

Vijay Merchant U16 Cricket Trophy Goa VS Pondicherry
पणजी: विजय मर्चंट करंडक १६ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात गोव्याने अनिर्णित लढतीतून पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण प्राप्त केले, पण पुदुचेरीने अतिशय चिवट फलंदाजी करून पराभव टाळण्यात सफलता मिळविली. तीन दिवसीय सामना गुजरातमधील सूरत येथील सी. के. पिठावाला मैदानावर झाला.
पुदुचेरीसमोर सामन्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी विजयासाठी ३२४ धावांचे लक्ष्य होते. दिवसअखेर त्यांनी ७ बाद १९१ धावा करून सामना अनिर्णित राखला. त्यापूर्वी सकाळच्या सत्रात गोव्याने कालच्या ५ बाद २२२ धावांवरून दुसरा डाव ७ बाद २८२ धावांवर घोषित केला. गोव्याने पहिल्या डावात ४१ धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात साई नाईक याने शानदार नाबाद अर्धशतक केले. त्याने ८६ चेंडूंचा सामना करताना १० चौकारांसह ६३ धावा केल्या.
गोव्याचा कर्णधार शमिक कामत याचे डावातील पहिलेच षटक सनसनाटी ठरले. सहा चेंडूंत तिघांना बाद करून शमिकने पुदुचेरीची ३ बाद १ धाव अशी दयनीय स्थिती केली. त्यानंतर संघाला सावरताना पी. शैलेश वैथियानाथन व के. चंद्रू (४१) यांनी चौथ्या विकेटसाठी १०१ धावांची भागीदारी केली. मोहित यादवने चंद्रू याला बाद केले. नंतर शैलेश व ए. शिवशक्ती (नाबाद ३५) यांनी पाचव्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली.
शतकाच्या दिशेने असलेल्या शैलेशला मोहितने त्रिफळाचीत बाद केले. त्यानंतर मोहितनेच आणखी ११ धावांत तीन गडी बाद केल्यामुळे पुदुचेरीची ७ बाद १७७ अशी स्थिती झाली. शैलेशने १८१ चेंडूंत १५ चौकारांसह ८७ धावा केल्या. दिवसाच्या अखेरच्या टप्प्यात तब्बल १६३ चेंडूंचा सामना केलेल्या शिवशक्ती याने बदली खेळाडू जॉय स्मिथ (३८ चेंडूंत ५ धावा) याच्यासह १३.२ षटके खिंड लढवत गोव्याला विजयापासून दूर ठेवले. गोव्यातर्फे मोहित याने चार, तर शमिकने तीन गडी बाद केले.
गोव्याने स्पर्धेच्या ई गटात सलग तिसरा सामना अनिर्णित राखला. त्यांचे आता पाच गुण झाले आहेत. पुदुचेरीची हा दुसरा अनिर्णित सामना ठरला. त्यांच्या खाती चार गुण आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.