Vijay Hazare Trophy 2024-25 One Day Series
पणजी: विजय हजारे करंडक एकदिवसीय सामन्यांच्या क्रिकेट स्पर्धेतील गोव्याची मोहीम शनिवारपासून (ता. २१) सुरू होत आहे. सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेतील असमाधानकारक कामगिरी लक्षात घेता त्यांच्यासाठी जयपूर येथे होणारी स्पर्धा खडतर ठरू शकते.
सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० स्पर्धेत स्पर्धेत सलग चार सामने गमावल्यानंतर गोव्याने महाराष्ट्राला आणि नंतर दुबळ्या नागालँडला पराजित केले होते. आता विजय हजारे करंडक स्पर्धेत गोव्यासमोर अ गटात मातब्बर प्रतिस्पर्ध्यांना सामोरे जावे लागत आहे. या गटात गोव्याच्या पहिला सामना शनिवारी ओडिशाविरुद्ध होईल त्यानंतर अनुक्रमे हरियाना, मणिपूर, उत्तराखंड, आसाम, गुजरात आणि झारखंड या संघाविरुद्ध लढती होतील. मणिपूरचा अपवाद वगळता गोव्यासाठी इतर सामने कठीणच असतील, त्यामुळे विजयाची संख्या वाढविण्यासाठी दर्शन मिसाळ याच्या नेतृत्वाखालील संघाला खूप मेहनत घ्यावी लागेल हे स्पष्टच आहे.
गोव्याच्या सीनियर पुरुष संघाला यंदा विशेष कामगिरी बजावता आलेली नाही. रणजी स्पर्धेच्या प्लेट गटात गोव्याने पाचही सामने जिंकले, तरी त्यांना घरच्या मैदानावर नागालँडने झुंजविले होते ही बाब नाकारता येत नाही. विजय हजारे करंडक स्पर्धेत गोव्याच्या फलंदाजीचा विशेष करून कस लागेल. गोलंदाजीतही सातत्य राखणे आवश्यक आहे. थोडक्यात वैयक्तिक कामगिरीऐवजी गोव्याच्या क्रिकेटपटूंना सांघिक कामगिरी उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. एकंदरीत एकदिवसीय स्पर्धेतील प्रतिस्पर्धी संघांची ताकद आजमावता गोव्यासाठी विजय हजारे करंडक स्पर्धेच्या अ गटातील मोहीम आव्हानात्मक असेल.
गोव्याची मागील दोन मोसमातील कामगिरी लक्षात घेता विजय हजारे करंडक स्पर्धेत त्यांना मोठा पराक्रम साधता आलेला नाही. गतमोसमात (२०२३-२४) कमजोर नागालँडला त्यांनी हरविले, मात्र इतर पाच सामने गमवावे लागले. त्यापूर्वी २०२२-२३ मध्ये गोव्याने सात पैकी दोन सामने जिंकले होते, परंतु ते विजय अनुक्रमे बिहार व अरुणाचल प्रदेश या तुलनेत कमजोर संघाविरुद्ध होते.
डावात सर्वोच्च धावसंख्या ः ७ बाद ३८३ विरुद्ध आंध्र प्रदेश - बंगळूर येथे २४ फेब्रुवारी २०१२; ६ बाद ३८३ विरुद्ध नागालँड - ठाणे येथे १ डिसेंबर २०२३
डावात नीचांकी धावसंख्या ः सर्वबाद ५४ - विरुद्ध कर्नाटक बंगळूर येथे २० फेब्रुवारी २०१२
सर्वांत मोठा विजय ः २३२ धावांनी - विरुद्ध नागालँड ठाणे येथे १ डिसेंबर २०२३
डावात वैयक्तिक सर्वोच्च ः नाबाद १६९ एकनाथ केरकर - विरुद्ध हैदराबाद सूरत येथे २८ फेब्रुवारी २०२१
डावात सर्वोत्तम गोलंदाजी ः ५-२८ अरुण शेट्टी - विरुद्ध तमिळनाडू चेन्नई येथे १२ जानेवारी १९९४
- संकलन ः किशोर पेटकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.