CM Sawant Clarifies Government Jobs Not for Sale, Will Be Filled Through Commission
पणजी: सरकारी नोकऱ्या या पैसे देऊन मिळत नाहीत. जनतेने असे पैसे कोणाला देऊ नयेत असे सांगून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकारची प्रतिमा उजळवण्याचा आणखीन एक प्रयत्न केला आहे.
सरकारी कर्मचारी भरती ही खातेवार न करता राज्य कर्मचारी आयोगातर्फे होईल असे सांगून नोकऱ्यांचा व्यापार मुख्यमंत्र्यांनी याआधीच बंद केला आहे. अशा प्रकरणात गुंतलेल्या पूजा नाईक हिला सर्वप्रथम मीच अटक करून दिली होती, असेही नमूद करून मुख्यमंत्र्यांनी योग्य तो संदेश सर्वांपर्यंत पोचवला आहे.
एकाच विशिष्ट मतदारसंघातील उमेदवारांची त्या मंत्र्यांच्या खात्यांत सरसकट निवड होण्यासह त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनाच सरकारी नोकऱ्या मिळतात असा जनतेचा अनुभव आहे. खात्याअंतर्गत परीक्षा आणि मुलाखती असे कर्मचारी भरतीचे आजवरचे स्वरूप होते. त्यात बदल करून केंद्र सरकारने निर्देश दिल्यानुसार ‘क’ वर्गीय कर्मचारी भरती ही केवळ स्पर्धा परीक्षेच्या आधारेच करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मध्यंतरी खातेवार कर्मचारी भरती पुन्हा सुरु होणार अशी हाकाटी उठवण्यात आली असतानाही आयोगातर्फे तीन हजार पदे भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाली होती. महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी मुख्यमंत्र्यांना ‘खातेवार कर्मचारी भरती सुरूच राहणार का?’ अशी थेट विचारणा केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी खातेवार कर्मचारी भरती यापुढे करता येणार नाही, असे स्पष्ट करून राष्ट्रीय पातळीवर झालेल्या निर्णयाची सरकारला अंमलबजावणी करावीच लागेल असे स्पष्ट केले होते.
असे असतानाही यापूर्वी जाहिरात देऊन मागवलेल्या अर्जांनुसार उमेदवारांना नियुक्त करण्याचे काम काही खात्यांमध्ये सुरू आहे. ती पदे भरण्यासाठी पैसे घेतले जात असल्याची चर्चा असतानाच पूजा नाईक या महिलेने सरकारी नोकरी देतो असे सांगून पैसे घेतल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला असला तरी नोकऱ्यांच्या नावाने धंदा करणाऱ्यांना त्यांनी हा इशारा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
पूजा नाईक ही एकदा माझ्या घरी एका व्यक्तीला घेऊन आली होती. त्या व्यक्तीला नोकरी द्या असे ती सांगत होती. त्यावेळी मी तिला विचारले होते की, तू सदर व्यक्तीबरोबर का आली आहेस? त्याच्याकडून पैसे घेतले आहेस का? नंतर तिची कसून चौकशी केल्यावर सारा प्रकार उघडकीस आला होता. तिला अटकही झाली होती. त्यानंतर तिला चारवेळा अटक झाली. तरीही लोक तिच्या भूलथापांना बळी पडून तिला पैसे का म्हणून देतात हेच कळत नाही, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
पूजा नाईक ही महिला सचिवालयात वैगेरे कामाला नाही. ही माहिती खोटी आहे. असे लोक मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांबरोबर फोटो काढतात व ते लोकांना दाखवतात. आपले संबंधित मंत्र्यांबरोबर चांगले संबंध असल्याचे सांगून फसवतात. अशा लोकांच्या भूलथापांना लोकांनी बळी पडू नये. सतर्क रहावे व इतरांनाही सतर्क करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
सरकारी नोकऱ्यांची प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक आहे. कोणत्याच नोकरीसाठी पैसे द्यावे लागत नाहीत किंवा सरकारही ते घेत नाही. लोकांनी अशा फसवणुकीच्या प्रकारांपासून सावध व सतर्क रहावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे. लोकांना अशा फसवणुकीच्या प्रकाराबाबत संशय आल्यास त्यांनी थेट सरकार दरबारी किंवा पोलिसांत तक्रार करावी. अशा प्रकरणात गुंतलेल्या पूजा नाईक हिला सर्वप्रथम मीच अटक करून दिली होती, असेही मुख्यमंत्री म्हणाले. साखळी येथे आयोजित कार्यक्रमानंतर ते बोलत होते. दरम्यान, पूजाला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांचा रिमांड घेण्यात अाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.