Goa news : सत्तरी तालुक्यात काजू पीक हे महत्वाचे मानले जाते. अनेक काजू बागायतदार सध्या कामात व्यग्र आहेत. यंदा एप्रिलमध्येच उत्पादन कमी मिळत आहे. पण तरीही मिळत असलेल्या काजू बोंडूपासून रसाचे गाळप करून काजू फेणी बनवण्याची कामे सुरु आहेत. पूर्वी बोंडू पायाने मळून रस काढला जायचा.
आता त्यासाठी दाब मशीनचा वापर केला जात असून काजू बोंडू फेणीला आधुनिकतेचा ‘टच’ लाभला आहे. बोंडूंचा दाब मशीनद्वारे रस काढून तो भाटीमध्ये मडक्यात घालून हुर्राक, फेणी काढली जाते आहे. पूर्वी रस वाफवण्यासाठी पिंपाना पाईप जोडला जायचा. त्याऐवजी पाण्यासाठी सिमेंटची टाकी बांधली गेली आहे.
त्यात पाणी घालून फेणी करण्याची प्रक्रिया केली जाते. पारंपरिक पध्दतीने काही ठिकाणी रस काढला जातो. काजू बागायतदारांनी यंत्राचा वापरास सुरुवात केली असून पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड दिली आहे. या यंत्राद्वारे बोंडूचा रस काढल्याने पूर्ण रसाचे गाळप होते. रसाची नासाडी होत नाही.
दररोज बागायतीत जाऊन बोंडू फळ गोळा करण्याची कामे नित्यनेमाने करीत आहेत. काजू हे चांगले नफा देणारे पीक गणले जात होते. पण मागील काही वर्षात काजू बियांना शंभराच्या घरातच दर मिळतो आहे. त्यामुळे शेतकरी नुकसानीत येत आहेत. काजू बियांना यावर्षी १२३ दर सुरुवातीला होता. तो ११७ वर आला आहे. त्यातच लहान काजू १०६ दराने खरेदी केला जातो. हा दर परवडणारा नाही.
पंधरा लिटरला ६० रुपये दर
मशीनमधून रस निघाल्यानंतर बोंडूचा शिल्लक चोथा पुन्हा मशीनमध्ये घालून दाब दिला जातो. व असा पूर्ण गाळलेला रस मडक्यात घालून फेणी करण्याची प्रक्रिया केली जाते. काजू बागायतदार आपापल्या जागेत बोंडू रस काढून फेणी भट्टीवर (स्थानिक भाषेत आवार) आणून देतात. काहीजण केवळ बोंडू विक्री करतात. रसाचा पंधरा लिटरचा डबा पन्नास ते साठ रुपये दराने तर बोंडू फळ प्रति बादली वीस रुपये प्रमाणे फेणी व्यावसायिक बागायतदारांना दर देत आहेत.
दररोज आठवेळा काजू भट्टी पेटवली जाते. दिवसाला चार कँन फेणी काढली जाते. हे काम करताना जबाबदारीने करावे लागते. कारण या प्रक्रियेत कमी जास्त प्रमाण झाले तर फेणी निर्मितीवर परिणाम होऊन तोटा होऊ शकतो. तीन साडेतीन तास फेणी तयार होण्यास लागतात.
अनिल गावकर, व्यावसायिक धावे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.