∙∙

बेकायदा बांधकामवाल्‍यांना आता कोण तारणार?

बेकायदा अतिक्रमण व बांधकामाविषयी न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. या अनधिकृत बांधकामांसाठी सरकारला अप्रत्यक्ष दोषी धरण्यात आले आहे. आता सरकारी जागेत किंवा कोमुनिदादच्‍या जागेत वास्तव्‍य केलेल्यांचे म्हणे धाबे दणाणले आहेत. म्हापसा शहरातील काहींनी नुकतीच स्थानिक लोकप्रतिनिधीची भेट घेऊन संरक्षण देण्याची मागणी केली. आता न्यायालयाने अशा बांधकामांबाबत स्वेच्छा दखल घेतल्याने लोकप्रतिनिधींचा देखील जास्त शहाणपणा चालणार नाही. दुसरीकडे या बांधकामांवर २०२७च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कारवाई झाली तर शहरातील काही प्रस्थापितांच्या राजकीय भवितव्‍यावर गंडांतर येऊ शकते. त्‍याच अनुषंगाने एका सामाजिक कार्यकर्त्याने या बांधकामांवर कारवाई व्हावी यासाठी सध्या विडा उचलला आहे. त्‍याने न्यायालयासह सर्व प्रशासकीय यंत्रणांकडे लेखी तक्रारी करण्‍याचे सत्र आरंभले आहे. त्यामुळे बांधकामवाल्‍यांची गोची झाली आहे. हे लोक स्थानिक नगरसेवकांसह लोकप्रतिनिधींना वरचेवर फोन करून म्हणे यातून मार्ग काढण्याची विनंती करत असल्याची कुजबूज सुरू आहे. ∙∙∙

राजकीय गुलाल

पणजीतील गुलालोत्सवात विविध राजकीय रंग एकत्र झाल्याचे, आल्‍याचे पाहायला मिळाले. दुरावलेले, दुखावलेलेही होळीच्या रंगाने एकत्र आले. भाजपचे खासदार तथा माजी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि विद्यमान प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी उत्पल पर्रीकरांना रंग लावून शुभेच्छा दिल्या. स्थानिक आमदार बाबूश मोन्सेरात मात्र या गुलालोत्सवात सहभागी न झाल्याने उत्‍पलना आयतीच संधी मिळाली. एकंदरीत हा गुलालोत्सव उत्पलसाठी ‘अवघा रंग एक’ करणारा ठरला असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. परंतु हा रंग केवळ एका दिवसासाठी की काही महिन्‍यांसाठी याचे उत्तर काळच देणार आहे. एरव्ही राजकारणात कधी फासे उलटे पडतील याची शाश्‍वती नाही, हे मात्र खरे. ∙∙∙

बडे बंधू, छोटे बंधू!

मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर आणि वाळपईचे आमदार विश्‍वजीत राणे यांच्‍यातील सख्य लोकांना माहीत आहे. मडकईतील एका कार्यक्रमात तर विश्‍वजीत राणे यांनी सुदिनरावांसंबंधी बोलताना ते आपले मित्र नसून बंधूच असल्याचे जाहीर करून टाकले. आपण जेव्हा शाळेत शिकत होतो, त्यावेळी सुदिनराव आमच्या घरी यायचे. आपले वडील सुदिनरावांना मला दम भरण्यासाठी सांगायचे, एवढा मी मस्‍ती करायचो. सुदिनराव एक चांगले, भले गृहस्थ असून मडकईवासीयांचे भाग्य म्हणून त्यांच्यासारखे आमदार मिळाले, असे सांगायलाही विश्‍वजीत विसरले नाहीत. आता एखाद्याची स्‍तुती किती करावी यालाही काही मर्यादा आहेत ना? ∙∙∙

काब्राल समर्थकांची भाबडी आशा

माणसाचे जीवन आशेवरच चालते असे म्हणतात ते खरे. काँग्रेस पक्षाचा त्याग करून भाजपमध्‍ये गेलेले आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यासाठी कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांना डच्चू देण्‍यात आला होता. मात्र सिक्‍वेरा यांचा ‘सिक्का’ न चालल्यामुळे आता पुन्हा म्हणे काब्राल यांना मंत्रिमंडळात घेण्यात येणार आहे. ही बातमी ऐकून काब्राल यांचे समर्थक मात्र खूष झाले आहेत. काही दिवसांपूर्वी काब्राल यांचे प्रतिस्पर्धी म्हणून पुढे येत असलेले रोहन गावस देसाई यांना ‘बीसीसीआय’चे संयुक्त सचिव बनविल्यामुळे तेथील राजकारणाला कलाटणी मिळाली होती. आता बघू, काब्राल समर्थकांची खुशी किती दिवस टिकते ते! ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT