म्हापसा: फुकेत-थायलंडचा आमचा दौरा हा पूर्वनियोजित होता. सध्या आमचे पासपोर्ट निलंबित आहेत. त्यामुळे आमच्या पलायनाचा विषयच येत नाही. बर्च क्लबस्थळी घडलेली दुर्घटना दुर्दैवी होती. त्याचे आम्हाला सुद्धा वेदना व दुःख आहे. आमचे कर्मचारी यात मरण पावले.
परंतु, त्या आगीला आम्हाला कारणीभूत धरता येणार नाही. मुळात, ६ डिसेंबरला, पायरो गन (कृत्रिम फटाके) याने आग लागली, असे सध्या सांगितले जात आहे. मात्र, ती पायरो गन लुथरांनी घटनास्थळी लावली नव्हती. दुर्घटनेच्या वेळी लुथरा हे दिल्लीत होते, असा युक्तिवाद अॅड. पराग राव यांनी सौरभ लुथरांकडून न्यायालयात केला.
अॅड. राव यांनी मंगळवारी (२० रोजी) सकाळ व दुपारच्या सत्रात सौरभच्या बाजूने युक्तिवाद करून संपवले. त्यानुसार, पुढील सुनावणी २२ रोजी, दुपारपर्यंत तहकूब केली. तेव्हा फिर्यादी पक्ष युक्तिवाद करेल.
अॅड. राव म्हणाले , पायरो गन हा कृत्रिम आतिषबाजीचा प्रकार असतो. वाढदिवस वा लग्नात कोल्ड पायरो गनचा वापर होतो. क्लबमध्ये जी पायरो गन वापरली, ती अॅडजस्टेबल होती. ज्याने, ती तिथे वापरली त्याची जबाबदारी होती. त्यास लुथरा जबाबदार नव्हते.
फुकेतचा दौरा हा पूर्वनियोजित होता. घटनेनंतर जाणूनबुजून आमचे पासपोर्ट १० डिसेंबर २०२५ रोजी, निलंबित केले. शिवाय मोबाईल चालूच होते. मात्र, आमच्याशी संपर्क साधला गेला नाही. तसेच, लुथरांना मोठे परिश्रम करुन पकडून आणले, हे भासविण्याचा यंत्रणेचा डाव होता. तसेच क्लबस्थळी योग्य अग्निसुरक्षा साहित्य होते, असा युक्तिवाद करत त्या साहित्य खरेदीची बिले लुथरांकडून न्यायालयात सादर केली.
खोसला व लुथरांच्या कंपनीत करार झालेला होता. या करारपत्रात घरक्रमांक नंतरहून जोडला गेला, असे पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु, हा करार खोसला व लुथरांच्या कंपनीने केला आहे. ज्याला पोलिसांना आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही, असा लुथरांच्या वकिलांचा युक्तिवाद होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.