Margao Market: मडगाव न्यू मार्केटमधील काही दिवसांपूर्वी दोन दुकानांना लागलेल्या आगीच्या घटनेमुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आजच्या बैठकीत मार्केटचे सर्वेक्षण करून येथे पाणी टाकी, फायर हायड्रंटची व्यवस्था लवकरात लवकर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आज मडगावच्या दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कचेरीच्या सभागृहात अतिरिक्त जिल्हाधिकारी व आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे प्रमुख दीपक देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली.
या बैठकीला मडगावचे आमदार दिगंबर कामत, मडगावचे मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर, अग्निशमन दल, पोलिस, वीज खाते व पाणीपुरवठा खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत आग कशी लागली व आग लागण्याचे कारण काय, यावर सखोल चर्चा झाली.
बैठकीनंतर पत्रकारांना आमदार कामत यांनी सांगितले की, या बैठकीत वीजपुरवठा, पाण्याची टाकी, फायर हायड्रंट तसेच पार्किंग या विषयांवर चर्चा झाली. वीज खात्याची दोन पथके संपूर्ण न्यू मार्केट व गांधी मार्केटमधील दुकानांचे सर्वेक्षण करणार असून क्षमतेपेक्षा जास्त वीज वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
दर पाच वर्षांनी वीज खात्याने वीज ग्राहकांचे सर्वेक्षण करणे आवश्यक असते. पण पुष्कळ वर्षांपासून अशा प्रकारचे सर्वेक्षण झालेले नाही. मी वीजमंत्री असताना तसा प्रयत्न केला होता.
मडगावमध्ये पार्किंगची समस्या जटिल होत चालली असून पार्किंगमध्ये शिस्त आणण्यासाठी उपाययोजना आखली जाईल, असेही कामत यांनी सांगितले.
अतिरिक्त जिल्हाधिकारी दीपक देसाई म्हणाले की, सर्व खात्यांना अहवाल पुढील १५ दिवसांत सादर करण्यात सांगितले आहे. नंतर पुन्हा एकदा बैठक बोलावली जाईल.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन
संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी उपजिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी, मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकारी यांची एक समिती नियुक्त केली असून ही समिती पाण्याची टाकी व फायर हायड्रंटसाठी जागा शोधणार आहे. जागा निश्र्चित करून अहवाल सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती कामत यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.