
मोरजी: आगोंद समुद्रकिनारी भागात मोठ्या प्रमाणात दरवर्षी कासव येऊन अंडी घालतात. त्याच पद्धतीने पेडणे तालुक्यातील मोरजी, आश्वे, मांद्रे या समुद्रकिनाऱ्यांवर देखील आतापर्यंत हजारो सागरी कासवांनी किमान लाखभर अंडी घातली आहेत. तसेच हजारो सागरी पिल्लांना समुद्रात यशस्वीपणे सोडण्याचे काम वन्य विभाग आणि वन खात्याने केले आहे.
काही ठिकाणी कासव संवर्धन मोहिमेला अडथळे निर्माण होत आहेत. किनाऱ्यांवरील बहुतांश आस्थापने खासगी जमिनीत असली तरी तेथील विजेचा झगमगाट, ध्वनिप्रदूषण आदी गोष्टींमुळे कासव संवर्धन मोहिमेला अडथळे निर्माण होत आहेत. आगोंद किनाऱ्यावरील ६७ आस्थापने बंद करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर पेडणे तालुक्यातील आस्थापनवाल्यांचे धाबेही दणाणले आहे. त्यांच्यावरही कारवाई होणार की काय, याकडे लोकांचे लक्ष लागून आहे.
सरकार दरवर्षी पर्यटन हंगामात सरकारी जमिनीत किनाऱ्यावर व्यावसायिकांना शॅक्स उभारण्यास परवाने देते. त्यासाठी अनेक प्रकारच्या नियम व अटी असतात. रात्रीच्या वेळी झगमगणारी वीज नाही तर कँडल लॅम्प लावून त्यांना व्यवसाय करावा लागतो. मात्र ही आस्थापने आकर्षक विद्युत रोषणाई करून, झगमगाट करून पहाटेपर्यंत लखलखाट करत असतात. शिवाय काही खासगी रिसॉर्टमधून पार्ट्यांचे आयोजनही केले जाते. साहजिकच ध्वनिप्रदूषण घडते. अलीकडच्या काही वर्षांत तर मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत आहे. त्यामुळे सागरी कासवे अशा ठिकाणी वळतच नाहीत.
गेल्या वर्षी १३२ सागरी कासवांनी अंडी घातली तर यंदाच्या हंगामात मार्चपर्यंत १५२ सागरी कासवानी अंडी घातली आहेत. हा आकडा दोनशेच्या पुढे जाईल अशी शक्यता वन खात्याचे अधिकारी व्यक्त करतात. तेंबवाडा-मोरजी समुद्रकिनारी भागात ज्या शॅक् व्यावसायिकांना पर्यटन खात्याने परवाने दिलेले आहेत, ते नियम पाळतात.
परंतु खासगी जमिनीतील आस्थापनांकडून पहाटेपर्यंत विद्युत रोषणाईने आपला परिसर आणि किनाऱ्यावरही झगमगाट केला जातो. प्रचंड ध्वनिप्रदूषणात करणाऱ्या संगीत पार्ट्यांचेही आयोजन केले जाते. शिवाय समुद्रात अनेक जहाजे, बोटी उभ्या केलेल्या असतात. त्यांची विद्युतरोषणाई समुद्राच्या पाण्यावर चकाकते. परिणामी कासवे किनारी भागात येत नाहीत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.