Vlogger gets bail in Mopa case: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल सोशल मीडियावर 'भूतबाधा' असल्याचा व्हिडिओ तयार करून चुकीची माहिती पसरवणाऱ्या एका ब्लॉगरला गोवा पोलिसांनी दिल्लीतून अटक केली होती. मात्र, न्यायालयीन दंडाधिकारी शबनम नागवेकर यांनी बुधवारी (दि.१७) रोजी रात्री उशिरा त्याला जामीन मंजूर केला.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईवर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने म्हटले की, पोलिसांनी आरोपीला अटक करण्यापूर्वी त्याला पूर्वसूचना देणे बंधनकारक होते, पण पोलिसांकडून या प्रक्रियेचे पालन केले गेलेले नाही. यामुळे आरोपीच्या अधिकारांचे उल्लंघन झाल्याचेही न्यायालयाने नमूद केले आणि परिणामी बुधवारी (दि.१७) रोजी रात्री ११ वाजून ११ मिनिटांनी हा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला.
'रियल टॉक क्लिप्स' नावाच्या फेसबुक चॅनलवर अक्षय वसिष्ठ या ब्लॉगरने 'गोवा का हांटेड एअरपोर्ट' या शीर्षकाखाली एक व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये मोपा विमानतळाबद्दल चुकीची, द्वेषपूर्ण आणि अंधश्रद्धा पसरवणारी माहिती देण्यात आली होती. यामुळे विमानतळावर प्रवास करणाऱ्या आणि काम करणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. १५ सप्टेंबर २०२५ रोजी पणजी येथील पोलीस कर्मचारी सूरज शिरोडकर यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर मोपा विमानतळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३५२(२) सह ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
व्हिडिओच्या माध्यमातून समाजात गैरसमज आणि अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अशा चुकीच्या माहितीमुळे सार्वजनिक धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे या प्रकरणाचा तपास गांभीर्याने करण्यात येत असल्याचे पोलिसांनी म्हटले. मात्र, आता आरोपीला जामीन मिळाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.