Goa Congress: उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी होते आणि कळंगुटमधील तब्बल 11 डान्स बार तथा नाईट क्लबवर कारवाईचा बडगा उगारते. मात्र, जोवर न्यायालय किंवा जनहित याचिका दाखल होत नाही तोवर एकाही सरकारी यंत्रणेस जाग येत नाही यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. सर्व प्रशासकीय खाती आयसीयूमध्ये निद्रावस्थेत आहेत, अशा शब्दांत काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके यांनी सरकार आणि प्रशासनावर सडकून टीका केली.
शनिवारी (ता. 23) म्हापशातील पत्रकार परिषदेस त्यांच्यासोबत चंदन मांद्रेकर आणि प्रणव परब उपस्थित होते.
विजय भिके पुढे म्हणाले की, सध्या राज्यातील कायदा-सुव्यवस्था पूर्णतः बिघडली आहे. गोव्यात मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय तसेच ड्रग्स फोफावला असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकार ठोस
उपाययोजना करत नाही. कळंगुटमध्ये डान्स बार बिनदिक्कतपणे चालायचे, याचाच अर्थ हे बेकायदा प्रकार कुणाच्या तरी आशीर्वादाने सुरू होते, असा आरोप त्यांनी केला. त्याचप्रमाणे, रात्री दहा वाजल्यानंतर
'सनबर्न' महोत्सव सुरू राहिल्यास काँग्रेस कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत, असा सज्जड इशारा त्यांनी दिला. यावेळी चंदन मांद्रेकर आणि प्रणव परब यांनीही सरकारच्या कृतीवर टीका केली.
'सनबर्न'ला सुरक्षा कशासाठी?
गोव्यात सरकार सनबर्नला अकारण प्रोत्साहन देत आहे. मुळात हा महोत्सव गोव्याचा आहे का? सरकार 'सनबर्न'ला का कुरवाळत आहे? त्यांना रात्री उशिरापर्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्त का देते? सनबर्नमुळे गोव्याची प्रतिमा मलिन होत असून, अशा महोत्सवांमुळे सरकार गोव्याच्या पारंपरिक महोत्सवांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप भिके यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.