पेडणे: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकिसाठी सरकारी यंत्रणेने चांगली मेहनत घेऊन व तटस्थपणे काम केल्याबद्दल पेडणे मतदारसंघातील सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पेडणेचे उपजिल्हाधिकारी तथा निर्वाचन अधिकारी राजेश आजगावकर यांची भेट घेऊन निवडणुकीवेळी दिवस-रात्र काम केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे व अधिकाऱ्यांचे आभार मानणारे पत्र सादर करून पुष्पकरंडक प्रदान केला.
ह्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात मगोचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुदीप कोरगावकर, उमेश गाड, गोवा फॉरवर्डचे राजमोहन शेट्ये, भाजपचे पेडणे अध्यक्ष तुळशीदास गावस, पेडणे कॉंग्रेसचे अध्यक्ष रुद्रेश देशप्रभू, रिव्होल्युशनरी गोवाचे सिद्धेश यांचा समावेश होता. उपजिल्हाधिकारी तथा निर्वाचन अधिकारी राजेश आजगावकर यांनी सर्वांचे आभार मानले.
पेडणे भाजपचा अध्यक्ष तुळशीदास गावस म्हणाले, कुठल्याही पक्षाचा उमेदवार निवडून आला तरी त्या उमेदवाराने हेव्या-दाव्यांचे व सुडबुद्धीचे राजकारण न करता सगळे लोक आपलेच ह्या नात्याने वागावे. आम्ही सर्व पेडणेकर एक या भावनेने वागावे, असे आवाहन केले.
पेडणे कॉंग्रेसचे अध्यक्ष रुद्रेश देशप्रभू म्हणाले, आता निवडणुका संपल्याने आम्हा सर्व पक्षातले राजकीय मतभेद बाजूला ठेवून मैत्रिपूर्ण भावनेने वागुया. सर्व सरकारी अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांमुळे व सर्वात जास्त म्हणजे मतदारांच्या सहकार्यामुळे लोकशाहीची प्रक्रिया असलेली निवडणूक व्यवस्थीत पार पाडली. आता आम्ही राजकीय मतभेद बाजूला ठेवून पेडणे तालुक्याच्या विकासासाठी एकत्र काम करूया.
गोवा फॉर्वर्डचे शेट्ये म्हणाले, पेडणे मतदारसंघातील निवडणूक एकदम खेळीमेळीच्या वातावरणात झाली. यात मतदार, सर्व पक्षाचे कार्यकर्ते व उमेदवार यांचे मोठेयोगदान आहे.रिव्होल्युशनरी गोवाचे सिध्देश यांनीही आपल्या भाषणातून सर्व मतदार व निवडणूक प्रक्रीया बजावणाऱ्या सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
मगोचे उमेश गाड यांनी निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व मतदार, सरकारी यंत्रणा व पत्रकारामुळे निर्विघ्नपणे पार पडल्याचे सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.