Damu Naik, CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Mhaje Ghar: एक कार्यक्रम, 173 बैठका! ‘माझे घर’साठी भाजपने केले सूक्ष्म नियोजन; लाभार्थ्यांपर्यंत अर्जांसह पोहोचणार कार्यकर्ते

Mhaje Ghar Goa: मुख्‍यमंत्री सावंत यांच्‍या नेतृत्‍वाखालील सरकारने प्रथमच कोमुनिदाद, सरकारी, खासगी तसेच सर्वे आराखड्यावरील घरे तेथे राहणाऱ्या लोकांच्‍या नावावर करून देण्‍याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पक्षाची कोणतीही बैठक, परिषद, सभा काहीही असो, त्याचे पद्धतशीरपणे नियोजन करण्यात भारतीय जनता पक्ष माहीर आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे, सांताक्रुझ येथे नुकताच झालेला ‘माझे घर’ योजनेचा शुभारंभी कार्यक्रम. या एका कार्यक्रमासाठी भाजपने राज्यभरात तब्बल १७३ बैठका घेतल्या होत्या, अशी माहिती समोर आली आहे.

राज्‍य सरकारच्‍या बहुचर्चित ‘माझे घर’ योजनेचे लोकार्पण आणि २,४५१ कोटींच्‍या १९ प्रकल्‍पांच्‍या उद्‍घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्‍या उपस्‍थितीत शनिवारी सांताक्रुझ येथील डॉ. श्‍‍यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्‍टेडियमवर झालेल्‍या कार्यक्रमाला २० हजारांपेक्षा अधिक नागरिकांची उपस्‍थिती लाभली.

हा कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी राज्‍य सरकार आणि प्रदेश भाजपने राज्‍यभरात तब्बल १७३ बैठका घेतल्‍या होत्‍या, अशी माहिती भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी रविवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

‘राज्‍यातील जमिनींच्‍या विविध प्रश्‍‍नांमुळे कोमुनिदाद, सरकारी, खासगी जमिनीवर बांधलेली घरे गोमंतकीयांच्‍या नावावर झालेली नव्‍हती. गोव्‍याला मुक्ती मिळाल्‍यापासून अनेकजण आपली घरे कायदेशीर कधी होतील, याची प्रतीक्षा करीत होते.

आतापर्यंत राज्‍यात सत्तेवर आलेल्‍या एकाही सरकारने या लोकांचा विचार केला नव्‍हता. परंतु, मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍या नेतृत्‍वाखालील भाजप सरकारने प्रथमच कोमुनिदाद, सरकारी, खासगी तसेच सर्वे आराखड्यावरील घरे तेथे राहणाऱ्या लोकांच्‍या नावावर करून देण्‍याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

भाजपच्‍या कोअर समितीच्‍या बैठकीत हा विषय आल्‍यानंतर कोअर समितीच्‍या पदाधिकाऱ्यांनीही सरकारच्‍या या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला.

त्‍यानंतर सरकारने विधानसभेच्‍या गेल्‍या पावसाळी अधिवेशनात ही घरे कायदेशीर करण्‍यासाठी वेगवेगळी विधेयके आणून ती मंजूर करून घेतली. राज्‍यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांच्‍या मान्‍यतेनंतर या विधेयकांचे कायद्यातही रूपांतर झाले. सरकारच्‍या या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्‍यभरातील हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे’, असे नाईक म्‍हणाले.

कार्यकर्त्यांच्‍या मेहनतीमुळे यश

१ ‘माझे घर’ योजनेचा लोकार्पण सोहळा गत विधानसभा निवडणुकीनंतरचा राज्‍यातील सर्वांत मोठा कार्यक्रम होता.

२ त्‍यामुळे या कार्यक्रमाला उपस्‍थित राहणाऱ्या नागरिकांची कोणत्‍याही प्रकारची गैरसोय होऊ नये, याची पूर्ण दक्षता पक्षाच्‍या कार्यकर्त्यांनी घेतली होती.

३ वाहनांची कोंडी होऊ नये, यासाठी जागोजागी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्‍यात आला होता.

४ स्‍टेडियमबाहेर वाहने पार्क करण्‍यासाठी तीन ठिकाणी पार्किंगची व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती.

५ या कार्यक्रमाचा पणजीतील वाहतूक व्‍यवस्‍थेवर परिणाम होणार नाही, याचीही दक्षता घेतली होती.

६ त्‍यामुळेच कार्यक्रम यशस्‍वीरित्‍या पार पडला, असे दामू नाईक यांनी सांगितले.

अभूतपूर्व उपस्थिती

लोकांना कार्यक्रमस्‍थळी आणण्‍यासाठी स्‍वतंत्र बसेसची व्‍यवस्‍था केली होती. या कार्यक्रमाला सुमारे २० हजार लोकांची उपस्‍थिती लाभेल, असा माझा अंदाज होता. परंतु, त्‍यापेक्षाही अधिक नागरिक उपस्‍थित राहिले. स्‍टेडियममधील मुख्‍य सभागृह आणि गॅलरीही फुल्ल झाल्‍यामुळे अनेकांना बाहेर उभे राहून अमित शहा यांचे भाषण ऐकावे लागले, असेही नाईक यांनी सांगितले.

पेडण्यापासून काणकोणपर्यंत जागृती

‘माझे घर’ योजनेच्‍या लोकार्पणासह १९ प्रकल्‍पांच्‍या उद्‍घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गोव्‍यात येण्‍याचे निश्‍चित झाल्‍यानंतर हा कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी प्रदेश भाजपनेही कंबर कसली. मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मी तसेच इतर मंत्र्यांनी आठ दिवसांत राज्‍यभरात १७३ बैठका घेऊन पेडण्‍यापासून काणकोणपर्यंत या कार्यक्रमाची जागृती केली, अशी माहिती नाईक यांनी दिली.

महसूल यंत्रणेचे सहकार्य घेणार

महसूल यंत्रणेच्या माध्यमातून ‘माझे घर’ योजनेतील अर्ज मंजूर केले जाणार आहेत. यासाठी पंचायत आणि नगरपालिकांकडून लागणारे आवश्यक ते दाखले वेळेत मिळावेत, यासाठी लाभार्थी आणि सरकारी यंत्रणा यांच्यातील समन्वयाचे काम भाजपचे कार्यकर्ते करणार आहेत.

मुख्यमंत्र्यांना होणार सादर अहवाल

कूळ-मुंडकार कायद्याची अंमलबजावणी जशी रखडली, तसे याबाबत होऊ नये यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी अर्जदारांना मदत करावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. या योजनेची अंमलबजावणी कशी होते आहे, याचा दररोज आढावा घेण्याची व्यवस्था केली आहे. प्रत्येक उपजिल्हाधिकारी व मामलेदार यांच्या पातळीवर दररोज या नव्या कायद्यांच्या संदर्भात काय केले, याची माहिती संकलित होऊन मुख्यमंत्री कार्यालयाला दररोज अहवाल मिळेल, अशी यंत्रणा तयार केली आहे.

आजपासून लाभार्थ्यांपर्यंत अर्जांसह पोहोचणार कार्यकर्ते

‘माझे घर’ योजनेअंतर्गत येत्या सहा महिन्यांत सर्वांना न्याय देण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. उद्यापासून (ता. ६) भाजपचे कार्यकर्ते घराघरांत फिरून लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचे अर्ज मिळतील, अशी व्यवस्था करणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत या योजनेची शनिवारी सुरुवात केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या उपस्थितीत सोमवारपासून कार्यकर्त्यांच्या पातळीवर लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या योजनेची अंमलबजावणी सरकारी पातळीवर करण्याचे नियोजन असले तरी भाजप पक्ष संघटना लाभार्थ्यांना अर्ज मिळवून देण्यापासून अर्ज भरून देण्यापासून, आवश्यक त्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी मदत करणार आहे. मंडळ पातळीवर यासाठी बैठका घेऊन कोण लाभार्थी असू शकतात, याची यादी तयार केली आहे. त्या लाभार्थ्यांशी संपर्क साधून अर्ज सादर करण्यासाठी त्यांना येणाऱ्या अडचणी पक्षाचे कार्यकर्ते दूर करणार आहेत.

...अशी असेल मोहिमेची रूपरेषा

वीस कलमी कार्यक्रमांतर्गत मिळालेल्या भूखंडाची मालकी देणे, सरकारी मालकीच्या जमिनीत असलेल्या घराखालील जमिनीची मालकी, कोमुनिदादच्या मान्यतेनंतर घराखालील जमिनीची मालकी, स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर नियम न पाळता बांधलेली घरे नियमित करणे आदी सुविधा माझे घर योजनेअंतर्गत मिळणार आहेत.

त्याशिवाय १९७२ पूर्वीची घरे कोणत्याही भू-रूपांतर सनदेशिवाय नियमित आहेत, असे प्रमाणपत्र पंचायत व पालिका पातळीवर देण्याचीही व्यवस्था केली आहे. घर दुरुस्तीसाठी तीन दिवसांत दाखला मिळण्याचीही सोय केली आहे.

गावातील घरांची विभागणी करून प्रत्येकाला स्वतंत्र घरक्रमांक देण्यासाठीही कायदा दुरुस्ती केली आहे. या साऱ्या सुविधा केवळ कागदावर राहू नयेत, यासाठी मुख्यमंत्र्यांनी व्यक्तिशः लक्ष घातले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "तुम्ही भाजपची B-Team, आम्हीच तुम्हाला नाकारतो", काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत; गोवा निवडणुकीत काँग्रेस 'एकला चलो रे'

Diwali 2025: पणत्या बनवण्याचा वारसा मावळतोय! डिचोलीतील व्यवसाय अंधाराखाली; राज्याबाहेरील पणत्यांची चलती

Goa Police App: गोवा पोलिस आता ‘स्‍मार्ट’ मोबाईलवर! सूचना, सायबर सुरक्षिततेसंबंधी माहिती मिळणार तात्काळ

Panaji: कारमध्ये कोंडले, लाथाबुक्यांनी केली मारहाण; तक्रारदाराची साक्ष देण्यास नकार; खंडणी प्रकरणातील 6 आरोपी निर्दोष

Goa Live News: कोलवाळ हायवेवरील एचपी पेट्रोल पंपाजवळ एका बलेनो कारची दुचाकीला धडक

SCROLL FOR NEXT