ती नसेल देहाने आज आमच्यात पण तिच्या गळ्यातून निर्माण झालेले सूर आकाशातल्या देदीप्यमान नक्षत्रांसारखे सारीकडे विखरून आहेत- अजूनही आमच्या तन-मनांना भारून. ‘यावत चंद्र दिवाकरो’ हे शब्द क्वचितच एखाद्या गोष्टीला लागू होतात, मात्र लता मंगेशकर यांच्या सुरांना यापेक्षा वेगळे विशेषण ते काय असेल?
या चिरंजीव सुरांची आठवण करून देणारा कार्यक्रम ‘अमर लता’ उद्या दि. 13 मे रोजी सायंकाळी 6 वाजता साखळी येथील रवींद्र भवनमध्ये तर 14 मे रोजी सायंकाळी 6 वाजता कुडचडे येथील रवींद्र भवनमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
ज्या सुरांनी अनेकांना संगीताची, गाण्याची प्रेरणा दिली, त्या सुरांना हा कार्यक्रम म्हणजे एक मानाचा मुजरा असेल. लता मंगेशकर यांनी आपल्या गाण्यातून किती प्रकार हाताळलेत याची गणतीदेखील एक अद्भुततेची साक्ष देईल.
हिंदी-मराठी चित्रपट गीते तर झालीच पण बालगीते, भावगीते, कोळीगीते, लावण्या, अभंग, आरत्या, भक्तिगीते, ओव्या यासारख्या साऱ्याच प्रकारच्या गीतांमधून त्यांनी आपल्या सुरांच्या आरासी लीलया मांडल्या.
या साऱ्या प्रकारांची झलक ‘अमर लता’ या कार्यक्रमाद्वारे संगीत रसिक पुन्हा अनुभवू शकतील. अर्थात लताजींनी गायलेल्या चित्रपट गीतांपैकी, अवघ्याच आयकॉनिक गाण्यांचा अंतर्भाव या कार्यक्रमात करणे शक्य झाले आहे. ‘लग जा गले...’ सारखे गीत तर कालातीत आहे. अशा काही गाण्यातून लताजींचे होत असलेले स्मरण रसिकांना वेगळ्या आनंदाचा अनुभव देईल.
‘आनंदघन’ या नावाने लताजींनी काही मराठी चित्रपटांना संगीत दिले. ‘ऐरणीच्या देवा तुला, ठिणगी ठिणगी वाहू दे’ च्या ठेक्यावर कितीतरी जणांचे क्षण त्या काळापुरते वितळून गेले असतील. त्या क्षणांची स्मृती हा कार्यक्रम जागवेल.
महाराष्ट्रातल्या नामवंत कार्यक्रम रचनाकार मानसी इंगळे यांनी हा कार्यक्रम खास ‘दै. गोमन्तक’ साठी निर्माण केला आहे. त्या म्हणतात, लोक नक्कीच तक्रार करतील की या सुंदर कार्यक्रमात लताजींचे अमुक अमुक गाणेही असायला हवे होते.
लताजींच्या हजारो एकापेक्षा एक सरस गाण्यांमधून गाणी निवडणे हेच डोंगराएवढ्या कष्टाचे परंतु आनंदाचे काम असते. रसिक जेव्हा या कार्यक्रमातली गाणी ऐकतील तेव्हा त्यांची तक्रार उरात ठेवून सुध्दा ते या कार्यक्रमाचा आनंद मनसोक्त घेतील.
या कार्यक्रमात असणारी गायक मंडळी ही ‘सारेगम’, ‘इंडियन आयडॉल’ सारख्या कार्यक्रमातून पुढे आलेली आहेत. मंदार आपटे हा महाराष्ट्राचा आजचा आघाडीचा गायक पं. सुरेश वाडकरांचा शिष्य आहे. गायक म्हणून तसेच संगीतकार म्हणूनही त्याने अनेक पुरस्कार आजवर जिंकलेले आहेत.
शरयू दाते ही ‘सारेगामा’ विजेती आहे. गायिका म्हणून ती आज महाराष्ट्रात गाजते आहे. प्रीती वॉरीयर ही ‘सारेगामा’ मल्याळमची विजेती आहे. ती मल्याळम भाषिक असली तरी मराठी गीतेही ती फार मधुरपणे सादर करते.
रसिका गानू ‘इंडियन आयडॉल’ चा भाग राहिलेली आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिध्द सूत्रसंचालिका समीरा गुजर जोशी या ह्या सूत्रसंचालन करणार आहेत. लताजींची गाणी, त्यांचा गायन प्रवास, त्यांच्याबद्दलचे दुर्मिळ किस्से या साऱ्यातून लताजींना आदरांजली अर्पण केली जाईल.
लताजींना याद करून, त्यांच्या सुरांत स्वतःला पुन्हा विसरून जाण्यासाठी दै. गोमन्तकद्वारा आयोजित होणाऱ्या या कार्यक्रमाला अवश्य हजर रहा. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.