पणजी: सध्या सौदी अरेबियातील अल नासर क्लबकडून खेळणारा जगप्रसिद्ध पोर्तुगीज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या स्वागतासाठी गोवा सरकार पूर्णपणे सज्ज आहे, फक्त तब्बल पाचवेळा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ठरलेल्या या खेळाडूच्या होकाराची प्रतीक्षा आहे.
एएफसी चँपियन्स लीग २ फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवा आणि अल नासर क्लब यांच्यातील सामना २२ ऑक्टोबर रोजी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल. रोनाल्डो हा अल नासर क्लबचा कर्णधार आहे, त्यामुळे तो गोव्यातील सामन्यात खेळणार असल्याचे गृहीत धरून देशभरातील फुटबॉलप्रेमींत प्रचंड उत्सुकता आहे.
मात्र एएफसी चँपियन्स लीग २ स्पर्धेतील मागील दोन सामन्यांत पोर्तुगालचा युरो करंडक विजेता हुकमी आघाडीपटू खेळला नव्हता, त्यामुळे ४० वर्षीय स्ट्रायकर फातोर्डा येथे खेळण्याबाबत साशंकता आहे. गोव्यातील सुरक्षा व्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन आणि इतर बाबींविषयक आढावा घेण्यासाठी अल नासर क्लबचे प्रतिनिधी मंडळ गुरुवारी गोव्यात दाखल झाले.
त्यांनी क्रीडामंत्री रमेश तवडकर, राज्याचे पोलिस महासंचालक आलोक कुमार, वाहतूक पोलिस अधीक्षक प्रबोध शिरवईकर, क्रीडा संचालक अजय गावडे, गोवा फुटबॉल असोसिएशने अध्यक्ष कायतान फर्नांडिस, एफसी गोवा संघाचे प्रतिनिधी यांच्यासमवेत संयुक्त बैठक घेऊन एकंदरीत आढावा घेतला.
एफसी गोवाचे सीईओ रवी पुस्कुर यांनी सांगितले, की २२ रोजी होणाऱ्या सामन्यानिमित्त राज्य सरकारकडून आवश्यक पाठबळ लाभत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही राज्य सरकारने दिली आहे. अल नासर क्लबचे प्रतिनिधीही याबद्दल समाधानी आहेत. गोव्यात दाखल होणाऱ्या अल नासर क्लबच्या संघावर त्यांच्याकडून शिक्कामोर्तब केले जाईल. ख्रिस्तियानो रोनाल्डो सामना खेळण्याविषयी आम्हाला ताजी माहिती मिळाली ती लगेच जाहीर केली जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.