वाळपई: सत्तरी तालुक्यात कोपार्डे, भिरोंडा, सातोडे आदी गावात संशयास्पद डेंग्युचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आता काळजी घेण्याची गरज बनली आहे. वाळपई सरकारी सामाजिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. अभिजीत वाडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सत्तरी तालुक्यात वरील गावांमध्ये सुमारे तीस रुग्ण दिसून आले, पण ते डेंग्यूचे रुग्ण म्हणून खात्री झालेली नाही. त्यासाठी रुग्णांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी पाठविले आहेत. त्याचा अहवाल आल्यावरच डेंग्यूबाबत अधिक खातरजमा होणार आहे. सध्या संशयित रुग्णांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
डॉ. वाडकर म्हणाले, सध्या पावसाचे प्रमाण वाढलेले आहे. त्यात कुळागरातील परिसरात सुपारी पोफळीच्या पोवल्या जमिनीवर पडलेल्या आहेत. त्या पोवल्यात पावसाचे पाणी तुंबून रहाते. या पोफळीच्या पोवल्या कुळागरातून काढून टाकल्या पाहिजेत व कुळागर स्वच्छ केले पाहिजे. तसेच घराच्या परिसरातील असलेली उघड्या स्थितीतील साधने काढून टाकली पाहिजेत. पाणी साचून राहणाऱ्या कोणत्याही वस्तू परिसरात टाकू नये. पावसाच्या पाण्यात डासांची पैदास होण्यास वाव मिळत असतो. म्हणूनच लोकांनी वेळीच पावले उचलून स्वच्छता बाळगली पाहिजे. अजून अहवाल प्राप्त झालेला नसल्याने रुग्णांना डेंग्यूची लागण झाली असे म्हणता येणार नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.