डिचोली: रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना ‘चुना’ लावलेल्या प्रिया यादव हिने डिचोलीतील चार बहिणींना 80 लाख रुपयांना गंडा घातल्याची बाब आता समोर आली आहे. याप्रकरणी जयंती रघुनाथ वायंगणकर (बोर्डे-डिचोली) यांनी केलेल्या तक्रारीला अनुसरुन डिचोली पोलिसांनी प्रियाविरोधात आता आणखी एक फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.
दरम्यान, प्रिया यादव हिने बोर्डे येथील चार बहिणींना रोख रक्कम आणि दागिने मिळून जवळपास 80 लाखांहून अधिक रुपयांना ‘टोपी’ घातल्याचे समजते. 2017 ते 2024 या सात वर्षांच्या कालावधीत ही फसवणूक झाल्याचे समजते.
रेल्वे मालमत्तेशी संबंधित वेगवेगळी कारणे व आमिषे दाखवून प्रिया हिने माझ्याकडून रोख 35 लाख, दोन सोन्याच्या बांगड्या, 3 रिंग आणि ब्रेसलेट हे सुवर्णालंकार हडप केले आहेत. शिवाय, बहीण ललिता हिच्याकडून रोख 36 लाख आणि 116 ग्रॅम सोन्याचे बिस्कीट, मीलन हिच्याकडून 4.5 लाख आणि पूर्णा हिच्याकडून 3.73 लाख रुपये उकळले आहेत, असे जयंती हिने तक्रारीत म्हटले आहे. सदर तक्रारीनुसार, डिचोली पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या 420 कलमाखाली प्रियाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष आणि अन्य कारणांवरुन संशयित प्रियाने डिचोलीतील अनेकांना लाखो रुपयांची टोपी घालून ऑगस्ट महिन्यात पलायन केले होते. तिच्या विरोधात काहीजणांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. प्रियाने काही महिलांसह 20 हून अधिकजणांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे सांगण्यात आले. ती लहान मुलीसमवेत डिचोलीत एका फ्लॅटमध्ये राहात होती. दोन महिन्यांहून अधिक काळ प्रिया फरार होती. अखेर डिचोली पोलिसांनी तिच्या मुसक्या आवळल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.