Sea Turtle Dainik Gomantak
गोवा

Agonda Beach: कासवांचे संरक्षण गरजेचे, व्यावसायिकांचे पोटही महत्वाचे; 'आगोंद' इको-टूरिझमचे आदर्श उदाहरण बनण्याची आवश्यकता

Agonda Beach Olive Ridley Turtles: आगोंद बीच हा दुर्मीळ ऑलिव्ह रिडले कासवांच्या प्रजननाच्या दृष्टीने एक संवेदनशील, महत्त्वाचा परिसर आहे.

Sameer Panditrao

सायली कृष्णानंद गावकर

आगोंद: आगोंद बीच हा दुर्मीळ ऑलिव्ह रिडले कासवांच्या प्रजननाच्या दृष्टीने एक संवेदनशील, महत्त्वाचा परिसर आहे. सध्या हा किनारा कायदेशीर आणि पर्यावरणीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयाने वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत संरक्षित क्षेत्रांमध्ये अनधिकृत व्यावसायिक विकास थांबवण्यासाठी आणि पर्यावरणीय नियमांचे पालन न करणाऱ्या ६७ व्यवसायांना बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

या निर्णयामुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, पर्यटन हा येथील प्रमुख आर्थिक स्रोत असल्यामुळे अनेकांना याचा मोठा फटका बसला आहे.

या व्यवसाय बंदीच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी शांततापूर्ण निषेध व्यक्त केला. असे असले तरी यातून संरक्षण धोरणे आणि पर्यटनाधारित उपजीविका यामधील तणाव स्पष्ट झाला. संशोधक म्हणून मी या आंदोलनाचे निरपेक्ष निरीक्षण करत समाजाच्या प्रतिक्रियांची नोंद घेतली. हा संपूर्ण प्रसंग पर्यावरणीय शुद्धतेसंबंधीच्या चिंतांचा आणि पर्यावरण संरक्षण तसेच आर्थिक स्थैर्य यामधील समतोल साधण्याच्या गरजेचा विचार करायला लावतो.

खालील तक्त्यामध्ये २०२० ते २०२५ या कालावधीतील आगोंद आणि गालजीबाग किनाऱ्यावरील ऑलिव्ह रिडले कासवांच्या अंडी घालण्याच्या संख्येची माहिती दिली आहे.

वरील तक्त्याच्या आधारे, २०२०पासून आगोंद किनाऱ्यावर कासवांची अंडी घालण्याची संख्या सातत्याने वाढत आहे. २०२४ मध्ये आगोंद येथे १८,०११ अंडी नोंदवली गेली, तर गालजीबाग येथे ४,३६९ अंडी आढळली. २०२५ साली, आगोंद येथे १०,०००-१४,००० अंडी आणि गालजीबाग येथे ३,०००-४,५०० अंडी असतील, असा अंदाज आहे.

आगोंद बीच हे एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ असूनही येथे गालजीबागच्या तुलनेत अधिक ऑलिव्ह रिडले कासव अंडी घालतात. ही बाब पारंपरिक समजुतीला छेद देणारी आहे. कारण अनेकांना असे वाटते की मानवी हालचालींमुळे वन्यजीवांना धोका असतो. मात्र, समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता, प्रभावी संरक्षण उपाययोजना, स्थानिक लोकांचा सहभाग आणि शाश्वत धोरणे यामुळे पर्यटन क्षेत्रातही पर्यावरण संवर्धन करणे शक्य आहे.

पर्यटनामुळे कासवांच्या नैसर्गिक अंडी घालण्याच्या प्रक्रियेला अडथळा निर्माण होत नाही, हे २०२४मधील वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. अर्थात, स्थानिक समुदाय आणि पर्यटन व्यावसायिकांनी पर्यावरणपूरक उपाययोजना केल्यामुळेच हे शक्य झाले आहे.

उदाहरणार्थ, अनेक स्थानिक व्यवसायांनी कासवांना अनुकूल प्रकाशयोजना अवलंबली आहे, ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी निर्बंध पाळले आहेत आणि अंडी घालण्याच्या हंगामात प्रशासनास सहकार्य केले आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच इको-टूरिझमलाही चालना मिळाली आहे.

पर्यावरणीय नियमांचे पालन आणि स्थानिक रहिवाशांच्या उपजीविकेचे रक्षण यामध्ये समतोल राखणे आवश्यक आहे. अनेक व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून जबाबदारीने काम करत आहेत. कासव संरक्षण आणि स्थानिक अर्थव्यवस्थेत योगदान देत आहेत. अचानक झालेल्या बंदीमुळे अनेक कुटुंबे बेरोजगार होण्याच्या संकटात सापडली आहेत. पर्यटनाशी संबंधित रोजगार हा आदरातिथ्य, वाहतूक आणि खाद्यसेवा क्षेत्रात असून, हे रोजगार टिकवण्यासाठी योग्य उपाययोजना गरजेच्या आहेत.

अधिकाऱ्यांनी संपूर्ण व्यवसाय बंदी घालण्याऐवजी, सीआरझेड नियमांचे पालन करण्यासाठी अधिक प्रभावी यंत्रणा उभारावी. नियमित पर्यावरणीय तपासणी, बांधकामासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे आणि स्थानिक प्रशासन, संरक्षण संस्था व व्यावसायिक यांच्यातील सहकार्य वाढवले तर कासवांच्या अधिवासाचे संरक्षण होईल आणि स्थानिक लोकांची उपजीविकाही सुरक्षित राहील.

आगोंद किनाऱ्यावर पर्यावरणीय संवर्धन आणि पर्यटन यांचा यशस्वी समन्वय साधण्यात आला आहे. पर्यावरणपूरक व्यवसायांना पाठिंबा दिल्यास आणि नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण राखल्यास, आगोंद हा गाव इको-टूरिझमचे आदर्श उदाहरण बनू शकतो आणि स्थानिक समुदायाचीही उपजीविका अबाधित राहील.

(लेखिका केप्यातील गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्सच्या समाजशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक आहेत.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT