Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accidents: राज्यात अपघातांचे सत्र सुरूच! दोघांचा दुर्दैवी मृत्‍यू; एका घटनास्थळी सापडला गांजा

Goa Accident News: राज्यात अपघातांचे सत्र सुरू आहेच. केपे आणि पर्वरी येथे झालेल्‍या दोन वेगवेगळ्‍या अपघातांत दोघांना आपला जीव गमवावा लागला तर दोघे गंभीर जखमी झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

केपे/पणजी: राज्यात अपघातांचे सत्र सुरू आहेच. केपे आणि पर्वरी येथे झालेल्‍या दोन वेगवेगळ्‍या अपघातांत दोघांना आपला जीव गमवावा लागला तर दोघे गंभीर जखमी झाले. दरम्‍यान, केपे येथे झालेल्‍या अपघातातील कारचालक मद्यधुंद अवस्‍थेत असल्‍याचे समजते. त्‍यांच्‍या कारमध्‍ये गांजा सापडला होता.

मिळालेल्‍या माहितीनुसार, काल रात्री साडेअकराच्‍या सुमारास पडामळ-केपे येथे भरधाव आलेल्या कारने रस्त्यालगत पार्क केलेल्या तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. त्‍यात अब्दुल कादर बादशहा (२६, देऊळमळ-केपे) या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर सुफियान शेख (२७, देऊळमळ-केपे) हा गंभीर जखमी झाला. त्‍याच्‍यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. दैव बलवत्तर म्‍हणून या अपघातात आणखी तीन युवक थोडक्यात बचावले. एक कार्यक्रम आटोपून ते घरी परतण्याच्या वाटेवर काही वेळ थांबले असता हा अपघात घडला.

या अपघातास कारचालक रुबर्ट थॉमस डायस हाच जबाबदार आहे. तसेच हा अपघात नसून खूनच आहे, असे सांगून आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करून आज सकाळी देऊळमळ येथील ग्रामस्थांनी केपे पोलिस स्थानकावर धडक दिली. यावेळी नगरसेवक प्रसाद फळदेसाई यांनी सांगितले की, एका निष्पाप माणसाचा बळी गेला असून, त्‍याच्‍या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. अब्दुल याला लहान मूल आहे. कमावती व्यक्ती गेल्याने त्‍याच्‍या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कारमध्‍ये गांजा

याप्रकरणी केपे पोलिसांनी कारचालक रेनबर्ट डायस (२१, कट्टा-आमोणा) तसेच त्‍याच्‍यासोबत असलेले तौहिब शेख व सादिक मुल्ला यांना अटक केली आहे. ते मद्यधुंद अवस्‍थेत असल्‍याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कारमध्ये गांजाही आढळून आला. पोलिसांना घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व घटनास्थळाहून पळ काढलेल्या संशयितांना रात्रीच अटक केली.

पर्वरीत ट्रकची दुचाकीला धडक; महिला ठार

तीन बिल्‍डिंग-पर्वरी येथे ट्रकने दुचाकीला धडक दिल्‍याने विजया मुरगावकर (४५, रा. चिंबल) ही महिला ठार झाली तर दुचाकीस्वार हिरालाल मुरगावकर (५५) हे जखमी झाली. हा अपघात आज सोमवारी सकाळी सव्‍वानऊच्‍या सुमारास घडला. मिळालेल्‍या माहितीनुसार, हिरालाल मुरगावकर हे आपल्या पत्नीला घेऊन स्कूटरवरून (जीए ०७ व्ही ५२०५) पणजीहून म्हापशाच्या दिशेने येत होते. तर, त्याच दिशेने मोहम्मद अफजल हा ट्रक (जीए ०५ टी ७९७९) घेऊन येत होता. दोन्ही वाहने पर्वरीत पोहोचली असता ट्रकची दुचाकीला धडक बसली. त्यामुळे दुचाकीस्वाराचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यावेळी मागे बसलेली विजया ही ट्रकखाली आली व गंभीर जखमी झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT