Goan Craftsman: अठरा प्रकारच्या कारागिरांना आर्थिक साह्य देऊन पारंपरिक कलांना ऊर्जितावस्था देण्याच्या हेतूने सुरू केलेल्या ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेअंतर्गत राज्यभरातून खरेच 29 हजारांहून अधिक जणांनी स्वेच्छेने अर्ज केले असल्यास कौतुक आहे. उमेदवार प्रशिक्षणार्थ पहिल्या टप्प्यात 10 ठिकाणी केंद्रे स्थापन झाल्याचे मंत्री सिक्वेरा यांनी जाहीर केले आहे.
प्रशिक्षण कालावधीत प्रतिदिन 500 रुपये भत्त्यासह ई-व्हाउचरच्या स्वरूपात मिळणारे १५,००० रुपयांपर्यंतचे टूलकिट योजनेचे आकर्षण वाढवणारे आहे. वरकरणी योजनेमागचा उद्देश स्वच्छ दिसत असला तरी आपल्याकडे अशा योजनांचे सामाजिक लेखापरीक्षण करण्याची पद्धत नाही. परिणामी सरकार सांगेल तेच यश ठरते.
दुसरे म्हणजे, सत्तास्थानी कोणीही असो, कोणत्याही योजनेच्या संभाव्य लाभार्थींमुळे निवडणुकांत होऊ शकणारा लाभ निश्चित झाल्याखेरीज योजनांची आखणी होत नाही. म्हणूनच उद्यमशीलता गमावून बसलेल्या गोव्यात कौशल्यवृद्धीसाठी इतक्या मोठ्या संख्येने झालेल्या नोंदणीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले तरी काही पूर्वानुभवाकडे डोळेझाक करता येत नाही. त्यासाठी ‘मुद्रा’ योजनेसह ‘प्रौढ साक्षरता’ आदी उदाहरणे बोलकी ठरावी.
निव्वळ संख्यात्मक उद्दिष्टपूर्ती एवढाच विचार केल्याने ‘मुद्रा’ योजनेतून अपेक्षित परिणाम मिळाला नाही. मुळात उद्योजकता वाढीच्या मार्गात केवळ पतपुरवठ्याचा अभाव हाच काय तो अडथळा आहे, हे गृहीतकच मुळी सदोष होते.
अंमलबजावणीच्या पातळीवर मुख्य हेतूला हरताळ फासला गेला. प्रत्यक्षात योजनेचा फायदा भलत्यांनीच घेतला, हवा त्यांना मिळाला नाही. अनेकांनी सुलभ कर्जवितरणाचा फायदा आपली अन्य देणी फेडण्यासाठी केला, तर काहींनी ही कर्जे चक्क बुडविली. प्रौढ साक्षरता अभियानातूनही अंगठेबहाद्दरच निपजले.
‘पीएम विश्वकर्मा’ योजना तेव्हाच यशस्वी ठरेल जेव्हा कर्जे देणे, नोंदणी फुगवणे हे उद्दिष्ट नव्हे तर कारागीर जगला पाहिजे हा त्यामागील कार्यकारी भाव असेल.
‘विश्वकर्मा’ योजनेअंतर्गत कोणतेही तारण न देता अनुक्रमे १८ महिने आणि ३० महिन्यांच्या कालावधीसाठी 5 टक्के व्याजदराने एक लाख आणि दोन लाख रुपयांच्या दोन हप्त्यांमध्ये कर्ज दिले जाईल. परंतु कर्ज देऊन सरकारची जबाबदारी संपणार नाही, कारागिरांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी लागेल. मुक्तीपूर्व काळापासून गोव्यात वैशिष्ट्यपूर्ण कलांचे उपासक आहेत.
दुर्दैवाने त्यांना राजाश्रय मिळाला नाही. गोव्यातील चितारी सावंतवाडीला गेले, तेथे भोसले घराण्याने त्यांना मान-सन्मान, पूरक मदत केली.
आज सावंतवाडी लाकडी खेळण्यांचे माहेरघर मानले जाते. पेडण्यातील गवंडीकाम करणाऱ्यांची कीर्ती मोठी; परंतु व्यावसायिक पाठबळाअभावी नवी पिढी पारंपरिक कामापासून परावृत्त झाली. सागर नाईक मुळे या तरुणाने कावी कलेला पुन्हा प्रकाशझोतात आणले, वास्तविक पुरातन काळापासून गोमंतकीय गवंडी कावीकलेचे पाईक आहेत.
अपेक्षित प्रोत्साहनाअभावी अशा पारंपरिक कला झाकोळल्या. या विषयाकडे धोरणात्मक दृष्टिकोनातून पाहावयास हवे. शालेय पातळीपासून जातविरहित कलांचे शिक्षण देण्याचा विचार पुढे यावयास हवा. बांबूकामाला जातीयतेचा स्पर्श झाल्याने ठरावीक घटक त्यापासून दुरावला. अशा मुद्यांवर अधिक मूलगामी आणि सर्वसमावेशक विचार करणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्री सावंत यांच्या पुढाकारातून आकारास आलेल्या ‘ई-बाजार’ संकल्पनेमुळे उद्योगाभिमुख महिलांना ग्राहक उपलब्धी होत आहे. ‘विश्वकर्मा’द्वारे पारंपरिक व्यवसायांना संरक्षणाचा हेतू वृद्धिंगत करण्यासाठी सरकारी प्रकल्पांमध्ये कारागिरांना वाटा देणेही अपेक्षित आहे.
सरकारी पातळीवर पारंपरिक वस्तूविनिमयावर भर राहावा. तसेच स्थानिक पातळीवर जागतिक बाजारपेठेचे दरवाजे उघडणारे तंत्रज्ञान प्रशिक्षणही तितकेच आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय ग्राहकांपर्यंत उत्कृष्ट दर्जाची गोमंतकीय कारागिरी पोहोचणे काळाची गरज आहे.
त्यातूनच गोव्याला प्रत्यक्ष भेट देणाऱ्या पर्यटकांना गोमंतकीय ‘विश्वकर्मा’ची ओळख करून देणे हेही सरकारने आपले दायित्व समजावे. गोमंतकीय कारागीर विश्वात आपली ओळख निर्माण करणारा ‘विश्वकर्मा’ होणे, उद्योजक होणे यावर या योजनेचे यशापयश अवलंबून आहे. त्या दृष्टीनेच योजनेची कार्यवाही व्हावी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.