पणजी: आंबावली–केपे येथील सुमारे १.०४ लाख चौरस मीटर जमिनीवर इको टुरिझम प्रकल्प उभारण्यास राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (आयपीबी) पूर्वलक्षी मान्यता दिली आहे.
या प्रकल्पाबाबत सूचना आणि हरकती नोंदवण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली असून, उद्योग खात्याने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.
मेसर्स आर सिल्वा अँड सन्स या कंपनीने ९ जानेवारी २०१८ आणि २५ जून २०२४ असे दोनवेळा या प्रकल्पासाठी ‘आयपीबी’कडे अर्ज केलेले होते. त्यानंतरच्या बैठकांमध्ये या प्रकल्पाबाबत चर्चा झालेली होती.
परंतु, सरकारने हा प्रकल्प पुढे ढकलला होता. अखेर नुकत्याच झालेल्या ‘आयपीबी’च्या बैठकीत या प्रकल्पाला पूर्वलक्षी मान्यता देण्यात आली असून, सूचना आणि हरकती नोंदवण्यासाठी नागरिकांना एका महिन्याची मुदतही देण्यात आली आहे.
आंबावली येथील सर्व्हे क्रमांक १२१/५२–अ मधील २६,३४० चौरस मीटर, सर्व्हे क्रमांक १२२/१–ब–१ मधील ४८,९७० चौरस मीटर आणि सर्व्हे क्रमांक १२४/५९–अ मधील २८,९२५ मध्ये हा प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्यात आल्याचे उद्योग खात्याने जारी केलेल्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
गोवा जागतिक कीर्तीचे पर्यटन असल्याने दरवर्षी देश–विदेशातील लाखो पर्यटक गोव्यात दाखल होत असतात. त्यातून राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असतो. आगामी काळात राज्यातील पर्यटनाला अधिक चालना देऊन अधिकाधिक पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करण्यासाठी सरकार विविध मार्गांनी प्रयत्न करीत आहे.
पर्यटन आणि राज्यातील उद्योग व्यवसायाला बळकटी देण्यासाठी सरकारने काही वर्षांपूर्वी इको–टुरिझम धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी केली. याच धोरणाअंतर्गत आंबावली येथे हा प्रकल्प आणून या भागाचा विकास साधण्याचा आणि पर्यटकांना दक्षिण गोव्याकडेही आकर्षित करण्याचा निर्णय सरकारने घेतला.
किनाऱ्यांपलीकडे गोव्यात निसर्गरम्य ठिकाणे आहेत. आंबावलीही त्यापैकीच आहे. त्यामुळे तिथे हा प्रकल्प उभारून पर्यटकांना निसर्ग सौंदर्याचा आस्वाद देण्याचे नियोजन सरकारने केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.