म्हापसा: हणजूण समुद्र किनाऱ्यावरील प्रसिद्ध आणि तितकेच वादग्रस्त ठरलेले ‘कर्लिस बीच शॅक’ बार्देश उपजिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार शुक्रवारी (ता. १९) पोलिस बंदोबस्तात सील करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, हणजूण येथील सर्व्हे क्रमांक ४२/९, ४२/१०, ४२/११, ४५/१९ आणि ४५/४१ मध्ये स्थापित असलेली सर्व व्यावसायिक आस्थापने सील करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, बार्देश मामलेदार कार्यालयातील अधिकारी, तलाठी, गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण आणि हणजूण पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.
तेथे ‘जीसीझेडएम’च्या अधिकाऱ्यांनी संबंधित वास्तूची ओळख पटविली आणि सीआरझेड नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून ती सील केली. पर्यावरण (संरक्षण) कायदा, पर्यावरण (संरक्षण) नियमांनुसार, जागा सील करण्याचे निर्देश बार्देशच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सूत्रांनी सांगितले की, ‘कर्लिस’ची जागा सील करण्यात आली असून आम्ही लवकरच सर्व्हे क्रमांकामधील सर्व वास्तूंचे मॅपिंग करणार आहोत. पाडकामाचे आदेश आधीच दिले आहेत; परंतु मॅपिंगमध्ये काही अडथळे येत असल्याने जागा निश्चित करू शकलो नाही. त्यामुळे आदेश जारी करून जागा सील केली आहे. लवकरच आम्ही वास्तूंचे तपशीलवार मॅपिंग करू आणि पाडकामासाठी जे काही बाकी आहे, त्याचे पाडकाम केले जाईल. तोपर्यंत जागा सीलच राहील.
२०२२ साली प्रशासनाने ‘कर्लीस शॅक’ पाडण्याचे काम हाती घेतले होते. त्यानुसार पाडकाम सुरू केले. मात्र, काही भागाला स्थगिती मिळाल्याने तो पाडला नव्हता. पुन्हा ‘एनजीटी’ने लगतच्या सर्व्हे क्रमांकांवरील अतिक्रमण हटवण्याचे निर्देश देऊन पाडकाम आदेशावर स्थगिती देण्यास नकार दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.