अनिल पाटील
राजधानी पणजी शहरात ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत उभारलेल्या इंटिग्रेट कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटरकडून (आयसीसीसी) धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या केंद्राच्या प्रणालीनुसार दरदिवशी तब्बल 2 हजार 400 वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघने होत आहे.
यातील काही सिस्टम आजपासून सक्रिय केल्या असून या केंद्रानुसार उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना ई-चलनमार्फत दंड पाठवण्यात येत आहे.
पणजी शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या सिव्हील कामांमधील समन्वयाच्या अभावामुळे निर्माण झालेला गोंधळ काही संपलेला नाही. मात्र, दुसरीकडे स्मार्ट सिटीअंतर्गत येणाऱ्या माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) कामाने चांगलाच वेग घेतला आहे.
स्मार्ट सिटीच्या आयटी कामांवर देखरेख ठेवण्यासाठी आल्तिनोवर इंटिग्रेट कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी) केंद्र उभारले आहे. यासाठी पणजी, पर्वरी, टोंक, करंजाळे, ताळगाव, विद्यापीठ, बांबोळी परिसरात 388 कॅमेर बसविले आहेत. यातील 328 कॅमेरे फिक्स असून 42 कॅमेरे 360 डिग्रीमध्ये फिरतात.
इतर 10 कॅमेरे अत्याधुनिक असून ते अनेक सूक्ष्म कामे करतात. राजधानीसह शहरात सभोवती बसवलेल्या या कॅमेऱ्यांनी टिपलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. एका तासात एका जंक्शनवर सुमारे 120 ते 150 उल्लंघने समोर येतात, अशी 13 जंक्शन्स असून 24 तासांत केवळ वाहतुकीचे मोडणाऱ्यांची संख्या तब्बल 2 हजार 400 होते.
अर्थात हे केवळ राजधानी पणजीशी संबंधित आहे. यावरून राज्यभरात किती वाहनधारकांकडून नियमांचे उल्लंघन होते याची आकडेवारी भयावह आहे. वाहतुकीचे नियम मोडल्याने अपघातांची आकडेवारीही मोठी आहे.
येथे आहेत अत्याधुनिक कॅमेरे
या आयसीसीसी केंद्राकडून 10 ठिकाणी अत्याधुनिक कॅमेरे बसविले आहेत. यात ओ कोकेरो, तीन बिल्डिंग, हिरो होंडा सर्कल, मालीम जेटी, दिवजा सर्कल, कस्टम हाऊस, कला अकादमी, करंजाळे, ताळगाव, दोना पावल, गोवा विद्यापीठ, मेेरशी सर्कल या ठिकाणी ही यंत्रणा उभारली असून ती आल्तिनो येथील कंट्रोल रूममधून नियंत्रित केली जाते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.