Panjim Smart City Dainik Gomantak
गोवा

Panjim Smart City: उत्‍पल यांच्‍या टीकेनंतर सरकारी यंत्रणा हादरली

Panjim Smart City: महापौर उतरले रस्‍त्‍यावर : स्‍मार्ट सिटी पदाधिकारी बदलणार?

दैनिक गोमन्तक

Panjim Smart City: ‘स्‍मार्ट सिटी’वरून उत्‍पल पर्रीकर यांनी जोरदार टीका केल्‍यानंतर सरकारी यंत्रणा हादरली आहे. सरकारला 10 जानेवारीला विशेष बैठक बोलवावी लागली आहे; तर उत्‍पल यांच्‍या आरोपानंतर 12 तासांत महापौर रोहित मोन्‍सेरात यांना स्‍वत: पणजीत रस्‍त्‍यांवर उतरून पाहाणी करावी लागली.

इतकेच नव्‍हे तर कंत्राटदार मनमानी करतात, या सुरात सूर मिसळावा लागला. स्मार्ट सिटीच्या कामावरून जो सावळागोंधळ सुरू आहे, तो पाहता स्मार्ट सिटीच्या संचालकांना पदावरून हटवणार की, इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी

विकास लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारीच बदलणार, हे आता बुधवारी कळणार आहे. तर आम आदमी पक्षाने पणजी पोलिसांत तक्रार दिली आहे. पणजीत कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे युवकाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर उत्पल पर्रीकर यांनी महापौरांवर निशाणा साधला होता.

शिवाय महापालिकेच्या कामाविषयी विविध पक्षांनीही संशय व्यक्त केल्याने अखेर अपघातानंतर चार दिवसांनी महापौर रोहित मोन्सेरात आणि उपमहापौर संजीव नाईक काही अधिकाऱ्यांचा लवाजमा घेऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यास रस्त्यावर उतरले. तसेच मुख्‍यमंत्र्यांनी याच विषयावर 10 रोजी बैठक घेणार असल्‍याचे जाहीर केले आहे.

खरे तर सोमवारी पहाटे अपघात झाल्यानंतर त्याच दिवशी महापौर-उपमहापौरांनी घटनास्थळावरील उपाययोजनांची पाहणी करणे अपेक्षित होते; परंतु तसे काही झाले नाही. अपघातानंतर तीन दिवसांनी उत्पल पर्रीकर यांनी महापौरांविरोधात अविश्‍वास ठराव आणावा, असे आवाहन सर्व नगरसेवकांना केले.

शिवाय पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांचे नाव न घेता ‘राजधानीचा कारभारी बदला’ असे आवाहनही त्यांनी केले. पर्रीकर यांनी केलेल्या टीकेचा घाव महापौर-उपमहापौरांच्या चांगलाच वर्मी लाग. त्यामुळे शुक्रवारी सकाळी महापालिकेचे अधिकारी, वाहतूक पोलिस व स्मार्ट सिटी प्रकल्पाचे अभियंते यांनी शहरातील कामांची पाहणी केली.

स्मार्ट सिटीच्या कामाबाबत विधानसभेतही पडसाद उमटले होते. त्यावेळी विरोधी आमदारांनी कामाचे ऑडिट होणे आवश्‍यक आहे, तसेच या कामाची श्‍वेतपत्रिका काढण्याची मागणीही केली होती.

स्मार्ट सिटीच्या सीईओ पदावरून मामू हागे या हटल्यानंतर संजित रॉड्रिग्स यांना त्या पदावर आणून बसविले. परंतु त्यांची निवड काहीजणांना पटली तर काहीजणांच्या गळी उतरलीच नाही. ज्यांना पटली नाही, त्यांना नाराजी उघडपणे व्यक्तही करता येत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामाबाबत विरोधकांकडून होत असलेले आरोप, दाखल झालेल्या पोलिस तक्रारी पाहता 10 रोजी होणाऱ्या विशेष बैठकीत त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

बैठक ठरणार महत्त्वाची

स्मार्ट सिटीच्या कामांवरून गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांची सरकारनेही गंभीर दखल घेतली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १० जानेवारी रोजी जी बैठक बोलावली आहे, त्यात महापौर, स्मार्ट सिटीचे अधिकारी इत्यादींसह सर्व भागधारकांना निमंत्रित करण्यात येणार आहे.

यांच्याविरोधात‘आप’ची तक्रार

  • इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेड.

  • गोवा राज्य नगरविकास प्राधिकरण

  • बागकिया कन्स्ट्रक्शन.

  • पणजी महानगरपालिका.

  • सार्वजनिक बांधकाम खाते.

‘आप’ची पोलिसांत तक्रार

जानेवारीच्या 1 तारखेला युवकाचा अपघाती मृत्यू झाला. शिवाय रायबंदर येथे काम करताना मजुराचा मृत्यू झाला होता. पणजीतील स्थितीविषयी वाल्मिकी नाईक आणि आम्ही नेहमीच बोलतो. पण प्रत्येकजण शांत आहे, हा सर्व प्रकार गुन्हेगारी पद्धतीचा आहे. पोलिस शांत आहेत. तक्रार नसताना पोलिस कसे कारवाई करतील म्हणून आम्ही आज तक्रार दाखल केली असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे समन्वयक ॲड. अमित पालेकर यांनी दिली.

वाहतूक कोंडी नित्याचीच

  • १ जानेवारी रोजी पहाटे स्मार्ट सिटीच्या खड्डयात पडून आयुष हळर्णकर याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पीडित हळर्णकर कुटुंबीयांना मदत देण्याची मागणी माजी महापौर तथा नगरसेवक उदय मडकईकर व इतर काही पक्षांनी केली आहे.

  • पणजीत गेल्या वर्षभरापासून सर्वत्र कामे सुरू आहेत. कामे करताना अनियोजनाचा अभाव असल्याने वाहतूक कोंडी अन् धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.

पणजीतील काही कंत्राटदार आपल्‍याला हवी तशी रस्‍त्‍याची खोदाई करतात. ही त्‍यांची मनमानीच आहे. नियोजन नसल्‍याने कामे रेंगाळतात. त्‍याचा फटका जनतेला बसतो.
- रोहित मोन्‍सेरात, महापौर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT