

मधू य. ना. गावकर
गोवा स्वतंत्र होण्यापूर्वी खांडेपार, केपे, चिंबल, शिगाव, कालापूर गावात नदी आणि तलावावर बंधारे उभारून लोकांस पिण्यास पाणी अगर कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी उपयोगात आणत होते. गोवा स्वतंत्र झाल्यानंतर हणजुणे, साळावली, आमठाणे, चांदेल, गांजे, म्हैसाळ, दाबोस, चापोली अशा ठिकाणांच्या नद्यांवर धरणे, बंधारे उभारून दक्षिण उत्तर गोव्यातील जनतेला पाणी पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली.
म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीच्या लोकसंख्येत मधमाश्यांच्या पोळ्यांप्रमाणे गोव्यात लोकसंख्या वाढ झाली. आणि पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, म्हणून गोव्यात आणखी नद्या नाले, आणि ओहोळावर लहानमोठे बंधारे उभारून कृषीत वाढ होण्यासाठी योजना राबवली.
तरीसुद्धा गोव्यातील कारखान्यामुळे पाण्याची कमतरता भासू लागली. म्हणून सरकारने गांजे, खांडेपार, साळ बंधाऱ्यांना उंची देऊन पाणीसाठा वाढवला. शिवाय तिळारीच्या पाण्याचा गोव्याला पुरवठा होतो. तरी पाण्याचा तुटवडा भासतच आहे, म्हणून सरकारने आणखी नवीन बंधारे उभारण्याची व्यवस्था आखण्यास सुरुवात केली.
तातोडी, चरावणे, मिराबाग या ठिकाणी बंधारे उभारण्याची योजना आखली. त्यात मिराबाग सावर्डे ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या बंधाऱ्यास तिथल्या गावकऱ्यांनी विरोध केला. प्रारंभिक बांधकाम बंद पाडून बंधाऱ्याठिकाणी आंदोलन करण्यास सुरुवात केली.
त्यासंबंधी गोव्यातील सर्वच वर्तमानपत्रांत दररोज बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या. यातला खरेखोटेपण जाणून घेण्यासाठी मी खांडोळा ते सावर्डे कुडचडे बस प्रवासाने पोहोचून माझे मित्र मनोदय फडते यांच्या स्कूटरने मिराबाग बंधारा ठिकाण गाठले.
कैक दिवसांपासून आंदोलन करणारे तिथले पुरुष, माता, भगिनी आणि शाळकरी मुले घोषणा देत आंदोलनात सामील झाली होती. शिस्तबद्धपणे एकच आवाज त्यांच्या तोंडातून बाहेर पडत होता. ‘आमका बंधारा नाका’. त्या ठिकाणाकडून मी उतरणीने नदीकाठी गेलो आणि जुवारीच्या पात्रात उतरून तोंडाला पाणी लावून डोके थंड केले.
पायाला पाण्याचा स्पर्श होताच पूर्ण शरीराचा थकवा दूर झाला. पात्रातून वर येऊन तिथल्या कारेमळ- म्हारूचे दर्शन घेतले आणि नदीकाठावरील गणपती विसर्जनास बांधलेल्या शेडमध्ये थोडी विश्रांती घेतली.
जवळच त्या खालच्या भागात तिथले लोक नदीत अस्थी विसर्जन करतात. हा सारा प्रकार पाहताना जुवारीच्या पाण्याला भरती येऊ लागली आणि नदीतील मासळी पाण्यातून वर उड्या मारून हिरव्या वसुंधरेचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करू लागली.
वरून जोरात वाहणारे नदीचे पाणी जणू आरुणीने अडवल्याप्रमाणे माघारी फिरत वर जाऊ लागले. त्याला भरतीचे पाणी थोपवून धरीत होते. सारे दृश्य पाहून मी आंदोलनकर्त्यांच्या जागी आलो. तिथल्या कारेमळ म्हारूला नवस फेडण्यास येणारे लोक आंदोलनकर्त्यांना आपला पाठिंबा देत होते.
मी आंदोलनकर्त्यांचे विचार जाणून घेण्यास त्यांच्याकडे बोलून प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करीत होतो. ते भावनावश होत गंभीरपणे आत्मीयतेतून उत्तरे देत होते. माझा प्रश्न होता, ‘जर बंधारा बांधला तर इथल्या गावच्या आणि परिसरातील गावच्या लोकांना पाणी मिळून गहन प्रश्न सुटेल. मग का विरोध करता?’ त्यावर कैक जणांनी साळावली धरण बांधून त्यांनी सोसलेल्या व्यथा सांगितल्या.
झुवारीनदीचा उगम तिथे ओहोळांच्या रूपाने झाला आहे. उगमाकडील भाग सांगे तालुक्यातील पश्चिम घाटात येतो. दिघी घाट, तुडल, आणि वेर्ले हा परिसर नेत्रावळी अभयारण्यात सामील झाला आहे.
दिघी घाटातून वाहणारा ओहळ उगे गावातून सांगे संगमाकडे येतो. दुसरा तुडल गावातून येणारा ओहळ उंच कड्यावरून कोसळत मैनापी धबधब्याने खाली वाहत नेत्रावळी अभयारण्यातून कुर्डी गावात येतो.
तिसरा ओहळ वेर्ले गावातून वाहत येत उंचावरून कोसळत सावरी धबधब्याच्या रूपाने खाली वाहतो. पुढे नेत्रावळी अभयारण्यातून खाली कुर्डी गावात या तीनही ओहोळांचा संगम होतो, ज्यावर साळावली हे मोठे धरण उभारले आहे. त्या धरणाचे पाणी आज संपूर्ण दक्षिण गोव्याला पोहोचविले आहे.
‘मैनापी आणि सावरी ओहोळातून येणाऱ्या पाण्याने धरण बनून कुर्डी, कुर्पे, कसमशेळ, होडलेमळ विचुंद्रे उनंद आणि शेळपे गावांना जलसमाधी मिळाली. आमचे भाऊबंद, सगेसोयरे, देवदेवस्थाने, फळबागायती शेतीभाती नष्ट झाली. त्यांना त्यांच्या संस्कृतीपासून तुटून बेघर व्हावे लागले.
आजही हे धरणग्रस्त आपले संसार उभे करण्यास धडपडत आहेत. दरवर्षी मे महिना संपत आला म्हणजे धरणाचे पाणी कमी झाल्यावर तिथल्या भक्तीचा सार मोगुबाईच्या स्वरांनी आळवलेली भूपाळी ऐकणारा सोमनाथ आम्हा कुर्डीकरांना आणि सांगेवासीयांना समाधी घेतलेल्या स्थळाचे दर्शन देत जुन्या आठवणी उजळून टाकतो.
त्याच प्रकारे मिराबागला बंधारा उभारला तर आमच्यावरही तीच पाळी येईल’ असे ते आंदोलनकर्ते म्हणाले.
‘सोमनाथ म्हणजे महादेव त्याचेच मुख्य स्थळ कैलास पर्वत आणि मानस सरोवर. तिथे सोने, अमृत, रत्ने, माणके मिळतात म्हणून खोदकाम करावे काय? तोच प्रकार इथे आहे. पाणी म्हैसाळ धरणात नेण्यासाठी इथे बंधारा उभारून अरुंद जुवारीचे पात्र पाण्यासाठी बुडवून जुवारीच्या दोन्ही तटावरील सांगेसंगम, तारीपाटा, कामतीबाग, वाकर, मुगोळी, फळणे, सोलये कडून मिराबाग ही गावे पावसाळ्यातील पाण्याने बुडून आमची संस्कृती आणि आम्ही त्या बंधाऱ्यात जलसमाधी घ्यायची काय?’ या प्रश्नांचा उलटा भडिमार त्यांनी माझ्यावर केला.
मी त्यांच्यापुढे काहीच बोलू शकलो नाही. शिवाय, संगमाच्या वरच्या भागात दाण्यार, बेणवाडा, पिराराय, केळकर बाग, तेमचावाडा, सदाबाग, दामाळ ही गावे धरणाखालच्या परिसरात नदीच्या तटावर आहेत. सर्वत्र धरणे, बंधारे बांधून स्वतःचा गोव्यात बुद्धिमान माणसानेच राहायचे काय?
बाकी जैविक-संपदा आणि वसुंधरा माणसासाठीच नष्ट करावी का? गोड्या पाण्यातील थिगुर, कासव, देखळा, वाळेर, खेकडे, सांगट, मळ्ये, खरवा, चिकले, पाणसर्प, बेडूक, झाडावर राहणारे पक्षी, जंगलातील कैक प्रकारचे साप, कीटक, मधमाश्या, जंगलातील वाघ, बिबट्या, गवा, काळा-बिबट्या, मेरू, भेकर, रानमांजर, माकड, शेकरू, वृक्ष, झाडे-झुडपे, वेली, अशा पर्यावरण साखळीची आणि पाणी वाहून नेणाऱ्या नद्या ओहोळांची साखळी तुटत नाही का?
हे शिकलेल्या सुसंस्कृत माणसांना समजत नाही का? जुवारी नदीने गोड्या आणि खार पाण्याने तीन प्रकारची मासळी अन्न ही जैवसंपदा जन्मास घातली आहे. तिच्या मुखाकडील समुद्रात रावस, इसवण, कर्ली, शिनावणी, बांगडा, तार्ला, पेडवा, कर्ली, धोडयारा, सवनाळा मासळी सापडते. त्या वरच्या मध्य भागात शेवटा, काळुंद्र, खरचाणी, तामसा, पालु, मुड्डशी, लेप, खेकडे, वागी, झिंगे, शेतुक तिसरी, काळे खुबे, कालवा अशी रुचकर मत्स्यसंपदा मिळते.
तिच्या उगमाकडून मुखापर्यंत जुवारीने आपल्या दोन्ही तटावर कृषीधान्य, मत्स्यसंपदा वाढवण्यास आणि ती जैविक संपदा जन्मास घालण्यास वाहणाऱ्या पाण्याचा पुरवठा केला, म्हणून इथली लोकसंस्कृती आणि धर्मसंस्कृती टिकली आहे. आज विज्ञान शिकून सुशिक्षित समजणारा मानव आपल्या स्वार्थासाठी मगरीप्रमाणे वागून आपलाच वंश नष्ट करीत सुटला आहे.
नदी, ओहोळ, झरीतून वाहणारे पाणी प्रत्येक जिवास मिळून जैवविविधतेची साखळी सुरक्षित राहते. पाणी वाहताना माणूस सोडून इतर जीव-जीवाश्मांना पात्रातील खालच्या थरातून अन्न वाहून आणण्याचे ती काम करते. म्हणूनच पक्षी, जनावरे, कीटक, मुंग्या, सरपटणारे प्राणी आणि मत्स्यसंपदा जगली आहे. माणूस आपल्या सुखासाठी योजना आखतो पण दुसऱ्याकडे पाहताना डोळे मिटून घेतो.
धरणे, बंधारे बांधून नद्यांची पात्रे माती आणि गाळाने पुरून जातात. त्याने जीव जीवाश्मांना मिळणारे तिच्या पाण्यातील अन्न, त्या परिसरातील मातीत व गाळात गाडले जाते. त्याचे काय करायचे? त्यांच्या या प्रश्नांनी माझे डोके भणाणू लागले. त्यांच्याकडील बाटलीतील पाणी पिऊन मी घरचा रस्ता धरला. मात्र त्यांच्या प्रश्नांची उत्तरे शोधीत सावर्डे ते बाणस्तारी कधी पोहोचलो समजलेच नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.