Over 172 Women Rescued from Goa Many from Maharashtra
तिसवाडी: गोव्यातून जानेवारी २०१९ ते ऑगस्ट २०२४ दरम्यान देहव्यापारातून सुटका केलेल्यांपैकी सुमारे ३० टक्के महिला या महाराष्ट्रातील असून त्यांना चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून राज्यात आणले होते. सुमारे १७२ महिलांची देहव्यापारातून सुटका करण्यात आली. त्यातील पीडित महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि इतर भागातील असल्याची माहिती गोव्यातील देहव्यापारासाठी तस्करी करणाऱ्यांशी लढा देणारी संस्था एआरझेडने आपल्या अहवालात जाहीर केली आहे.
महाराष्ट्र गोव्याच्या शेजारी असल्याने या पीडितांना येथे आणणे सोपे होते, हे महत्त्वाचे कारण ठरले. त्यापैकी बहुतांश नोकरीच्या शोधात इतर राज्यांमधून महाराष्ट्रात स्थलांतरित झाल्या होत्या. मोजकीच ग्रामीण महाराष्ट्रातील असून मुंबई, पुणे किंवा ठाणे या मोठ्या शहरात स्थायिक होऊन, डान्सबार, मसाज पार्लर किंवा केटरिंग व्यवसायात काम करत होत्या.
काहींनी चित्रपट उद्योगात छोट्या नोकऱ्या केल्या. येथील देहव्यापारातून सुटका करण्यात आलेल्यांपैकी आणखी काही पीडित मुंबईतील कामाठीपुरा आणि पुण्यातील बुधवार पेठ या महाराष्ट्रातील दोन मोठ्या ''रेड लाइट'' क्षेत्रातून गोव्यात तस्करी करून आणल्या गेल्या. मुंबईतील कामाठीपुरा हा देशातील सर्वात मोठा रेड लाइट क्षेत्र आहे, तर पुण्यातील बुधवार पेठ तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
अस्वच्छता आणि वाईट परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील हे रेड लाइट क्षेत्र संपण्याच्या मार्गावर असून काही देहव्यापार करणाऱ्या महिलांना गोव्यात स्थलांतरित होण्यास प्रवृत्त केले आहे. गेल्या पाच वर्षांत सुटका करण्यात आलेल्या १७२ पीडितांपैकी बहुसंख्य, केवळ इयत्ता आठवीपर्यंतच्या शैक्षणिक पात्रतेमुळे त्यांना रोजगाराचे पर्याय नसल्यामुळे त्या आर्थिकरीत्या असुरक्षित होत्या. याचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक झाली आणि देहव्यापारात सहजपणे ढकलल्या गेल्या, असे एआरझेडच्या अहवालात म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.