Goa Dainik Gomantak
गोवा

"आमच्या ओठी कोकणी, अन्‌ पोटात मराठी"! खासदार तानावडेंचे प्रतिपादन; 21 व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

Marathi Sahitya Sammelana Goa: श्रीपाद नाईक म्हणाले, जागतिक मराठी साहित्य संमेलन हा केवळ कार्यक्रम नसून मराठी अस्मिता, संस्कृती आणि विचारपरंपरेचा नारा आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोव्याला मराठीची फार जुनी परंपरा आहे. सांस्कृतिकदृष्ट्या सिंधुदुर्ग आणि गोव्याची नाळ एकच आहे. “आमच्या ओठी जरी कोकणी असली, तरी पोटात मराठी असते. सकाळी मराठी वर्तमानपत्र वाचल्याशिवाय समाधान मिळत नाही,” असे मत खासदार सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केले.

ते एकविसाव्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी बोलत होते. मराठी साहित्यातून मराठीची भूक भागवली जाते. इंग्रजी ही केवळ कामापुरती भाषा असून, त्यामध्ये सांस्कृतिकपणा आणता येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, कला अकादमीचे अध्यक्ष चंद्रकांत कवळेकर, दिग्दर्शक नागराज मंजुळे, गिरीश ठकार, दशरथ परब, गौरव फुटाणे, शिवकुमार लाड, अशोक पाटील, महेश म्हात्रे, उदयदादा लाड, प्रा. अनिल सामंत, जयराज साळगावकर, गौतम देसाई, अशोक परब, परेश प्रभू, रमेश वंसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

तानावडे म्हणाले, पोर्तुगीजांनी गोव्यावर साडेचारशे वर्षे सत्ता केली, तरी सांस्कृतिकदृष्ट्या मराठी भाषेने गोव्याला जोडून ठेवले आहे. “मी राज्यसभेत शपथ मराठीतून घेतली, कारण त्या भाषेत बोलताना उभारी येते. खासदार म्हणून मी राज्यसभेत कोकणी व मराठीतून विषय मांडतो. कोकणी ही बोली भाषा असली, तरी आमचे प्राथमिक शिक्षण मराठीतून झाले आहे. गाथा, भजन व कीर्तन यांचे संस्कार मराठीतूनच झाले,” असेही त्यांनी सांगितले.

श्रीपाद नाईक म्हणाले, जागतिक मराठी साहित्य संमेलन हा केवळ कार्यक्रम नसून मराठी अस्मिता, संस्कृती आणि विचारपरंपरेचा नारा आहे. या संमेलनातून मराठीचा गौरव करण्यापेक्षा तिच्या अंतर्भूत प्रवासाला उजाळा देण्यात आला आहे. मराठी भाषा आणि संस्कृती नव्या आव्हानांना सामोरी जात असताना हा विषय अधिक समर्पक ठरतो. तंत्रज्ञान, जागतिकीकरण आणि सामाजिक बदलांच्या पार्श्वभूमीवर मराठी मनाची ओळख काय आहे आणि भविष्यातील वाटचाल कशी असेल, यावर या संमेलनात चर्चा झाली असावी, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गोवा भाषिक सौंदर्याने नटलेला : श्रीपाद नाईक

आज मराठी भाषा जागतिक पातळीवर पोहोचली आहे. जगातील विविध देशांत मराठी माणूस आपल्या कर्तृत्वाने, बुद्धिमत्तेने आणि संस्कारांनी ओळख निर्माण करत आहे. अशावेळी जागतिक मराठी संमेलनाचे व्यासपीठ भाषा, संस्कृती आणि भावनिक नाते दृढ करणारा सेतू ठरते.

गोवा ही भूमी केवळ निसर्गसौंदर्यानेच नव्हे, तर भाषिक सौंदर्यानेही नटलेली आहे. अशा भूमीत हे संमेलन होणे, ही अभिमानाची बाब आहे, असे श्रीपाद नाईक यांनी सांगितले. गोव्यातील मराठी साहित्याची परंपरा प्राचीन असून, संत सोहिरोबानाथ अंबिये यांच्या काव्याचा तसेच फा. स्टिफन थॉमस यांच्या मराठीतील ख्रिस्तीपुराणाचा उल्लेख त्यांनी केला.

भाषा भांडण्यासाठी नसतात : दिगंबर कामत

मंत्री दिगंबर कामत म्हणाले, गेल्या दोन दशकांपासून जागतिक मराठी अकादमी या संमेलनाचे आयोजन करीत आहे. मराठी शिकल्यामुळे चांगले संस्कार लाभले. भाषा बोलण्यासाठी असतात; त्या कधीही भांडण्यासाठी नसतात. मराठीचे गोमंतकाशी असलेले नाते अतूट असून मराठी माणूस अनेक देशांत पोहोचला आहे, असे त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: हिवाळी अधिवेशनाचा हायव्होल्टेज प्रारंभ! 'हडफडे' अग्नितांडवावरून विरोधक आक्रमक; राज्यपालांच्या भाषणदरम्यान 'शेम-शेम'च्या घोषणा

Goa Winter Session: 'कुशावती' जिल्हा म्हणजे 'विकसित गोवा 2037' कडे टाकलेले मोठे पाऊल! राज्यपालांचे प्रतिपादन

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीच्या गोडव्यावर महागाईचे सावट! साहित्याचे दर वाढले; वाण खरेदीसाठी बाजारात लगबग

Goa Assembly Session: रस्त्यावरील भटक्या गुरांचा प्रश्न गंभीर; पंचायतींच्या मदतीने 'गौशाळां'मध्ये पुनर्वसन करणार - राज्यपाल

Goa Tourism: देशी, विदेशी पर्यटक वाढले! चार्टर विमानांच्या लँडिंगमध्ये वाढ; पर्यटन खात्‍याचा दावा

SCROLL FOR NEXT