तिसवाडी: जुने गोवे हे जागतिक वारसा स्थळ असून येथील वारसा स्थळापासून २०० मीटर अंतरावर प्रादेशिक आराखड्यात बफर झोन अधिसूचित केला आहे. त्यामुळे माझ्या कार्यकाळात वारसा स्थळी बांधकामासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी दिली जाणार नाही, असे नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी स्पष्ट केले.
खोर्ली येथे मेगा आरोग्य शिबिराच्या उदघाटनप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई हेही उपस्थित होते. यावेळी मंत्री राणे म्हणाले, की जुने गोवे येथे बफर झोनमध्ये बांधकामासाठी कुठल्याही प्रकारची परवानगी नगर नियोजन खात्याकडून दिलेली नाही.
मी मंत्री होण्यापूर्वी येथे बफर झोन अधिसूचित नव्हता; पण नंतर आमदार राजेश फळदेसाई यांनी माझ्या नजरेस ही बाब आणून दिल्यानंतर आम्ही हा भाग अधिसूचित केला. हा बफर झोन महत्त्वाचा आहे; परंतु येथे सुविधा केंद्र देखील असणे आवश्यक आहे. कारण सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवप्रदर्शनावेळी मोठ्या संख्येने भाविक जुने गोवे येथे येतात तेव्हा याची गरज दिसून आली, असे राणे म्हणाले.
दिवाडी बेटावर १० खाटांची क्षमता असलेले सुसज्ज इस्पितळ उभारले जाईल. जागा निश्चित होताच बांधकाम सुरू होईल. आरोग्य सेवा जनतेच्या दारी पोहोचावी, यासाठी आम्ही पावले उचलत आहोत. माझ्या जीवनात जे अनुभव मला आले, ते दुसऱ्यांना येऊ नयेत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
माझ्या आईला कर्करोग झाला, तेव्हा ज्या समस्यांना मला सामोरे जावे लागले, त्या इतर गोमंतकीयांच्या वाट्याला येऊ नयेत म्हणून लवकरच बांबोळी येथे ३५० कोटी रुपये खर्च करून कर्करोग उपचारांसाठी सुसज्ज इस्पितळ उभारले जाणार आहे. शिवाय गोमेकॉत देखील सुधारणा केल्या जातील, अशी माहिती राणे यांनी दिली.
खोर्ली येथे मोंटफॉर्ड शैक्षणिक संकुलात आयोजित आरोग्य शिबिरात विविध प्रकारची वैद्यकीय सेवा प्रदान करण्यात आली. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी शिबिरास भेट दिली, तसेच सुविधांची पाहणी केली. यावेळी गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य खात्याच्या संचालक डॉ. रूपा नाईक, डॉ. आयडा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
१० हजार सरकारी नोकऱ्या
गोव्यातील युवकांना कंत्राटी व खासगी क्षेत्रात नोकऱ्या नको असून, त्यांना सरकारी नोकऱ्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपलब्ध करून देतील. राज्यात दहा हजार नोकऱ्या तयार होणार असून सुमारे सात हजार नोकऱ्या आरोग्य खात्यात निर्माण होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राणे यांनी दिली.
तुयेत १४० कोटींचे सुसज्ज इस्पितळ
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात न्यूरोलॉजी, कार्डिओलॉजी व इतर आवश्यक सुविधा नाहीत. जोपर्यंत या सुविधा तेथे नाहीत, तोपर्यंत दक्षिण गोव्याच्या लोकांना आरोग्यदृष्ट्या न्याय दिला, असे म्हणू शकत नाही. तुये येथे १४० कोटी रुपयांचे नवीन इस्पितळ बांधले जात आहे. हे उत्तर गोवा जिल्हा इस्पितळाहून अत्याधुनिक असेल, असे मंत्री राणे यांनी सांगितले.
पारंपरिक मिठागरांना संरक्षण
राज्यातील पारंपरिक मिठागरे, जी बंद किंवा सुरू असतील, त्यांना सरकार संरक्षण पुरवेल. मातीचा भराव घालून मिठागरे बुजविण्याचा प्रकार यापुढे खपवून घेणार नाही, असा इशारा मंत्री विश्वजीत राणे यांनी दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.