Karnataka Assembly Election  Dainik Gomantak
गोवा

Karnataka Assembly Election 2023: 40 हजार मतदार कर्नाटककडे रवाना,राज्यातील उद्योगांवर परिणाम शक्य

हजारो कामगारांचा समावेश : आज मतदान; सरकारच्या सुट्टीच्या निर्णयावर टीका

गोमन्तक डिजिटल टीम

Karnataka Assembly Election 2023 कर्नाटक राज्यात 10 मेला होणाऱ्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी गोव्यातून किमान 40 हजार कानडी मतदार कर्नाटक राज्यात रवाना झाले असून यापैकी निम्मे यापूर्वीच तेथे पोहोचले आहेत.

राहिलेले मतदार मिळेल ते वाहन पकडून कर्नाटकात जात असताना दिसत होते. आज रात्री वास्कोहून हुबळीला निघालेल्या रेल्वेमध्येही लोकांची प्रचंड गर्दी उसळली होती.

औद्योगिक क्षेत्रातून मिळत असलेल्या माहितीनुसार, या 40 हजार मतदारांत गोव्यातील औद्योगिक क्षेत्रातूनच गावी जाणाऱ्या कामगारांची संख्याच 10 हजारांच्या आसपास असल्यामुळे राज्यातील अनेक फार्मा उद्योगांचे कारखाने उद्या बंद ठेवण्याची वेळ येणार आहे किंवा ते पूर्ण क्षमतेने चालविणे कठीण होणार आहे.

कर्नाटकातील मतदानास जाणाऱ्यांना गोवा सरकारने एका दिवसाची भरपगारी सुट्टी जाहीर केल्याने सध्या गोव्यात विरोधकांनी सरकारला धारेवर धरलेले असताना किती लोक गोव्यातून कर्नाटकात गेले असतील याचा मागोवा घेतला असता रंजक अशी माहिती गोव्यातील कानडी नेत्यांकडून मिळाली.

कर्नाटक धनगर समाजाचे वास्को येथील नेते शरण मेठी यांना विचारले असता, कर्नाटकमधून गोव्यात येऊन स्थायिक झालेल्या कानडी लोकांची संख्या दोन ते अडीच लाख आहे.

मात्र, त्यातील सुमारे 50 हजार मतदारांचे मतदान अजूनही कर्नाटक राज्यात असल्याने त्यातील किमान 40 हजार लोक मतदानास जातील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

मेठी म्हणाले, बहुतेक मतदार रविवारीच आपल्या गावी पोहोचले. काहींनी बस व रेल्वेने कर्नाटक गाठले, तर काही मतदारांना घेऊन जाण्यासाठी त्या त्या भागातील उमेदवारांनी खासगी वाहने पाठविली होती.

मंगळवारी रात्री 9 वाजता वास्कोहून हुबळी व धारवाड येथे जाण्यासाठी जी रेल्वे निघाली त्यातही बरेच प्रवासी आहेत. जे पहाटे हुबळीहून दुसरी गाडी पकडून बिजापूर आणि बागलकोट येथे जाणार आहेत. गोव्यात सर्वात अधिक कानडी लोकांची वस्ती वास्को परिसरात आहे.

...म्‍हणून सरकारने दिली भरपगारी सुटी

गोवा सरकारने लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम १३५ बी नुसार बुधवार १० मे रोजी कर्नाटक विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ‘मतदान दिवस’ म्हणून कर्नाटक राज्याच्या मतदारांसाठी भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे, असे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे.

लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ च्या कलम १३५-बी नुसार कोणत्याही व्यावसायिक व्यापारी, औद्योगिक आस्थापनांमध्ये किंवा इतर कोणत्याही आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या आणि लोकसभेच्या किंवा राज्य विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्या दिवशी मतदानासाठी सुट्टी दिली जाते.

कर्नाटक हे शेजारील राज्य असल्याने गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात कर्नाटकातील मतदार आहेत आणि कर्नाटकच्या सीईओ कार्यालयाकडून मतदानाच्या दिवशी कर्नाटक राज्याचे मतदार असलेल्या कामगारांना भरपगारी सुट्टी जाहीर करण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्याचा अनुकूल विचार करण्यात आला.

नुकत्याच गोवा राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारनेही संबंधित राज्यांमध्ये काम करणाऱ्या गोवा राज्यांच्या मतदारांना लोकप्रतिनिधी कायदा १९५१ नुसार मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी समान अधिसूचना जारी केली होती.

फार्मा उद्योगांसमोर वाढल्या अडचणी

गोवा उद्योजक संघटनेचे अध्यक्ष दामोदर कोचकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका दक्षिण गोव्यातच कारवार आणि कर्नाटकच्या अन्य भागातून काम करणारे १० हजारपेक्षा जास्त कामगार असून त्यातील बहुतेक कामगार फार्मा उद्योगात काम करत आहेत.

हे कामगार कामावर न आल्यास कित्येक फार्मा उद्योग अर्ध्या क्षमतेने चालवावे लागतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

या कामगारांना मतदान करण्यास सुट्टी देण्याऐवजी त्यांना गोव्यात राहूनच मतदान करण्याची काही तरी तजवीज केली असती, तर ते उद्योगासाठी फायदेशीर ठरले असते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मडगाव, वास्कोतून खास बसगाड्या

गोव्यातून मतदारांना कर्नाटकात जाण्यासाठी वास्को आणि मडगाव येथून बसगाड्यांची संख्या दुप्पट करण्यात आली होती, अशी माहिती मडगाव बसस्थानकावरून मिळाली.

यासंबंधी कदंब वाहतूक महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांना विचारले असता नियमित कदंब बसव्यतिरिक्त कदंबच्या फक्त दहाच अधिक बसगाड्या कर्नाटकात गेल्या आहेत.

मात्र, गोव्यातील सुमारे तीस ते चाळीस खासगी बसगाड्या मतदारांना घेऊन आज कर्नाटकला रवाना झाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT