Goa History: गोव्याच्या इतिहासातील सौंदेकर संस्थानाचे महत्व; हिंदवी स्वराज्य, मराठ्यांचे सख्य आणि पोर्तुगीज सत्तासंघर्ष

History Of Goa: सौंदेकर राजघराण्याच्या सत्तेचे गतवैभव पोर्तुगीज राजवटीत दुर्बल होत गेले तरी या घराण्याने तेथील जनतेशी असलेले आपले स्नेहबंध कायम ठेवले.
Saundekar Family History Goa
Maharaja of Sounda (Sundem), in Goa, IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

सोळाव्या शतकात गोव्यातल्या, तिसवाडी, बार्देश आणि मुरगांवताली सासष्टी महालांवरती युरोपमधून आलेल्या पोर्तुगिजांची सत्ता स्थापन झाल्यावर, त्यांनी निर्दयपणे येथील धर्म आणि संस्कृतीशी अनुबंध असणाऱ्या खाणाखुणा पुसून टाकण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. याच काळात महाराष्ट्रभूमीत छत्रपती शिवाजी महाराजाचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून आगमन झाले.

त्यामुळे गोव्यातल्या नव्या काबिजादीचे महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या प्रांतांशी सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध आजतागायत कायम राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी गोवा-कोकणात मोहिमा हाती घेतल्या आणि येथील लोकमानसात हिंदवी स्वराज्याविषयीची प्रेम आणि आस्था निर्माण केली. त्यामुळे शिवाजी महाराजांचा जन्म झाला नसता आणि हिंदवी स्वराज्य उभे राहिले नसते तर रोमन संस्कृतीची ध्वजा गोवा, कोकणात फडकली असती आणि हा प्रांत भारतीयांना अलग झाला असता.

सोळाव्या शतकात आजच्या उत्तर कन्नड म्हणजे कारवार जिल्ह्यातल्या शिरसीजवळ सौंदेसारख्या गावात सौंदेकर संस्थानाचा उदय झाला. विजयनगर साम्राज्याशी संबंधित इमोडी अरसप्पा नायक यांनी १५५५साली सौंदेकर संस्थानाची स्थापना केली आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांत वसलेला सौंदे(स्वादी) गाव नावारूपास आला.

यती वादिराजाचा मठ, त्रिविक्रमाचे मंदिर, शैव, वैष्णव, जैनांच्या संस्कृतीस दिलेला राजाश्रय यामुळे सौंदेसारखे गाव उल्लेखनीय ठरले. वनवासींचा मधुकेश्वर हे सौंदेकर घराण्याचे कुलदैवत असल्याने वनवासींचा लौकिक ही भरभराटीला आला.

इमोडी अरसाप्पानंतर त्यांचा मुलगा रामचंद्र राजेंद्र नायक सत्तेवरती आला, त्यावेळी त्यांच्याकडे कारवार आणि सदाशिवगड हे दोनच किल्ले ताब्यात होते. शिरसी, खोलगड आणि रामाचे भूशिर येथे आणखी तीन किल्ल्यांची उभारणी केली. गोव्यातल्या हेमाडबार्सेवरती सत्ता प्रस्थापित केली. १६३८साली सिंंहासनावरती आलेल्या मधूलिंग नायकाने लिंगायत पंथाचा स्वीकार केला व सौंदे संस्थानाचा विस्तार केला.

१६७४साली सदाशिव राय गादीवर आला. आपल्या मुत्सद्दीपणाच्या बळावरती त्याने प्रारंभी विजापूरचा आदिलशहाशी आणि कालांतराने शिवशाहीशी सख्य जोडले आणि त्यामुळे मराठ्यांचा भटकळपासून अवर्सा नदीपर्यंतचा सारा प्रदेश त्यांच्याकडे आला. खोलगड, कुर्मगड, शिवेश्वर कोट, कद्राकोट, मधुरगड, अंकोलागड आणि महेंद्रगडाचा समावेश सौंदेकरांच्या संस्थानात झाला. १६९०साली त्याने मोंगलांकडे वार्षिक ८० हजार रुपये खंडणी देण्याच्या अटीवरती फोंडा किल्ला व त्याच्या दक्षिणेकडील कारवारपर्यंतचा प्रांत ताब्यात घेतला.

१६९६साली छत्रपती राजाराम यांनी जिंजी येथून राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांनी कारवार, शिवेश्वर अडवट (काणकोण) खोलगडासह अष्टाग्रहार, हेमाड बार्से, बाळ्ळी, चंद्रवाडी आणि काकोडे हा पंचमहाल खंडणी घेण्याच्या बदल्यात सौंदेकरांकडे सुपूर्द केला. जेव्हा हिंदवी स्वराज्य छत्रपती शाहूकडे आले तेव्हा इमोडी सदाशिव याने फोंडे आणि पंचमहाल वार्षिक २५००० रुपयांच्या भोगवट्यावरती मिळवले.

कालांतराने जेव्हा पोर्तुगिजांची सत्ता प्रबळ होत गेली. तेव्हा सौंदेकरांना त्यांचे मांडलिक म्हणून राहण्याची पाळी आली. प्रारंभी हैदर अलीकडून आणि नंतर मराठ्यांकडून होणाऱ्या त्रासातून मुक्त होण्यासाठी सवाई सदाशिवराय याने पोर्तुगिजांशी करार केला आणि मर्दनगडावरचा आपला ताबा सोडला.

सुरुवातीला तिसवाडीतील गौळी मौळा आणि नंतर फोंड्यातला बांदोडेत राजवाडा उभारून सौंदेकर कुटुंब स्थायिक झाले होते. १९३९पासून संस्थानाचे शेवटचे राजे सवाईवीर सदाशिव राजेंद्र ओडियर याने नाममात्र कारभार चालवलेला असला तरी आपल्या संस्थानातल्या लोकांचे धार्मिक स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे प्रयत्न केले.

१७६३साली जेव्हा मर्दनगडावरती पोर्तुगिजांचे वर्चस्व प्रस्थापित झाले तेव्हा, पोर्तुगिजांना जाहीरनामा काढून सौंदेकर संस्थानातल्या लोकांचे धार्मिक स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला. सौंदेकर हे मूळचे शिरसीजवळच्या सौंदे गावचे कानडी भाषिक. परंतु त्यांंनी मराठी आणि कोकणी या दोन्ही प्रादेशिक भाषांना आदर दिला; गोव्यातल्या धर्म, संस्कृतीला राजाश्रय दिला.

पोर्तुगिजांनी जुन्या काबिजादीतल्या महालांवर जो धार्मिक छळवाद आरंभला होता, मंदिरांचा विध्वंस केला होता, त्याची त्यांना प्रचिती होती आणि त्यासाठी त्यांनी शिवाजी, संभाजी, राजाराम, शाहू या सर्व छत्रपतींशी सख्य निर्माण करून आपल्या प्रजेचे धार्मिक स्वातंत्र्य टिकवण्याचे प्रयत्न केले. या संस्थानाचे राजे शिवोपासक आणि धर्मपरायण होते.

कला, संस्कृती यांचे भोक्ते होते, नृत्य, नाट्य, गायन आदी कलांची त्यांना आवड होती आणि त्यासाठी त्यांनी कलाकार, कारागीर यांना राजाश्रय दिला होता. दक्षिण गोव्यातला मुरगावसह सासष्टी महालाला पूर्वेकडचे रोम बनवण्याचा कित्ता कालांतराने सौंदेकर संस्थानाच्या ताब्यातील काणकोण, सांगे, केपे, फोंडा येथे राबवणे पोर्तुगिजांना प्रतिकूल ठरले त्याला सौंदेकर राजांची मुत्सद्देगिरी कारणीभूत ठरली होती. त्यामुळे हा प्रदेश भारतीय संस्कृतीशी आपले बंध कायम राखण्यात यशस्वी ठरला.

सौंदा या उत्तर कन्नड जिल्ह्यातल्या गावाचे गतवैभव झपाट्याने बदलणाऱ्या कालखंडात विस्मृतीत जाण्याच्या वाटेवरती आहे आणि त्यामुळे शिरसीजवळचा हा गाव सौंदेकर राजघराण्याशी संबंधित एकेकाळी होसो या विषयीची संचिते इतिहासजमा झालेली आहेत.

विजयनगर, मराठा, विजापूर आणि शेवटी पोर्तुगिजांचे मांडलिक म्हणून कार्यरत असलेल्या सौंदेकरांनी दक्षिण गोव्यात जेथे जेथे राज्य केले तेथे तेथे आपल्या कार्याची नाममुद्रा ठेवली. म्हैसूर संस्थानावरती हैदर अलीने आपले वर्चस्व प्रस्थापित करून तेथील वेडियार राजघराण्याला जेव्हा पदच्युत केले. तेव्हा त्यांचे मांडलिक असणाऱ्या सौंदेकरांवरही वक्रदृष्टी पडली.

त्यामुळे सौंदेकरांनी आपली धनदौलत घेऊन कर्नाटकातल्या भूभागावरती कायमचे पाणी सोडून दक्षिण गोव्यावरती प्रारंभी मराठे आणि कालांतराने पोर्तुगिजांचे मांडलिक म्हणून राहण्यात धन्यता मानली. हैदरअलीच्या सैन्यांपासून आपल्या कुटुंबास संरक्षण लाभावे म्हणून शेवटी सौंदेकर राजाला फोंडा, सांगे, काणकोण आणि केपे हे महाल पोर्तुगीज सरकारकडे सुपूर्द करण्याशिवाय अन्य पर्याय राहिला नाही.

Saundekar Family History Goa
Goa History: गोव्याचे सुपुत्र 'रामचंद्रबाबांच्या' सूचनेवरून बाजीराव पेशव्यांनी मंदिरांना गावे इनाम दिली होती; अंत्रुजमहाल सनदीचा इतिहास

देवभूमीच्या लौकिकास पात्र ठरलेल्या श्रीनागेश, श्रीमहालक्ष्मी दैवतांच्या सान्निध्यात आणि बारमाही तळी, झरे प्रवाहित असणाऱ्या हिरव्यागार कुळागरात सौंदेकर राजघराण्याने वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला.

नागेशी येथील तीन एकरात शिवतीर्थ राजवाड्याची उभारणी करून सौंदेकरांनी नागेशीत राहण्याला प्राधान्य दिले होते. पोर्तुगीज अमदानीत जेव्हा दक्षिण गोव्यातला नद्या काबिजादीतला प्रदेश जेव्हा सौंदेकरांकडून त्यांच्याकडे आला तेव्हा ख्रिस्तीकरणाच्या सक्तीने आरंभलेल्या प्रक्रियेला बराच लगाम लागला होता.

Saundekar Family History Goa
Old Goa History: सफर गोव्याची! खिलजीच्या आक्रमणानंतर मांडवी किनाऱ्यावरच्या 'हेळे'ला राजधानीचा दर्जा लाभला

सौंदेकर राजघराण्याच्या सत्तेचे गतवैभव पोर्तुगीज राजवटीत दुर्बल होत गेले तरी या घराण्याने तेथील जनतेशी असलेले आपले स्नेहबंध कायम ठेवले आणि त्यामुळे शिवतीर्थ राजवाड्यावरती पाच दिवसांच्या भाद्रपदातल्या गणेशोत्सवाला आवर्जून उपस्थितीत राहण्यासाठी परिसरातले लोक हमखास येतात. गणपतीसमोर नतमस्तक होण्याबरोबर राजवाड्यात प्रदर्शनास ठेवलेल्या शस्त्र सामग्री आणि संस्थानाशी संबंधित धार्मिक आणि सांस्कृतिक संचितांचे दर्शन घेण्यात धन्यता मानतात. गोवा मुक्तीनंतर लोकशाहीच्या आगमनाने इथल्या लोकमानसात सौंदेकर संस्थानाविषयी असलेला आदरभाव हे घराणे बेळगावात स्थायिक झाल्यानंतरही कायम राहिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com