Goa Nightclub Fire Dainik Gomantak
गोवा

Goa Nightclub Fire: थंडीत लुथरा बंधूंनी फरशीवर तळमळत काढली रात्र, बर्च बाय रोमियो लेन क्लबच्या मालकांनी कोठडीत केला देवाचा धावा

Goa Nightclub Owners: हडफडेतील बर्च बाय रोमियो लेन क्लबमधील अग्नितांडवाला जबाबदार असलेले क्लबचे मालक गौरव आणि सौरभ लुथरा यांना बुधवारची रात्र भयंकर वेदनादायी ठरली.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: हडफडेतील बर्च बाय रोमियो लेन क्लबमधील अग्नितांडवाला जबाबदार असलेले क्लबचे मालक गौरव आणि सौरभ लुथरा यांना बुधवारची रात्र भयंकर वेदनादायी ठरली. त्यांच्या आयुष्यातील पोलिस कोठडीतील ही पहिलीच रात्र होती. सध्याच्या कडाक्याच्या थंडीत लुथरा बंधूंनी उघड्या फरशीवर तळमळत कशीबशी रात्र काढली.

याप्रकरणी हणजूण पोलिसांनी क्लबच्या चौघा व्यवस्थापकांना अटक केली होती. यातील तिघांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर आज म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयात युक्तिवाद झाले.

सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला, की दुर्घटनेवेळी सर्वजण क्लबमध्ये उपस्थित होते. पण क्लबमध्ये आपण मॅनेजर होतो, असे म्हणत तिघेही संशयित जबाबदारी झटकू शकत नाहीत. तिघांनीही क्लबमध्ये अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी किंवा मदतीसाठी प्रयत्न केले नाहीत. त्यांना स्वत:ला किंचितही खरचटले नाही किंवा ते जखमी झाले नाहीत.

क्लबमध्ये फायर सेफ्टी तसेच वायुविजन व्यवस्था नव्हती, याची संबंधितांना पुरेपूर जाणीव होती. दुर्घटनेत २५ निष्पाप लोकांचे बळी गेले. गुन्ह्याचे गांभीर्य खूप मोठे आहे. त्यामुळे संशयितांचा जामीन अर्ज फेटाळावा; कारण तिघेही गोव्याबाहेरील असून ते पलायन करू शकतात किंवा पुराव्यांशी छेडछाड करू शकतात. पोलिस तपास सध्या प्राथमिक स्तरावर असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.

संशयितांकडून अ‍ॅड. विनायक पोरोब यांनी युक्तिवाद केला. अ‍ॅड. पोरोब म्हणाले, की गोवा पोलिसांनी अकारण राजवीर सिंघानिया (बार मॅनेजर), विवेक सिंग (जनरल मॅनेजर) आणि प्रियांशू ठाकूर (गेट मॅनेजर) यांना अटक केली.

या तिघांचाही थेट बर्च क्लबमधील आगीच्या दुर्घटनेशी संबंध येत नाही. पोलिसांचे सर्व आरोप निष्काळजीपणाचे आहेत. एका बार मॅनेजरला क्लबच्या फायर सेफ्टीसाठी कसे जबाबदार धरता येईल? तसेच विवेक सिंग हा रजेवर होता. गोव्यात तो पत्नीला घेऊन हनिमून साजरा करण्यास आला होता. क्लबमध्ये दुर्घटना घडल्याची माहिती मिळताच विवेक मदतीसाठी तेथे गेला. प्रियांशू हा गेट मॅनेजर असून तो केवळ प्रवेशद्वारावर गेस्ट लोकांचे स्वागत करण्यासाठी कार्यरत होता. त्यामुळे क्लबमधील जबाबदारी त्याची नव्हती. हे तिघेही साधारण कर्मचारी आहेत.

कोहलीच्या जामिनावर उद्या सुनावणी

या प्रकरणातील संशयित भरतसिंग कोहली, राजीव मोडक, प्रियांशू ठाकूर, राजवीर सिंघानिया आणि विवेक सिंग यांची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पैकी भरतसिंग याने जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर २० डिसेंबरला सुनावणी होईल.

जोशी कुटुंबीयांची हस्तक्षेप याचिका

या प्रकरणातील संशयित प्रियांशू ठाकूर, राजवीर सिंघानिया, विवेक सिंग यांच्या जामीन अर्जावरील आदेश २२ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत न्यायालयाने राखून ठेवला. या दुर्घटनेत दिल्लीतील जोशी कुटुंबीयांमधील चौघेजण दगावलेत. जोशी कुटुंबीयांतर्फे या तिघांच्या जामिनाला हरकत घेणारी याचिका दाखल केली असता, न्यायालयाने त्यांची बाजू ऐकून घेतली. जोशी कुटुंबीयांकडून अ‍ॅड. विष्णू जोशी यांनी बाजू मांडली.

अजयला गादी पुरविण्याचे निर्देश

लुथरा बंधूंचा सहभागीदार अजय गुप्ता याची बुधवारी सात दिवसांची पोलिस कोठडी संपली. त्यानुसार पोलिसांनी त्याला पुन्हा म्हापसा न्यायालयात हजर केले. तेथे अजयने आपल्याला आरोग्याची समस्या व पाठदुखीचा त्रास असल्याचे नमूद केले. त्यानुसार न्यायालयाने त्याची वैद्यकीय तपासणी करावी, अशी सूचना केली. त्यानंतर अजयला आधी म्हापसा जिल्हा इस्पितळात नंतर गोमेकॉत तपासणीसाठी नेले. सायंकाळी उशिरा अजयला न्यायालयात आणले. न्यायालयाने त्याच्या कोठडीत आणखी ४ दिवसांची वाढ केली. तसेच वैद्यकीय अहवालाच्या आधारे न्यायालयाने अजयला कोठडीत गादी पुरविण्याचे निर्देश दिले. अजयने म्हापसा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून, २० डिसेंबरला सुनावणी आहे.

पोलिस कोठडीत दोघांनीही केला देवाचा धावा

आतापर्यंत आलिशान वास्तूमध्ये ऐषोरामात जीवन जगत आलेल्या लुथरा बंधूंसाठी बुधवारची ती पोलिस कोठडीतील पहिलीच रात्र आयुष्यभर आठवणीत राहणार, यात शंकाच नाही.

बुधवारी दुपारपर्यंत न्यायालयात आरोग्याच्या खोट्या तक्रारी करून पोलिस कोठडीपासून बचाव करण्याचा त्यांचा डाव न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडीचा आदेश देताच उदध्वस्त झाला. तसेच पोलिस कोठडीत झोपण्यासाठी गाद्या आणि बाहेरचे जेवण, हीसुद्धा त्यांची मागणी न्यायालयाने अक्षरश: झुगारली. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या या लुथरा बंधूंची अर्धी-अधिक हवा न्यायालयाने तेथेच काढून घेतली होती.

गोव्यात सध्या कडाक्याची थंडी पडत आहे. हणजूण पोलिस कोठडीतील वातावरणही तसे थंडीने आधीच गारठले होते. जीवनभर आलिशान बंगल्यात ऊबदार गाद्यांवर लोळणाऱ्या लुथरा बंधूंना बुधवारी रात्री उघड्या, थंड फरशांवर झोप लागली असेल, तरच नवल. झोप येत नसल्याने बुधवारी मध्यरात्रीपर्यंत दोघेही कोठडीत भिंतीला खेटून मच्छरांचा हल्ला परतवून लावत बसले असता, हडफडेतील अग्नितांडवात मरण पावलेल्या कामगारांची कदाचित त्यांना आठवण झाली असेल. आणि म्हणून बराच वेळ ते दोघेही मोठमोठ्याने देवाचा धावा करत होते.

मुकाटपणे जेवले

एरवी आलिशान बंगल्यामध्ये राजेशाही थाटात पंचपक्वान्नांचा आस्वाद घेणाऱ्या लुथरा बंधूंनी बुधवारी रात्री पोलिस कोठडीतील जेवणही कुठलीही कुरबूर न करता मान खाली घालूनच घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya Video: हार्दिकच्या धडाकेबाज खेळीवर गर्लफ्रेंड फिदा! सोशल मीडियावर रंगली 'फ्लाइंग किस'ची चर्चा; मैदानावरच प्रेमाचा वर्षाव

IND vs SA 5th T20: अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याचं वादळ, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक; अभिषेक शर्माचा मोडला रेकॉर्ड VIDEO

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

SCROLL FOR NEXT