

म्हापसा: बर्च अग्नितांडव प्रकरणात पोलिसांनी लुथरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला आहे. मात्र, फिर्यादी पक्षाने लुथरांवर हे कलम चुकीच्या पद्धतीने लागू केले आहे. त्यांना हे भारतीय न्याय दंड संहिता ‘१०५ कलम’ लागू होतच नाही. वरील कलमास घटना घडणार याचे ज्ञान निश्चित असावे लागते, त्यामध्ये संभाव्यता येत नसते.
‘१०५ कलम’ लागू होण्यास सकारात्मक कृतीची गरज असते, असा युक्तिवाद लुथरांचे वकील सुबोध कंटक यांनी केला. कंटक यांनी सांगितले की, लुथरांना क्लबला आग लागणार याचे ज्ञान असते, तर त्यांनी आपला व्यवसाय बेचिराख का होऊ दिला असता? तसेच लुथरांच्या प्रतिष्ठेला हानी पोहचली आहे, या गोष्टीकडेही त्यांनी लक्ष वेधले.
गौरव लुथरांकडून कंटक यांनी आपले युक्तिवाद पुढे चालू ठेवले. गेल्या शनिवारी त्यांचा हा युक्तिवाद पूर्ण झाला नव्हता. उद्या, मंगळवार (ता.२० ) दुपारपर्यंत ही सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.
कंटकांनी लुथरांना जामीन द्यावा, अशी मागणी करीत न्यायालयासमोर अनेक उच्च न्यायालयाच्या निवाड्यांचे दाखले दिले. उदाहरणार्थ, भोपाळ गॅस दुर्घटनेमधील जामिनावरील निवाडा सादर करीत, त्यातील महत्त्वाचे मुद्दे वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
तसेच, लुथरांनी क्लबस्थळी डान्स शो-साठी परवानगी दिली, याचा अर्थ लुथरांकडून आग लावली असे होत नाही. जे नृत्य सादर केले, त्यांनी कोल्ड पायरो गन (इलेक्ट्रीक आतिषबाजी) वापरले होते, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, अॅड. कंटकांनी शनिवारी देखील युक्तिवाद करतेवळी काही मुद्दे मांडले होते. त्यानुसार, यापूर्वी गेली २० वर्षे याच जागेत इतर रेस्टॉरंट-क्लब कार्यरत होते.
मात्र, कुठल्याच प्रशासकीय प्राधिकरणाने त्यावर कारवाई केली नाही. ज्यास्थळी ‘बर्च’ कार्यरत होता, तेथील रचनेत लुथरांनी बदल केले नाहीत. लुथरा जागेचे मूळ मालक नाहीत. सुरिंदर कुमार खोसला हे मालक आहेत. लुथरांनी करारवर ही जागा घेतली होती. बार-रेस्टॉरंट चालविण्यासाठी लागणारे सर्व शासकीय परवाने लुथरांकडे होते.
मुळात पोलिसांकडून क्लबस्थळी आग नेमकी कशी लागली हे सांगितले गेले नाही. मिठागरातील संरचनेचा, या आगीशी संबंध (लिंक) येत नाही. किंवा, ‘एक्झिट डोअर’चा आगीशी संबंध धरता येणार नाही.
लुथरा बंधूंचा फुकेत-थायलंडचा दौरा हा नियोजित होता. त्यासाठी लुथरांचे फोन कॉल्स तपासावेत. ते ट्रव्हल एजेंटच्या संपर्कात घटनेच्या दिवशी सकाळपासूनच होते. त्यामुळे लुथरांनी घटनेच्या मध्यरात्री तिकिट बूक केले हा मुद्दा चुकीचा आहे.
लुथरांचे व्हॉट्सअॅप चॅट्स तपासावेत. त्यामुळे दुर्घटना घडल्यानेच, लुथरा फुकेतला पळाले होते, हा पोलिसांचा मुद्दा अयोग्य आहे, असा युक्तिवाद गौरव लुथरांच्या वकिलांनी न्यायालयात केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.