Rare Shri Lakshminarayan idol in Navelim Sanquelim temple Goa
डिचोली: न्हावेली-साखळी येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरातील देवाची पाषाणी मूर्ती सोळाव्या-सतराव्या शतकातील आणि दुर्मिळ आहे, अशी माहिती समोर आली आहे. तसा दावाही पुरातत्व इतिहास संशोधक डॉ. रोहित फळगावकर आणि अन्य अभ्यासकांनी केला आहे.
लक्ष्मीनारायण देवाची मूर्ती सोळाव्या शतकातील असल्याची माहिती समोर आल्याने देवस्थान समितीसह अभ्यासकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. न्हावेली येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिराचे जीर्णोद्धार काम सध्या सुरू आहे. या मंदिरातील पुरातन अवशेष जतन आणि दस्ताऐवजीकरण करण्यासाठी देवस्थान समिती उत्सुक आहे.
त्याच पार्श्वभूमीवर अभ्यास करण्यासाठी देवस्थान समितीने विर्नोडा येथील संत सोहिरोबानाथ आंबीये महाविद्यालयाच्या पुरातत्व अभ्यास केंद्राचे मुख्य समन्वयक डॉ. रोहित फळगावकर यांना निमंत्रित केले होते. यावेळी ‘युगांतर गोवा’चे संस्थापक तथा इतिहास अभ्यासक अभिदीप देसाई यांच्यासह देवस्थान समितीचे अध्यक्ष चंद्रकांत आपी गावस, सचिव आनंद सीताराम गावस, कोषाध्यक्ष विनायक शंबा गावस, प्रेमानंद वसंत गावस आदी उपस्थित होते.
न्हावेली येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात शिवलिंग, महिषासूरमर्दिनी आणि गणपतीची मिळून प्राचिन मूर्ती आहेत. लक्ष्मीनारायण देवताची मूर्ती अद्वितीय स्वरूपाची असून, ती सोळाव्या-सतराव्या शतकातील आहे. असा दावा इतिहास संशोधक डॉ. रोहित फळगावकर यांनी केला आहे. या मूर्तीच्या डाव्या बाजूच्या हातात शंख आणि उजव्या हातात चक्र आहे. खालच्या उजव्या हातात गदा असून, अक्षमाला दिसत आहे. कानात सर्पकुंडले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
श्री लक्ष्मीनारायणाची मूर्ती गोव्याच्या इतिहासातील सर्वांत महत्वाची पुरातन मूर्ती आहे. या मूर्तीमध्ये शैव आणि वैष्णव तत्वे दिसून येत आहेत. मूर्तीशास्त्राप्रमाणे आयुधे धरलेल्या क्रमानुसार ही मूर्ती जनार्दनाच्या स्वरूपात आहे. जनार्दन हे विष्णूच्या २४ रुपांपैकी एक आहेत. महिषासूरमर्दिनी देखील प्राचीन असून, महिषासूरमर्दिनी महिषासूराचा वध हातात त्रिशुलाऐवजी तलवार दाखवलेली आहे.डॉ. रोहित फळगावकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.